Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

क्रीडा

मारिया शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात; सिबुलकोव्हा, सॅफिना उपान्त्य फेरीत
पॅरिस, २ जून / एएफपी

जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दिनारा सॅफिनाने फ्रेंच ओपनमधील आपली घोडदौड कायम राखली असून बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला १-६, ६-४, ६-२ असे पराभूत करीत तिने उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. सॅफिनाची उपान्त्य फेरीत स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाशी गाठ पडेल. सिबुलकोव्हाने उपान्त्यपूर्व फेरीत रशियाच्या मारिया शारापोव्हाचे आव्हान सरळ सेटमध्ये ६-०, ६-२ असे सहज संपुष्टात आणले.

अपेक्षांचे ओझे नको रे बाबा!
फेडररचा सावध पवित्रा
पॅरिस, २ जून / एएफपी
पीट सॅम्प्रसच्या १४ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांची बरोबरी करण्यासाठी स्वीत्र्झलडच्या रॉजर फेडररला आणखी तीन सामने जिंकायचे आहेत. त्यातच त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल चौथ्याच फेरीत गारद झाल्यामुळे फेडररच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. अपेक्षांच्या या ओझ्याखाली दबले जाण्याची भीतीही त्याला सतावते आहे. त्यामुळे राफेल नदाल असेल अथवा नसेल, आपल्यासमोर अजूनही खूप मोठे आव्हान शिल्लक आहे, अशी कबुली फेडरर देतो.

सेरेनाशी लढत म्हणजे मौज - कुझनेत्सोव्हा
पॅरिस, २ जून / एएफपी

फ्रेंच ओपनमधील महिलांच्या उपान्त्य फेरीत उद्या रशियाची सातवी मानांकित स्वेतलाना कुझनेत्सोव्हा व जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेली सेरेना विल्यम्स यांच्यातील जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत जेव्हा या दोघींची परस्परांशी गाठ पडली आहे, तेव्हा विल्यम्सचेच पारडे जड असल्याचे दिसले आहे. विल्यम्सने आतापर्यंतच्या सहा लढतीत कुझनेत्सोव्हावर पाचवेळा विजय मिळविला आहे. असे असतानाही कुझनेत्सोव्हावर सेरेनाच्या या आव्हानाचे दडपण नाही. ती म्हणते, मी सेरेनाचा खूप आदर करते. टेनिसमध्ये तिने खूप काही कमावले आहे.

माझ्या यशामागे कठोर परिश्रम- सचिन
नवी दिल्ली, २ जून/ वृत्तसंस्था

जीवनात अनेकदा असे क्षण आले की त्या वेळी क्रिकेटचा सराव वगैरे नकोसा वाटायचा.. सराव बुडवून मित्रांबरोबर चित्रपट पाहायला जाण्याची इच्छा व्हायची.. या क्षणांतून स्वत:ला सावरले आणि कठोर परिश्रम घेतले. त्यामुळेच आज मी यशाच्या शिखरावर उभा आहे.. हे बोल आहेत विक्रमवीर सचिन तेंडुलकरचे.‘जीक्यू’ या फॅशनविषयक मासिकाच्या ताज्या अंकात सचिनची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत सचिनने आपला विक्रमवीरापर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला आहे.

भारताचा ज्युनिअर हॉकी संघ विश्वचषकासाठी सिंगापूरला रवाना
भोपाळ, २ जून/ पीटीआय

सिंगापूर येथे होणाऱ्या नवव्या विश्वचषकासाठी आज भारताचा ज्युनिअर हॉकी संघ रवाना झाला. ७ ते २१ जून दरम्यान विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारतीय संघात १८ खेळाडूंचा समावेश असून दिवाकर रामकडे नेतृत्त्व सोपविण्यात आली आहे.यंदाच्या विश्वचषकात २० संघ सहभागी होणार असून मलेशिया आणि सिंगापूर हे दोन्हीही देश संयुक्त विद्यमाने यजमानपद भूषविणार आहेत. विश्वचषकाला रवाना होणाऱ्यापूर्वी भारतीय संघ गुरगाव येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) मैदानात गेले तीन महिने सराव करत होता.

न्यूझीलंडकडून विजयाचा ‘अ‍ॅक्शन रिप्ले’
भारताला ९ धावांनी नमविले
लॉर्ड्स, २ जून/ वृत्तसंस्था
ट्वेन्टी-२० मध्ये भारत विश्वविजेता असला तरी त्याला न्यूझीलंडला अजुनही नमवता आलेले नाही आणि याचाच ‘अ‍ॅक्शन रिप्ले’ पहिल्या सराव सामन्यातही पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या १७१ धावांचा पाठलाग करताना भारताला १६१ धावाच करता आल्या आणि नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

आयसीएलमधील ७९ खेळाडूंना बीसीसीआयचे अभय
मुंबई, २ जून/ क्री. प्र.

इंडियन क्रिकेट लीगमधील ७९ खेळाडू आणि ११ माजी खेळाडूंना अभय देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी या सर्व खेळाडूंनी बीसीसीआयला यासंदर्भात पत्र पाठविले होते. ‘झी’ समूहाने काढलेल्या आयसीएलला बीसीसीआय आणि आयसीसीने परवानगी नाकारली होती. त्यामुळे आयसीएलमधील खेळाडूंना ही स्पर्धा सोडल्यास इतर कोणत्याही क्रिकेटमध्ये खेळता येत नव्हते.

एअर इंडिया, ज्योती स्पोर्टस् क्लब यांना सुवर्णचषक
दिनेश-अनुपकुमार यांचा सर्वोत्तम खेळ
पनवेल, २ जून/ क्री.प्र.
अपेक्षेनुसार हैद्राबादच्या ज्योती स्पोर्टस् क्लबने महिला गटातील अंतिम विजेतेपदासह राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धा जिंकली. ज्योतीने निर्णायक सामन्यात अनपेक्षितपणे प्रवेश केलेल्या बिहार संघावर सरळसरळ मात केली. ज्योतीची राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी चौहान हिने सवरेत्कृष्ट खेळी केली. तिने प्रत्येक चढाईत गुण घेत आरंभालाच (मध्यंतर) २७-७ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ती उत्तरोत्तर वाढवित नेली. तेजस्विनी, ममता व अर्चना शिंदे यांनी विजेत्या संघाकडून सर्वोत्तम खेळ केला.

.. त्यामुळे इशांत स्विंग हरवून बसला- प्रभाकर
जयपूर, २ जून/ वृत्तसंस्था
जास्त वेगाने चेंडू टाकण्याच्या ध्यासामुळे इशांत शर्मा आपला स्विंग हरवून बसला आहे, असे मत भारताचा माजी कसोटीवीर मनोज प्रभाकर याने व्यक्त केले आहे.पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रभाकर म्हणाला की, इशांतला सध्या सतत १४० कि. मी. प्रती तास एवढय़ा वेगाने गोलंदाजी करण्याची इच्छा असते.एवढय़ा वेगाने चेंडू टाकत असताना त्याचे मनगट स्थिर दिशेत राहत नसल्याने त्याचे चेंडू पूर्वीसारखे स्विंग होत नाहीत. गोलंदाजीतील हा दोष इशांतने तातडम्ीने दूर करायला हवा. प्रभाकर सध्या राजस्थान रणजी संघाचा प्रशिक्षक आहे. त्याने सांगितले की, वेगवान गोलंदाजाचे मनगट चटकन वळणारे असले पाहिजे.इरफान पठाणचेही मनगट वळत नसल्याने त्याची गोलंदाजी प्रभाव पाडू शकत नाही. रुद्रप्रताप सिंग याला मनगट वळवण्याबाबत मी मार्गदर्शन केले होते. माझ्या सूचनांचा त्याने अवलंबही केला आहे, असेही प्रभाकर याने नमूद केले.

खोटे वय सादर करणारे ४६ बॉक्सर्स अपात्र;
राष्ट्रीय युवा बॉक्सिंग स्पर्धेतील धक्कादायक घटना
कोईमतूर, २ जून / पीटीआय
येथे सुरू झालेल्या ४२व्या युवा राष्ट्रीय पुरुष बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल ४६ बॉक्सर्सना खोटे वय दर्शविल्याबद्दल स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे महासचिव कर्नल पी. के. मुरलीधरन राजा यांनी सांगितले की, या स्पर्धेदरम्यान खेळाडूंची वैद्यकीय चाचणी तसेच क्ष-किरण चाचणी घेण्यात आली त्यातून ४६ खेळाडूंचे वय अधिक असल्याचे स्पष्ट झाले. या खेळाडूंना अपात्र ठरविण्यात आले असून या खेळाडूंच्या राज्य संघटनांना यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राजा यांनी सांगितले की, पुढल्या वर्षांपासून एखाद्या संघातील चार खेळाडू जादा वयाचे असल्याचे आढळून आल्यास संपूर्ण संघालाच बाद ठरविण्यात येणार आहे. प्रामुख्याने असे नमूद करावेसे वाटते की, खोटे वय सादर करणारी ही मुले हरयाणा, सेनादल, उत्तर प्रदेश या संघातील आहेत. या स्पर्धेत एकूण ३३ राज्यांतून १९७ बॉक्सर्स सहभागी झाले आहेत.

खडकवासला येथे आजपासून राष्ट्रीय नौकानयन स्पर्धा
पुणे, २ जून/प्रतिनिधी

‘मरिन सोल्यूशन राष्ट्रीय एंटरप्राईज चॅम्पियनशिप’ (एनआयईसी) ही राष्ट्रीय नौकानयन स्पर्धा ३ ते ६ जून या कालावधीत खडकवासला येथे आयोजित करण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) सेलिंग क्लब’ या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेत देशातील दीडशेहून अधिक स्पर्धक सहभागी होत आहेत. तीन जून रोजी सकाळी दहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.