Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

व्यक्तिवेध

लोकसभेच्या अध्यक्षपदी मीराकुमार यांची निवड झाल्यानंतर आणि उपाध्यक्षपद संकेतानुसार विरोधी पक्षाकडे सोपविण्याचा धोरणात्मक निर्णय कॉँग्रेस पक्षाने घेतल्यानंतर, भाजपमध्ये रविवारपासूनच सक्षम उमेदवाराचा शोध सुरू झाला होता. अध्यक्षपद महिलेकडे गेल्यानंतर उपाध्यक्षपदासाठी पुन्हा एका महिलेच्या नावाचा विचार होण्याची शक्यता दुरावली होती, पण त्याचबरोबर दलित महिलेला अध्यक्षपद मिळाल्याने आदिवासी वा ओबीसी उमेदवाराच्या नावाचा विचार सुरू झाला होता. गोव्यातून संसदेवर निवडून जाणारे ज्येष्ठ ओबीसी सदस्य व माजी मंत्री श्रीपाद नाईक यांचे तसेच माजी मंत्री व झारखंडमधील ज्येष्ठ आदिवासी

 

खासदार करिया मुंडा यांचे नाव अग्रभागी होते. पक्षाच्या संसदीय पदाधिकाऱ्यांच्या मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत मुंडा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आता तो शोध पूर्ण झाला आहे. मुंडा हे भाजपाचे झारखंडमधील ज्येष्ठ आदिवासी नेते. बिहारमधील रांची जिल्ह्यातील अनिगारानामक खेडय़ात १९३६ साली मुंडांचा जन्म झाला, बालपणही तिथेच गेले. रांची विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंडा सामाजिक कार्यात आले, राजकारणात शिरले. काही काळ त्यांनी शेतीही केली. पण शेतीपेक्षा त्यांना खुणावत होते ते सक्रीय राजकारण. लहानपणीच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला होता. संघाशी आलेल्या संबंधानंतर राजकारणात आलेल्या आणि यशस्वी झालेल्या मोजक्या आदिवासी तरुणांपैकी मुंडा एक होते. भारतीय जनसंघाच्या माध्यमातून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. बिहार प्रदेश जनसंघाचे सहसचिवपदही त्यांनी काही काळ सांभाळले. आणीबाणीनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत मुंडा लोकसभेवर निवडून गेले. १९८२ साली झालेल्या निवडणुकीत ते बिहार विधानसभेवर निवडून गेले. सुमारे सात वर्षे विधानसभेत काढल्यानंतर १९८९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा लोकसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. ७७ च्या निवडणुकीतला त्यांचा विजय सहाव्या लोकसभेचा, तर ८९ चा विजय नवव्या लोकसभेचा. त्यानंतर मात्र दहाव्या, अकराव्या, बाराव्या, तेराव्या लोकसभेवर ते सलग निवडून गेले. १४ व्या लोकसभेचा मात्र अपवाद ठरला. २००४ साली त्यांना विजय मिळाला नाही, पण २००९ च्या निवडणुकीत त्यांनी ती उणीव भरून काढली. पूर्वीच्या बिहारमधील आणि आताच्या झारखंडमधील खुंटी लोकसभा मतदारसंघ हा मुंडा यांचा पर्मनंट मतदारसंघ. ८९, ९१ व ९६ साली सलग विजय मिळवून मुंडा यांनी लोकसभेवर निवडून जाण्याची पहिली हॅटट्रिक साधली होतीच, पण त्यानंतर ९८ व ९९ ची निवडणूक जिंकल्यानंतर २००४ च्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला असता, तर मुंडा यांचा तो दुसऱ्या हॅटट्रिकचा क्षण ठरला असता. दुर्दैवाने त्यांची ती दुसरी हॅटट्रिक चुकली. संसद सदस्य या नात्याने संसदेच्या विविध समित्यांवर काम करण्याची संधी मुंडा यांना या प्रदीर्घ काळात मिळाली. पण ७७ साली मोरारजीभाई देसाई यांच्या आणि नंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मुंडा यांना मिळाल्याने त्यांना व्यापक क्षेत्राचा अनुभव मिळाला. खुंटी हा पारंपरिक मतदारसंघ आणि सुशीलाबाई केरकेरा या त्यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी उमेदवार. सुमारे तीन निवडणुकांमध्ये ही जोडी अशीच होती. मुंडांनी निवडणूक लढवायची आणि सुशीलाबाईंनी पराभूत व्हायचे हे जणू ठरूनच गेले होते. झारखंडमधील बाबूलाल मरांडी यांच्या सरकारविरोधात पक्षांतर्गतच आवाज उठताच करिया मुंडा यांना मुख्यमंत्री बनवा अशी मोहीम सुरू झाली होती. वाजपेयींनी तो अंतर्गत विरोध मोडून काढण्यासाठी मुंडा यांना केंद्रात मंत्री बनवले, राज्यातले सरकार टिकवले. अडचणीत असताना पक्षाने जबाबदारी टाकायची आणि मुंडांनी ती आपल्या परीने सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करायचे याच अध्यायातला एक नवा अध्याय उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने लिहिला गेला आहे.