Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

ठाण्यात नालेसफाईचा बोजवारा
ठाणे/प्रतिनिधी :
कोटय़वधी रुपये खर्चून शहरात नालेसफाई केली जात आहे. आतापर्यंत ८५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासन आणि सत्ताधारी करीत असतानाच प्रत्यक्ष शहरातील बहुतांश नाले अद्यापही भरलेलेच दिसून येताहेत. परिणामी, नालेसफाईचा पुरता बोजवारा उडाला असून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर महापौरांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार एकनाथ शिंदे, महापौर स्मिता इंदुलकर यांनी शहरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली होती.

सिडकोच्या ५०० कोटींच्या जमिनींवर भू-माफियांचा डल्ला
जयेश सामंत

ठाणे जिल्ह्य़ातील निरनिराळ्या शहरांमधील अनधिकृत बांधकामाचे दुखणे दिवसागणिक गंभीर रूप धारण करीत असतानाच संपूर्ण महाराष्ट्रात ‘सिटी विथ डिफरन्स’ या उक्तीने प्रसिद्ध पावलेल्या नवी मुंबईसारख्या उत्तम नियोजनाचा डंका पिटणाऱ्या नगरीत गेल्या दशकभरात सुमारे दीड लाखांच्या घरात अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, नवी मुंबईनंतर नियोजनकर्ते ज्या तिसऱ्या मुंबईकडे डोळे लावून बसले आहेत,

कल्याण-डोंबिवलीत अहोरात्र धो धो पाणी
गुरुवारी योजना जाहीर होणार

भगवान मंडलिक

येत्या दोन ते तीन वर्षांत कल्याण- डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना आठवडय़ातून ७ दिवस २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. नवी मुंबई शहराचे एमआयडीसीकडे साठा होत असलेले १०० दशलक्ष लिटर पाणी आणि जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानातून कल्याण- डोंबिवली पालिका प्रशासनाने हा नवीन पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार केला आहे. सन २०२६ पर्यंत शहराची लोकसंख्या सुमारे २० ते २२ लाख असणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून हे पाणी प्रकल्प प्रशासनाने तातडीने हाती घेतले आहेत.

बलुतेदारी कर्जाच्या विळख्यात!
सोपान बोंगाणे

बदललेल्या सामाजिक आर्थिक रचनेत सरकारी पाठबळाअभावी कर्जबाजारी झालेल्या बलुतेदार कारागिरांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. कारागिरांचे अनेक व्यवसाय डबघाईला आल्याने एकटय़ा ठाणे जिल्ह्यातच तब्बल साडेतीन लाख बलुतेदार असहाय्य आणि कर्जबाजारी झाले आहेत. शेतकऱ्यांप्रमाणे आमचीही कर्जे माफ केली जातील, असा मागणीवजा अपेक्षेचा सूर या छोटय़ा कारागिरांनी आता लावला आहे. अर्थात या कारागिरांची संख्या मोठी असली तरी ते असंघटित असल्याने त्यांचा आवाज क्षीण आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख लागले कामाला
ठाणे/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर सेनाभवनला झालेल्या बैठकीत नेतृत्व बदलाबाबत कोणतेही भाष्य कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी न केल्याने निर्धास्त झालेल्या जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे, महापालिकांत सत्ता असलेल्या प्रमुख प्रकल्पांची पाहणी करणे, अशा कामांद्वारे शिंदे जोमाने कामाला लागले आहेत. जिल्हाप्रमुखपदावरून त्यांना हटवावे यासाठी शिंदे यांचे विरोधक कार्यरत होते, मात्र विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षश्रेष्ठींनी त्याबाबत कोणतीही कारवाई टाळली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे भरून काढण्यासाठी विधानसभा निवडणुका ध्यानात घेऊन कामाला सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. युतीच्या काळात करण्यात आलेली विकासकामे जनतेसमोर पोचवण्यासाठी शिवसेनेतर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. ठाण्याचा बालेकिल्ला ढासळल्याने विधानसभा निवडणुकांमध्ये ठाणे विधानसभेसाठी चांगला उमेदवार देऊन मतदारांची नाराजी दूर करण्याचा सेनेचा प्रयत्न आहे.

‘११३ कोटी घोटाळ्याची चौकशी करा’
कल्याण/प्रतिनिधी -
कल्याण- डोंबिवली पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी करदात्या नागरिकांचे ११३ कोटी रुपये खाल्ल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शहरातील विविध स्तरांतील नागरिकांनी पोलीस, सीबीआय, न्यायालयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेतील अधिकारी वर्ग हे प्रकरण घडले त्यावेळी आम्ही या खुर्चीवर नव्हतो, अशी भूमिका आता घेत आहेत. ११३ कोटी रुपयांचा पालिकेचा तोटा होत असताना मुख्य लेखा परीक्षकांनी या फाईलवर सही केलीच कशी? मुख्य वित्त अधिकाऱ्यांना हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे असे वाटले नाही का, असे प्रश्न शहरातील जाणकार नागरिक व्यक्त करीत आहेत. अनेक नागरिकांनी न्यायमूर्तीना पत्र पाठवून हे प्रकरण जनहित याचिका म्हणून दाखल करून घ्यावे म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.
या सर्व हालचालींमुळे स्थायी समितीमधील सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रस्तावांवर सह्य़ा करणारे, वाढीव दरांना मंजुरी देणारे स्थायी समितीचे सदस्य यामुळे अडचणीत येणार आहेत.

बहुजन जागो अभियान
ठाणे/प्रतिनिधी:
राज्यात दलितांवर होणारे वाढते अत्याचार लक्षात घेता महाराष्ट्रात दलित सुरक्षा कायदा अस्तित्वात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला असून, या कायद्यासंबंधी जनजागृतीसाठी येत्या ४ जूनपासून शाहू महाराजांच्या करवीरनगरीत जनजागृती मोहीम सुरू करणार असल्याची माहिती कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बनसोडे यांनी दिली. या मोहिमेची माहिती देताना कर्मचारी महासंघाच्या ठाणे येथील विभागीय कार्यालयात ते बोलत होते. हे अभियान संपूर्ण राज्यात कर्मचारी महासंघाचे अ‍ॅड. आनंदराव माने, अ‍ॅड. पंडितराव लोखंडे, डॉ. प्रशांत साबळे, श्रीरंग वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, तसेच मुंबईत रिपाइंचे युवा नेते रमेश गायकवाड, जगदीश झाल्टे, मधुकर भोरे राबविणार आहेत.

मीडियातील करिअरच्या संधी
ठाणे-
सारथी स्कूल ऑफ मीडिया मॅनजेमेंट या प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षण संस्थेतर्फे मीडियातील करिअरच्या संधी या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवार, ७ जून रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत होणाऱ्या या कार्यशाळेत प्रसारमाध्यमातील विविध विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सरस्वती मराठी शाळेच्या क्रीडासंकुलात ही कार्यशाळा होणार आहे. संपर्क- २५४२६६०४.

स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात सेनेचा हल्लाबोल
ठाणे/प्रतिनिधी

स्टेशन परिसर वाहतूक सुधारणा अर्थात सॅटिस प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या फेरीवाले आणि अतिक्रमणवाल्यांविरोधात आता सेनेनेच दंड थोपटले असून, काल रात्री स्टेशन परिसरातील दुकानदार व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. आमदार एकनाथ शिंदे यांनी काल सॅटिस प्रकल्पाची पाहणी केली. फेरीवाले, रिक्षा आणि परिसरातील दुकानदारांचे अतिक्रमण यामुळे सॅटिसच्या कामात अडथळे येत असून लोकांनाही त्रास होतो, अशा तक्रारी आमदारांकडे यावेळी करण्यात आल्या. त्यानंतर रात्री सभागृह नेते पांडुरंग पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, नगरसेवक राम रेपाळे यांनी शिवसैनिकांसमवेत स्टेशन परिसरात अचानक हल्लाबोल केला. पालिका मुख्यालय उपायुक्त व्यंकटेश भट तसेच अतिक्रमण विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचल्यानंतर फेरीवाल्यांना पिटाळून लावण्यात आले. तसेच पदपथावर दुकाने थाटणाऱ्या व्यापाऱ्यांचे सामानही जप्त करण्यात आले. पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा फेरीवाल्यांना आशीर्वाद असून सेनेची सत्ता असूनही या अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. निवडणुका जवळ आल्याने सेनेला आता जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे वाटू लागले काय, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.

लघुउद्योजकांसाठी विनातारण कर्जविषयक कार्यशाळा
ठाणे/ प्रतिनिधी

उत्पादन क्षेत्रातील लघु व मध्यम उद्योजकांना विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून एक कोटी रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकते. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन शनिवार, ६ जून रोजी मुंबईत करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ७ या वेळेत अप्पर ग्राऊंड मजला, समृद्धी व्हेंचर पार्क, सीप्झजवळ, हॉटेल तुंगा पॅराडाइजपुढे, मरोळ एमआयडीसी, अंधेरी पूर्व येथे ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत बँक, सिडबी, सीजीटीएमएसई, चार्टड अकाऊंटट फर्मचे प्रतिनिधी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेसंदर्भात अधिक माहिती व नोंदणीकरिता लघु व मध्यम उद्योग विकास चेंबर ऑफ इंडिया, फोन-६१५०९८००, २८२५०४१५ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मालमत्तेच्या वादातून आजीची हत्या; नातवास अटक
बदलापूर/वार्ताहर:
मालमत्तेच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये आजीची हत्या करणाऱ्या नातवाला अंबरनाथ पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथच्या जावसई गावातील अंजनी उघाडे (७५) आणि नातू उमेश उघाडे यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीवरून रविवारी रात्री उशिरा भांडण झाले. रागाच्या भरात उमेश याने अंजनी उघाडे यांना ढकलून दिले आणि डोक्यात दगड मारला. यामध्ये अंजनी मरण पावल्या. आजूबाजूच्या रहिवाशांनी पोलिसांत तक्रार करताच उमेश उघाडे याला काही तासांत जेरबंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोडे यांनी दिली.

बदलापूरमध्ये राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा
बदलापूर/वार्ताहर:
येथील रचना कला केंद्राच्या शाखेतर्फे कै. कमलाबाई जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय खुली उत्तुंग एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेची प्राथमिक फेरी १० आणि ११ जून रोजी, तर अंतिम फेरी १४ जूनला होणार आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या एकांकिकेस कै. कमलाबाई नीळकंठराव जोगळेकर स्मृतिचषक, रोख पाच हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र तसेच द्वितीय एकांकिकेस कै. लक्ष्मीबाई नारायण लेले स्मृतिचषकासह तीन हजार रुपये रोख, तृतीय क्रमांकास कै. उर्मिलाबाई लक्ष्मणराव जोशी स्मृतिचषकासह एक हजार रोख, याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शन, अभिनेता-अभिनेत्री आदींना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. संपर्क- मानसी वैद्य- ९३२२५००३५८

गुंगीचे औषध देऊन चाकरमान्यांना लुटणाऱ्या चौकडीला अटक
कल्याण/वार्ताहर

लांबपल्ल्याच्या गाडय़ांमधील प्रवाशांशी दोस्तीचा बहाणा करून क्रीम बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन त्यांची शुद्ध हरपल्यावर त्यांचे किमती सामान लांबविणाऱ्या एका चौकडीला अटक करून, ३६०० रुपयांचे कापड व बॅगा असा मुद्देमाल हस्तगत केला. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी रेल्वे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुरेश पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली एक खास पथक तयार केले. या पथकाने विनोद राजू चौधरी, अर्जुनप्रसाद पाल, मुन्ना जमनालाल पाल, रामबाबू बद्रीप्रसाद पाल या चौकडीला अटक केली. त्यांच्याकडून ३६०० रुपये किमतीचे कापड, बॅगा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चौकडीकडून दोन गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जाधव यांनी पोलिसांना वेशांतर करून डय़ुटी करण्यास सांगितल्याने हा गुन्हा उघडकीस आला असल्याचे समजते.