Leading International Marathi News Daily
बुधवार, ३ जून २००९
  आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
  करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
  करिअर नामा
यू-टय़ूबची महती
  स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  मोठी स्वप्नं
  संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
  स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
  स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
  शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर

शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर
शालेय शिक्षणाच्या गुणवत्तावाढीमध्ये शालेय ग्रंथालय फार मोठे योगदान देऊ शकते. ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या साहित्यांचा अधिकाधिक वापर करण्यास शिक्षक आणि विद्यार्थी यांना प्रवृत्त करणे आणि त्यांना आवश्यक त्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देणे हे शालेय ग्रंथालयाचे उद्दिष्ट असते. शालेय शिक्षणात शालेय ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर होणे ही आजची शैक्षणिक गरज आहे. केवळ पाठय़पुस्तकांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्टय़े साध्य होऊ शकत नाहीत. त्या भागविण्याचे कार्य शालेय ग्रंथालय विधिध सेवांच्या आणि उपक्रमांच्या द्वारे पार पाडू शकते. ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून त्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आणि त्याचा वापर करण्याचे शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांमध्ये स्वाभाविकच
 

ज्ञानार्जनाची आवड निर्माण होते. म्हणून आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा वापर करण्याची संधी प्राप्त करून देऊन त्यांची ज्ञानार्जनाची, जिज्ञासापूर्तीची नैसर्गिक भूक भागविण्याचे कार्य शालेय ग्रंथालयाने केले पाहिजे. ग्रंथालयाच्या या कार्याचे यश विद्यार्थी ग्रंथालय साहित्याचा वापर किती व कसा करतात यावर अवलंबून असते. म्हणूनच विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देऊन त्याचा वापर करण्याचे शिक्षण ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना द्यायला हवे. ग्रंथालयीन साधनांचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक वापर करता यावा म्हणून ग्रंथालयाने विविध सेवांचे आणि उपक्रमांचे आयोजन करावयास हवे.
शालेय ग्रंथालयाचे स्वरूप- ग्रंथालय साहित्याचा संग्रह करताना जी उद्दिष्टय़े डोळ्यासमोर ठेवलेली असतात ती पुरी करण्यासाठी ग्रंथालयाचे स्वरूप कसे असावे या संबंधी निर्णय घेणे आवश्यक असते. शाळेत एकच मध्यवर्ती ग्रंथालय असावे की, वर्ग- ग्रंथालये असावीत या संबंधी निश्चित भूमिका शाळाचालकांनी स्वीकारली पाहिजे. ही भूमिका स्वीकारताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावयास हवी ती ही की, शालेय ग्रंथालयाचे यश विद्यार्थी व शिक्षकांना ग्रंथालय साहित्याचा वापर करण्याची संधी किती आणि कशी मिळेल यावर अवलंबून असते.
मध्यवर्ती ग्रंथालय- शाळेत उत्तम ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एकच मध्यवर्ती ग्रंथालय असणे ही एक आदर्श ग्रंथालय व्यवस्था आहे. कारण संपूर्ण शाळेसाठी एकच सुसज्ज ग्रंथालय असले की, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना चांगली ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देता येते. मध्यवर्ती ग्रंथालयात सर्व साहित्य एकाच ठिकाणी असल्यामुळे ग्रंथपालाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना त्या साहित्याचा अधिक काळ वापर करण्याची संधी मिळते. मध्यवर्ती ग्रंथालयाचे हे फायदे लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी शाळेत मध्यवर्ती ग्रंथालय स्थापन करावयास हवे. ग्रंथालय हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे एक प्रभावी साधन आहे, ही जाणीव बालवयातच मुलांमध्ये रुजविण्यासाठी शाळांतून केंद्रीय ग्रंथालये असणे ही एक शैक्षणिक गरज आहे.
वर्ग ग्रंथालये- प्रत्येक शाळेत मध्यवर्ती ग्रंथालय व प्रशिक्षित ग्रंथपाल असणे ही एक आदर्श ग्रंथालय पद्धती आहे. परंतु आजच्या शाळांच्या जागेच्या अडचणी लक्षात घेता सर्वच शाळांना मध्यवर्ती ग्रंथालय उपलब्ध करून देता येईल, असे वाटत नाही. ज्या शाळा मध्यवर्ती गं्रथालय सुरू करू शकत नाहीत त्या शाळांत वर्ग-ग्रंथालये अपरिहार्य आहेत. ही ग्रंथालये अगदीच अकार्यक्षम असतात असे नाही. त्यांचीही काही वैशिष्टय़े आहेत. फायदे आहेत. ती योजनाबद्ध पद्धतीने व्यवस्थितरित्या चालविली तर शाळांतून मर्यादित स्वरूपात ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देऊ शकतात.
महाराष्ट्र राज्य शासनाने नेमलेल्या चिपळूणकर समितीने आपल्या अहवालात वर्ग-ग्रंथालयासंबंधी पुढील विचार व्यक्त केले आहेत. ‘‘वर्ग-ग्रंथालये ही शालेय ग्रंथालयात महत्त्वाची प्रथा आहे. या प्रथेत वर्गग्रंथालय प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथपालनाच्या कामाचा अनुभव मिळून नेतृत्वाचे गुण विकसित होण्यास मदत मिळते. इतर विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या कार्याचे जवळून निरीक्षण करावयास मिळते.
सध्याच्या परिस्थितीत वर्ग ग्रंथालयाच्या कामावर ग्रंथपालाकडून देखरेख होत नाही, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किती पुस्तके वाचली, कोणत्या पुस्तकांचे वाचन जास्त प्रमाणात झाले इत्यादी तपशील मिळत नाही’’.
हे विचार लक्षात घेऊन शाळा चालकांनी आणि शालेय ग्रंथपालांनी आपल्या शाळांतून चांगली वर्ग-ग्रंथालये निर्माण करण्याचा प्रयत्न करावयास हवा.
ग्रंथालय सेवा- शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना ग्रंथालय साहित्याचा अधिकाधिक वापर करण्याची संधी देणे हे शालेय ग्रंथालयाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. शाळेतील ग्रंथालयाचा वापर शाळेतील शिक्षकांच्या ग्रंथालयाकडे पाहण्याच्या मनोवृत्तीवर बराचसा अवलंबून असतो. मुख्याध्यापकांनी ग्रंथालयाचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ दिला, शिक्षकांनी जर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले आणि ग्रंथपालाने जर आपल्या ग्रंथालयात चांगले ग्रंथालय साहित्य उपलब्ध करून दिले तर शालेय ग्रंथालयाचा वापर निश्चितच चांगला होतो. हा वापर अधिकाधिक होण्यासाठी ग्रंथपालाने ग्रंथ देवघेव, संदर्भ सेवा, ग्रंथालय तास यासारख्या सेवांचा आणि काही विशेष उपक्रमांचा अवलंब करावयास हवा.
ग्रंथ देवघेव- विद्यार्थ्यांना ग्रंथ घरी वाचायला देणे हे शालेय ग्रंथालयाचे एक महत्त्वाचे शैक्षणिक कार्य आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही म्हणून त्यांची वाचनाची हौस भागविण्यासाठी शालेय ग्रंथालयाने त्यांना ग्रंथ घरी नेता येतील, अशी व्यवस्था केली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ती वाढीला लावण्यासाठी या ग्रंथ देवघेव सेवेची फार गरज आहे आणि ती गरज शालेय ग्रंथालयाने भागविली पाहिजे.
संदर्भ सेवा- संदर्भ-सेवेची व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेक ग्रंथालयतज्ज्ञांनी केला आहे, पण संदर्भ सेवेचे स्वरूप व तिची व्याप्ती सदोदित बदलत असल्यामुळे सर्वसामान्य अशी व्याख्या अजून तरी केलेली आढळत नाही. प्रसिद्ध ग्रंथालय शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी संदर्भ सेवेसंबंधी लिहिताना म्हटले आहे. ‘‘नेमका वाचक नेमके पुस्तक किंवा वाचन साहित्य यांची योग्य वेळी सांगड घालून देण्याचे योग्य त्या व्यक्तिगत पातळीवरून केलेले प्रयत्न म्हणजे संदर्भ सेवा’’. अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथालयशास्त्राच्या परिभाषा कोशात संदर्भ सेवेसंबंधी म्हटले आहे, ‘‘अभ्यासात आणि संशोधनासाठी ग्रंथालयीन वाचन साहित्यातून माहिती शोधण्यासाठी वाचकांना प्रत्यक्षपणे दिलेले व्यक्तिगत सहकार्य म्हणजे संदर्भ सेवा’’. या आणि इतर तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा मथितार्थ एकच आहे. तो हा की वाचकाला हवी असलेली नेमकी माहिती थोडय़ा वेळात योग्य संदर्भग्रंथांच्या सहाय्याने उपलब्ध करून देणे.
ग्रंथालय तास- माध्यमिक शाळांतून सर्व वर्गासाठी आठवडय़ातून कमीत कमी एका ग्रंथालय तासाची सोय असली तर त्या तासात मध्यवर्ती ग्रंथालयातील किंवा वर्ग-ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला मिळू शकतात. या तासात विद्यार्थ्यांना ग्रंथ घरी वाचायला देण्याचे कामही करता येते. या तासाचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथपालाला आणि वर्गशिक्षकांना करता येतो. वाचन-पेटय़ा, पुरवणी वाचन- पेटय़ांतील पुस्तकांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी या तासाचा चांगला उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथप्रेम आणि वाचनप्रेम निर्माण करून त्यांना ग्रंथालयाचा वापर करण्यास उद्युक्त करण्यासाठी ग्रंथालय तासाचा चांगला उपयोग होतो.
ग्रंथालयाचे काही उपक्रम- शालेय ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर व्हावा आणि विद्यार्थ्यांना ग्रंथालय सेवेचा फायदा मिळावा म्हणून जे काही उपक्रम ग्रंथालयाला हाती घेता येतात त्यापैकी काही उपक्रमांचा येथे विचार केला आहे.
(१) वाचन पेटय़ा- ग्रंथालय तासात किंवा विद्यार्थ्यांना मोकळा वेळ मिळतो त्या वेळेत वाचनासाठी त्यांना ग्रंथालयातून चांगले वाचनसाहित्य वाचन पेटय़ांतून देता येते. या पेटय़ा तयार करताना ग्रंथपालाने विद्यार्थ्यांना वाचायला प्रवृत्त करण्याचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवावयास हवा. ग्रंथपालाने प्रत्येक पेटीत नोंदवही ठेवावी. या वहीवरून कोणती पेटी कोणत्या वर्गात कोणत्या दिवशी नेली होती ही माहिती मिळते.
(२) पुरवणी वाचन पेटय़ा- वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त काही अवांतर वाचन करण्याच्या हेतूने शिक्षण खाते जी काही पुस्तके मंजूर करते ती शालेय ग्रंथालयाने विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावीत, अशी शासनाची अपेक्षा असते म्हणून या पुस्तकांच्या पेटय़ांतील पुस्तके वाचायला वर्ग शिक्षकांनी आणि विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागते. शैक्षणिकदृष्टय़ा ही अतिशय उपयुक्त योजना आहे. ती ग्रंथालयाने व्यवस्थित राबविली पाहिजे.
(३) मधल्या सुट्टीत वाचन- शाळेच्या दिनचर्येत विद्यार्थ्यांना रिकामा वेळ असा फार कमी मिळतो यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाचनाची हौस असते त्यांना ती वेळेअभावी भागवता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना वाचनाचा लाभ द्यावा म्हणून ग्रंथपालाने मधल्या सुट्टीत त्यांना ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.
(४) नियतकालिके व वृत्तपत्रे- ग्रंथालयात येणारी मासिके व वृत्तपत्रे विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत इच्छा असूनही वेळेअभावी वाचता येत नाहीत. त्यामुळे त्यांचा व्हावा तेवढा उपयोग केला जात नाही. वास्तविक नियतकालिके आणि वृत्तपत्रे यांचे शालेय विद्यार्थ्यांनी वाचन करणे शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे म्हणून विद्यार्थी या चांगल्या वाचन साहित्यापासून वंचित राहू नयेत म्हणून ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना ती मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर वाचता येतील, अशी खास सोय करावी.
(५) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सोय- १० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशाची चिंता असते. या विद्यार्थ्यांचा त्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून शालेय ग्रंथालयाने विचार करून त्यांना त्यांच्या अभ्यासात जेवढी मदत करता येईल तेवढी केली पाहिजे. त्यांना अभ्यासोपयोगी पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध करून देऊन त्या साहित्याचा त्यांना वापर करता यावा म्हणून शाळेच्या वेळेबाहेर त्यांची वाचनाची खास सोय केली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासाची सोय नसते, अशा विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या या उपक्रमाचा निश्चितच फायदा होतो आणि ग्रंथालय आपल्या शाळेच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या कामात सहभागी होऊ शकते.
(६) विशेष परीक्षांसाठी पुस्तके- शाळेतील बरेच विद्यार्थी बाहेरच्या विशेष परीक्षांना बसतात. त्यापैकी काहीची या परिक्षांसाठी लागणारी पुस्तके खरेदी करण्याची ऐपत नसते. अशा विद्यार्थ्यांना परिक्षांना बसायला उत्तेजन देऊन त्यांना लागणारी पुस्तके व इतर साहित्य ग्रंथालयाने उपलब्ध करून द्यावे. शाळेतील विद्यार्थ्यांचे या परीक्षेतील यश शाळेला निश्चितच भूषणावह असते आणि या यशातील ग्रंथालयाचा वाटा महत्त्वाचा असतो, हे शालेय ग्रंथपालाने लक्षात ठेवावयास हवे.
(७) व्यवसाय मार्गदर्शन- शालेय ग्रंथपालाने विविध अभ्यासक्रमांची आणि व्यवसायाची माहिती देणारी पुस्तके आणि माहितीपत्रके विद्यार्थ्यांना ग्रंथालयात उपलब्ध करून द्यावीत. शिवाय विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती ग्रंथपालाने व्यवसाय मार्गदर्शन केंद्राकडून त्यांना मिळवून द्यावी. शालेय ग्रंथपालाने या ग्रंथालय सेवेला कमी लेखता कामा नये.
विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा वापर करण्याचे शिक्षण- ग्रंथालयातील साहित्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून देऊन त्याचा दैनंदिन अभ्यासासाठी वापर कसा करावा याचे शिक्षण ग्रंथपालाने त्यांना द्यावे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांचे छंद, आवडी जोपासण्यासाठी अवांतर वाचनासाठी ग्रंथालयाचा वापर कसा करावा याचीही माहिती त्यांना द्यावी. ग्रंथालयाचा वापर करण्याचे शिक्षण ग्रंथपालाने विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे दिल्यास विद्यार्थी ग्रंथालयाचा वापर निश्चितच अधिक करतात.
आज आपल्याकडे शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या वापराचे, ग्रंथालयाची सवय लावण्याचे शिक्षण दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा वापर करण्याची सवय लावणे किती महत्त्वाचे आहे हे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. ग. श्री. खैर यांनी आपल्या ‘ग्रंथालय सवय’ या लेखात सांगितले आहे.
मुक्त प्रवेश किंवा मुक्तद्वार पद्धत- मुक्तद्वार किंवा मुक्त प्रवेश पद्धतीत वाचक स्वत: ग्रंथसंग्रह कक्षात जाऊन आपल्याला हव्या असलेल्या ग्रंथाची निवड करू शकतो. ग्रंथाचा अधिकाधिक वापर होण्याच्या दृष्टीने ही एक आदर्श पद्धती आहे. डॉ. रंगनाथन यांच्या पंचसूत्रातील ‘ग्रंथ वापरासाठी आहेत’, ‘प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे’, ‘प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे’ आणि ‘वाचकांचा वेळ वाचावा’ या सूत्रांची परिपूर्ती ग्रंथालयात मुक्तद्वार पद्धती असेल तरच करता येते.
ग्रंथालय प्रसिद्धी- शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथालयाकडे आकृष्ट करून त्यांना वाचायला प्रवृत्त करण्यासाठी आणि ग्रंथालय कोणत्या सेवा देते याची माहिती करून देण्यासाठी ग्रंथालय प्रसिद्धीची फार गरज असते. ग्रंथालयाची वैशिष्टय़े, त्याची आकर्षणे, ग्रंथालय देत असलेल्या सेवा यांची प्रसिद्धी ग्रंथापालाला पुढील मार्गानी करता येते. उदा. ग्रंथप्रदर्शने, ग्रंथवेष्टने, सूचना-फलक किंवा प्रकटन-फलक, विशेष दिवसांची माहिती, ग्रंथालय दिवस, ग्रंथालय परिचय पुस्तिका किंवा पत्रक व ग्रंथपालाची कुशलता.
ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत आणि शालेय ग्रंथालये- जागतिक कीर्तीचे ग्रंथपाल आणि भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्रांविषयी आणि ग्रंथालयाविषयी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी ग्रंथालय शास्त्राची मूलतत्त्वे विशद करणारा ‘ग्रंथालय शास्त्राचे पाच सिद्धांत’ हा ग्रंथ १९३० साली लिहिला. ग्रंथपालनाचे एक शास्त्र आहे. कोणत्याही शास्त्राचे जसे काही मूलभूत सिद्धांत असतात तसे ग्रंथालय शास्त्राचे हे सिद्धांत आहेत. कोणत्याही प्रकारच्या ग्रंथालयात आपल्या वाचकांना चांगली ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या सिद्धांताचे पालन करावयास हवे, असे प्रतिपादन डॉ. रंगनाथन यांनी आपल्या या ग्रंथात केले आहे. शालेय ग्रंथालयाचा अधिकाअधिक वापर होण्याच्या दृष्टीने शाळा-चालक, शिक्षक, ग्रंथपाल यांनी या पंचूसत्रात अभिप्रेत असलेले विचार आचरणात आणले पाहिजेत.
डॉ. रंगनाथन यांची पंचसूत्री-
१) ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत.
२) प्रत्येक वाचकाला त्याला हवा असलेलाग्रंथ मिळाला पाहिजे.
३) प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळायला हवा.
४) वाचकांना वेळ वाचवा.
५) ग्रंथालय वर्धिष्णू आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना चांगली ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शाळेत एकत्र मध्यवर्ती ग्रंथालय असणे केव्हाही चांगले पण आजच्या शाळांच्या अडचणी लक्षात घेता सर्वच शाळांना ते उपलब्ध करून देता येत नाही. म्हणजेच आज बहुसंख्य शाळांतून वर्ग ग्रंथलयेच अस्तित्वात आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथलयातील साहित्याचा अधिकाधिक वापर करता यावा म्हणून शालेय ग्रंथपालाने ग्रंथ देवघेव, संदर्भ सेवा, ग्रंथालय तास यासारख्या सेवांचे आणि विद्यार्थ्यांना वाचायला प्रवृत्त करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे.
विद्यार्थ्यांना ग्रंथलयातील ग्रंथांचा मुक्तपणे वापर करण्याची, ग्रंथ हाताळण्याची संधी प्राप्त करून द्यायला हवी, असे केल्याने स्वाभाविकच ग्रंथांचा आणि ग्रंथालयांचा वापर वाढतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढते. आणि ते चांगले वाचक बनतात. शालेय ग्रंथपालाने विविध प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमांच्या आणि उपक्रमांच्या द्वारे ही माहिती विद्यार्थ्यांना करून द्यायला हवी. ग्रंथालयाची प्रसिद्धी करावयास हवी.
ग्रंथालय साहित्याचा आणि सेवांचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ करून देता यावा म्हणून शालेय ग्रंथपालाने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या पंचसूत्रांतून व्यक्त झालेले विचार सतत ध्यानात ठेवले पाहिजेत. त्यांचे विस्मरण त्याला होता कामा नये.
मुरलीधर हेडावू
मोबाईल- ९८९०४४९६८१.