Leading International Marathi News Daily
बुधवार, ३ जून २००९
  आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
  करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
  करिअर नामा
यू-टय़ूबची महती
  स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  मोठी स्वप्नं
  संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
  स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
  स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
  शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर

आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
‘थिंक ग्लोबली, अ‍ॅक्ट लोकली’च्या या जमान्यात ‘आंतरराष्ट्रीय विकास’ या क्षेत्रात असंख्य करिअर संधी उपलब्ध आहेत. ‘आंतरराष्ट्रीय विकासा’साठी झटणाऱ्या अनेक मल्टीलॅटरल एजन्सीजमध्ये जसे यूएन वा इतर एनजीओज् आहेत त्यांची संख्या १०० च्यावर आहे व यांना बुद्धिमान, मेहनती, प्रामाणिक व निडर मनुष्यबळाची आवश्यकता सतत भासते. जागतिक बँक (वर्ल्ड बँक)आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील अव्वल एजन्सी आहे.
गरिबी व दारिद्रय़निर्मूलन, पर्यावरण, अन्न वा त्याचा अभाव, आरोग्य, प्राणिजगत, पॉवर (वीज), शिक्षण यासारख्या समस्या तुम्हालाही भेडसावत असतील, अस्वस्थ करीत असतील, आपण यासाठी काहीतरी केले पाहिजे अशा विचारांचे मोहोळ जर
 

राहून राहून तुमच्या मनात उठत असेल आणि आपण नक्की यासाठी काही करू शकतो असा दुर्दम्य विश्वास जर तुमच्या अंतरात दाटला असेल तर युवकांनो, वर्ल्ड बँकेच्या करिअर्सचा खजिना तुमच्यासाठी उघडा आहे. हा खजिना लुटायला प्रामाणिक माणसांनाच प्रथम पसंती दिली जाते, हे मात्र ध्यानात असू द्या!
वर सांगितल्याप्रमाणेच इतरही अनेक समस्या वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या स्वरूपात उद्भवत असतात व त्यांचे निराकरण जागतिक राष्ट्रीय अथवा स्थानिक पातळीवर करायचे असेल तेव्हा ‘वर्ल्ड बँक’सारख्या एजन्सीज् पुढे येतात व अशा तऱ्हेच्या ‘आंतरराष्ट्रीय विकास’ क्षेत्राद्वारे आपले कार्य तडीस नेतात.
सर्वप्रथम ‘आंतरराष्ट्रीय विकास’ या संकल्पनेविषयी जाणून घेऊ या! ‘आर्थिक व सामाजिक परिस्थितीत सुधारणा घडवून सर्व जीवमात्रांना जगण्यासाठी किमान सुविधा उपलब्ध करून देणे’ अशी साधारणपणे ‘विकास’ या क्षेत्राची व्याख्या केली जाते; परंतु विकास क्षेत्रात काम म्हणजे ग्लॅमरचा अभाव, मोठमोठय़ा स्टार हॉटेल्समधल्या बैठका वगैरे कधीच नाहीत असे मात्र अजिबात नाही. या सर्व गोष्टी आधुनिक विकास क्षेत्रातील कार्यप्रणालीचा एक भाग तर आहेतच; परंतु या क्षेत्रातील काम हे ‘सीरियस’ असून तितकेच ‘रिवार्डिग’देखील आहे, कारण अक्षरश: लाखो लोक तुमच्या कामामुळे प्रभावित होत असतात. विकसित देशांद्वारे विकसनशील व गरीब देशांना आर्थिक व तांत्रिक पाठबळ पुरवणे ज्याद्वारे विकासाच्या संधी सर्वाना उपलब्ध होतील, ही संकल्पना ढोबळमानाने आंतरराष्ट्रीय विकासाची आहे. आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रात वर्ल्ड बँकेचे वर्चस्व वादातीत असून जगातील जवळजवळ सर्वच राष्ट्रांमध्ये तिचे अस्तित्व आहे.
‘वर्ल्ड बँक’ काय आहे?
विकसनशील देशांना त्यांच्या सर्वागीण विकासासाठी साहाय्य करणारी ‘वर्ल्ड बँक’ ही यूएनचीच संबंधित एक प्रमुख एजन्सी आहे. आजघडीला १८३ राष्ट्रे या बँकेचे सदस्य आहेत व शेअरहोल्डरही. जगभरात वर्ल्ड बँकेची अनेक ‘रिजनल सेंटर्स’ आहेत. बँकेचे नॉलेज नेटवर्क, विविध क्षेत्रातील जाणकार, अनुभवी व तज्ज्ञ मंडळींना त्यांचे ज्ञान व अनुभव ‘शेअर’ करण्याची संधी देते व त्याद्वारे एका ठराविक उद्दिष्टाकडे या मंडळींचा प्रवास सुरू होतो व जगभरात या उद्दिष्टपूर्तीसाठी ही मंडळी एकत्रितपणे झटत असतात.
विकसनशील देशांमधील विकासाशी संबंधित विविध पैलू जसे; पॉलिसी, पुनर्विकास, पुनर्निर्माण, सल्लागार सेवा अशा व इतर अनेक बाबींवर अगदी यातील प्रमुख अडचणी ओळखण्यापासून ते विकास कामांवर करडी नजर ठेवण्यापर्यंतच्या कामात संबंधित राष्ट्रांना डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून वर्ल्ड बँक सहकार्य करते.
वर्ल्ड बँक याच प्रमुख संस्थांची मिळून बनलेली आहे. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, मल्टिलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट अशा या पाच संस्था आहेत.
वर्ल्ड बँकेत काम करणारी मंडळी ही विविध धर्म, विविध सामाजिक पाश्र्वभूमी, विविध राष्ट्रीयत्व तसेच प्रोफेशन्सची असतात. सुयोग्य शैक्षणिक पात्रता असणाऱ्या अपंग मंडळींचेही येथे स्वागत होते. आपापले कार्य पार पाडताना खास ‘अचिव्हर्स’ना वर्ल्ड बँक विविध पुरस्कारांनी सन्मानित करते.
वर्ल्ड बँकेतील करिअरची सुरुवात कशी कराल?
आंतरराष्ट्रीय विकासाअंतर्गत प्रशासन, आरोग्य, शिक्षणसारख्या मूलभूत विषयांपासून ते मानवाधिकारापर्यंतचे अनेक विषय समाविष्ट असतात. वर्ल्ड बँकेत करिअर करण्याचा जर तुमचा निर्धार असेल तर यासाठी पहिली पायरी म्हणजे वर्ल्ड बँकेविषयीची माहिती सखोल जाणून घ्या.
तुम्ही जर अजून पदवी, पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले नसेल तर ते नीट पार पाडा. विकासाशी संबंधित विषय जसे न्यूट्रिशन, मायक्रोक्रेडिट, पाणी, मलनि:सारण या विषयांशी संबंधित तज्ज्ञ व अनुभवी मंडळींना लवकर संधी मिळते. परंतु अ‍ॅग्रीकल्चर, पब्लिक हेल्थ, इकॉनॉमिक्स, फायनान्स, पॉप्युलेशन, समाजकार्य/ समाजविज्ञान, वातावरण, प्रायव्हेट सेक्टर डेव्हलपमेंट या विषयातील तज्ज्ञांनाही उत्तम संधी उपलब्ध आहेत. तुम्ही अनुभव मिळवण्यासाठी व्हॉलंटीअर अथवा इंटर्निग एक्सपिरिअन्सद्वारे सुरुवात करू शकता. सुयोग्य अनुभवाशिवाय तुम्हाला येथे जॉब मिळणे दुरापास्त असते. व्हॉलंटीअर म्हणून काम करायचे असल्यास youthink.worldbank.org/ getinvolved/ resources.php ही लिंक जरूर बघा.
विकासाचे मुद्दे अथवा विषय काळानुसार बदलत राहतात. कुठलेही राष्ट्र, एकाच मुद्दय़ावर सतत भर देत राहात नाही. कारण जसजशी परिस्थिती बदलते तसतशा राष्ट्राच्या गरजा, अडचणी, इ. बदलत राहतात. त्यामुळे आज ज्या क्षेत्रात तुमचे करिअर
सुरू झाले तेच क्षेत्र सतत तुमच्या वाटय़ाला येईल असे वर्ल्ड बँकेच्या कार्यप्रणालीत संभवत नाही. तर तुमच्या अनुभवाचा फयदा होऊ शकेल असे दुसरे संबधित क्षेत्र काही काळानंतर तुम्हाला दिले जाऊ शकते.
येथे काम करताना प्रत्यक्ष फील्डवर जाऊन, लोकांमध्ये थेट मिसळून, त्यांच्याशी संवाद साधून मगच तुमच्या कामाबद्दल त्यांना सांगावे लागते. तुम्ही त्यांचे हितैषी आहात असा विश्वास तुम्हाला त्यांच्यात निर्माण करत यायला हवा. तसेच ज्या लोकांसाठी तुम्ही काम करता आहात ती बहुधा सुशिक्षित व सुसंस्कृत गटात मोडणारी असतात असे नाही. कारण ज्यांना अशा मदतीची गरज असते ही मंडळी अधिकतर गरीब अथवा विकसनशील राष्ट्रांतील गरीब, आदिवासी, अशिक्षित, कुपोषित, कुठल्या तरी व्याधीने पीडित, युद्धापासून सर्व प्रकारे गांजलेली, पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलाने सर्वाधिक बाधित झालेली, अंधश्रद्धांचा बळी ठरलेली इत्यादी असू शकतात. त्यामुळे त्यांच्यासोबत जाऊन जंगलांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहण्याची तुमची मानसिक व शारीरिक तयारी असायला हवी. बरेचदा वीजदेखील पोहोचलेली नाही अशा ठिकाणी, भरपूर डासांचे व इतर किडय़ांचे चावे सोसत कित्येक रात्री आम्ही काढल्या आहेत, असे वल्र्ड बँकेच्या सीनिअर सोशल सायंटिस्ट डेनिझ बहरोगलू म्हणतात. आपण राबवत असलेल्या प्रकल्पाचा संबंधित व्यक्तींवर काही नकारात्मक परिणाम होत नाही ना हे पाहणे व होत असेल तर त्यासाठी लगेच उपाययोजना करणे हे श्रीमती बहरोगलू यांचे काम आहे.
वल्र्ड बँकेत काम सुरू करताना ज्युनिअर प्रोफेशनल असोसिएटस् प्रोग्राम अंतर्गत विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळींना संधी मिळते. नव्याने रुजू झालेल्यांना वल्र्ड बँकेच्या कार्यप्रणालीची नीट ओळख व्हावी यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांत गुंतवले जाते. अर्जकर्त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तसेच बँकेच्या गरजा ओळखून यांना विविध प्रकल्प हाताळायला दिले जातात. यांच्याबरोबर अनुभवी मंडळींची टीमही असते.
वर उल्लेख केल्याप्रमाणे त्या त्या विषयातील केवळ पदव्युत्तर शिक्षण पुरेसे नसते. तुम्ही त्या त्या विषयाशी संबंधित पीएच. डी. किंवा इतर कोर्सेस केलेले असतील तर तुमचा विचार प्राधान्याने केला जातो. इंग्रजी भाषा उत्तम यायला हवी; त्याबरोबरच फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरेबिक, पोर्तुगीज किंवा चायनीज यापैकी एक-दोन भाषा जर तुम्हाला उत्तम प्रकारे येत असतील तर तुम्हाला संधी मिळण्याची शक्यता अधिक असते. उत्कृष्ट ‘अ‍ॅनालिटिकल स्किल्स’ तसेच ‘रिसर्च ओरिएंटेशन’ हेही क्रायटेरिया तपासून पाहिले जातात. कॉम्प्युटर सहजपणे हाताळता येणे, वेबजगाशी परिचित असणे आवश्यक मानले जाते. विश्वासार्हता, लवचिक स्वभाव, जबाबदारीची जाणीव, दोन भिन्न व्यक्तींमधले तसेच अनेक व्यक्तींमधले परस्परसंबंध समजून घेण्याची कुवत, उत्तम संभाषणकला या गोष्टीही उमेदवारांना निवडताना बघितल्या जातात. ज्युनिअर प्रोफेशनल असोसिएटस् प्रोग्रामसाठी अर्ज करताना तुमचे वय २८ वर्षे पूर्ण असायला हवे. तसेच तुमचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन जर तुम्ही पीएच. डी.साठी अर्ज केला असेल तरच तुम्हाला पात्र मानले जाते.
थोडक्यात विकास कामांबद्दल आस्था असणाऱ्या परंतु ध्येयवादी, कष्टाळू, बुद्धिमान व प्रामाणिक लोकांसाठी वल्र्ड बँकेच्या करिअर संधी हे आव्हान आहे. उत्तम पगार, इतर सोयीसवलती, भरपूर प्रवासाच्या संधी, आत्मविकासाला अमाप वाव व पीडित, रंजल्या गांजलेल्यांसाठी काहीतरी ठोस कार्य करताना मिळणारे आत्यंतिक समाधान या गोष्टी हे आव्हान पेलण्यासाठीचा तुम्हाला मिळणारा सर्वोत्तम मोबदला आहे.
शर्वरी जोशी
Sharvariajoshi@ indiatimes.com