Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

शालवाले बाबाला अकोल्यात अटक
दोन आठवडय़ातच दरबार गुंडाळला

अकोला, २ जून / प्रतिनिधी

रुग्णांच्या अंगावर शाल पांघरु न त्यांना बरे करण्याचा दावा करणाऱ्या शालवाले बाबा ऊर्फ गणेशभाई याला सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली. अकोला शहराच्या औद्योगिक वसाहत परिसरात त्याने दोन आठवडय़ांपासून दरबार थाटला होता. अमरावतीत पर्दाफाश झाल्यानंतर, अकोल्यात गणेशभाई नावाने या बाबाने त्यांचा दरबार भरवायला सुरुवात केली होती. रुग्णांच्या अंगावर शाल पांघरुन त्यांना बरे करण्याच्या या बाबाच्या प्रलोभनाला सामान्य नागरिक बळी पडत होते.

अमरावती शहर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत गटबाजीचे प्रदर्शन
अमरावती , २ जून / प्रतिनिधी

शहर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत गटबाजीचे खुले प्रदर्शन मंगळवारी पाहायला मिळाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीकडे पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. काँग्रेसचे केवळ दोन नगरसेवक यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरून डॉ. सुनील देशमुख आणि प्रकाश भारसाकळे या काँग्रेस आमदारांवरही काहींनी तोंडसूख घेतले. काँग्रेसच्या एका गटाच्या अघोषित बहिष्काराच्या सावटाखाली ही बठक आटोपली.

विकास कामे करणारा जनप्रतिनिधी
किरण राजदेरकर

भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी निर्माण होत असतानाच पुन्हा काँग्रेसकडे आलेल्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात आमदार दीनानाथ पडोळे यांनी भरपूर विकास कामे करून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्षाचे मोहन मते यांचा पराभव करून गोविंदराव वंजारी यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणल्यावर दोनच दिवसांनी गोविंदराव वंजारी यांचे हृदयविकाराने मुंबईत आकस्मिक निधन झाले.

आर्थिक मंदीतही ‘एमईएल’ नफ्यात -डी.पाल
चंद्रपूर, २ जून / प्रतिनिधी

जागतिक मंदीच्या लाटेमुळे एकीकडे सर्वच औद्योगिक क्षेत्रांना आर्थिक झळ सहन करावी लागत असताना येथील महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेडने (एमईएल) उत्पादकतेचा स्तर ढासळू न देता नफ्याचा आलेख कायम ठेवल्याची माहिती उद्योगाचे कार्यकारी संचालक डी. पाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक मंदीच्या काळातही हा उद्योग नफा कमावण्यात ‘एमईएल’ आघाडीवर आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट हा येथील पोलाद उत्पादनासाठी लागणाऱ्या ‘फेरो अॅलाय’ या कच्चा मालाचे उत्पादन करणारा उद्योग आहे.

‘शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा पुरवठा करा’
चंद्रपूर, २ जून /प्रतिनिधी

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा व्हावा या दृष्टीने कृषी विभागाने प्रयत्न करावा, असे निर्देश पालकमंत्री अनिस अहमद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विपीन शर्मा आणि सर्व विभाग खाते प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हय़ातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही. मागील वर्षी लष्करी अळी आली होती. तशी यावर्षी आली तर त्यावर उपाययोजना केल्या जाईल, याची माहिती पालकमंत्री अहमद यांनी घेतली आणि याबाबत विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना कृषी विभागाला दिल्या. जिल्हय़ातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचे पैसे किती वाटप झाले याचा सुद्धा आढावा यावेळी घेण्यात आला असून चालू वर्षांत शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज वाटपाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या. तसेच पाणी टंचाईबाबत उपविभागीय स्तरावर काय कार्यवाही सुरू आहे. याचासुद्धा आढावा घेण्यात आला असून पुढील पंधरा दिवस पाणी आला नाही तर काय उपाययोजना करण्यात येईल, याची माहिती पालकमंत्री यांनी बैठकीत घेतली. तसेच भारनियमनावरही चर्चा करण्यात आली.

मूर्तीजापूर तालुक्यात चारा टंचाई
मूर्तीजापूर, २ जून/ वार्ताहर

जिल्हा प्रशासनाद्वारे मूर्तीजापूर तालुक्यात चाराडेपो उभारण्याची आधी घोषणा केली तरी मात्र अद्यापपर्यंत याबाबत कुठलीच अंमलबजावणी न झाल्यामुळे तालुक्यात तात्काळ चारा डेपो सुरू करण्याची मागणी करून गुरे तहसील कार्यालय आवारातच आणून सोडण्याचा पशुपालकांनी इशारा तालुका प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात येथील उपविभागीय अधिकारी रमेश घेवंदे यांना पशुपालकांनी मोर्चाद्वारे मागणीचे निवेदन सादर केले. पाणी टंचाई सोबतच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न यावर्षी भीषण झाला तरी जिल्हा प्रशासनाने चारा डेपोचा केवळ आराखडा घोषित केला. मात्र, प्रत्यक्षात चारा डेपोची उभारणी झाली नाही. परिणामी जनावरांवर उपासमारीची पाळी येऊन ठेपल्याने पशुपालक हैराण झाले. त्यामुळे अनेकांनी आपली जनावरे विक्रीसाठी बाजारात मांडण्याचे प्रकार वाढले असून कत्तलखानेवाले पशुपालकांच्या या हैराणीचा मनमानेल भावाने खरेदी करून फायदा उचलत आहेत. पशुपालकांच्या मागणीची तात्काळ दाखल न घेतल्यास जूनच्या पहिल्याच आठवडय़ात पशुपालक आपली जनावरे तहसीलच्या आवारात आणून सोडतील व त्यांच्या चारा -पाण्याची जबाबदारी प्रशासनावर सोडतील, असा इशारा राजू वानखडे, भाऊराव भटकर, तस्लीमा खां बिसमिल्ला खां, धर्मपाल राऊत, श्रीकांत वानखडे, अ. जब्बार अ. सईद, आर.के. देशमुख यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

आर्णीत बौद्धाचार्य श्रामनेर शिबीर
आर्णी, २ जून / वार्ताहर

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या आर्णी शाखेच्या वतीने दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचा नुकताच समारोप झाला. येथील वैभवनगरमधील बुद्ध विहारात आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रवी भगत यांच्या हस्ते झाले या शिबिरात आर्णी, घाटंजी, मारेगाव, नेर, यवतमाळ, राळेगाव तालुक्यातील सुमारे ३० भन्तेनी यावेळी सहभाग घेतला. दहा दिवस रोज सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत अश्या दोन सत्रात भन्ते बुद्धपालजी यांनी बौद्ध धर्माचा इतिहास व मनुष्य धर्माचे पालन कसे करायचे? या विषयी मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप तालुकाध्यक्ष नालंदा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. प्रास्ताविक गौतम वाकोडे यांनी केले तर संचालन दिलीप मनवर यांनी केले. या शिबिराला अहमदनगर येथील के.डी. रणदिवे अध्यक्ष म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखेचे सदस्य संजय खोब्रागडे, आनंदराव अंबोरे, सहदेव चहांदे, विनोद भगत, युवराज गोसावी, देवानंद भगत, सुधाकर पाटील, जीवन खाडे, विष्णू इंगोले, सुमेध भगत, कैलास कांबळे, सुधाकर मेश्राम, धर्मेन्द्र उमरे, प्रल्हाद कांबळे, के.के. पाईकराव, प्रतिक वाकोडे, अनिल भवरे, कैलास कांबळे, संतोष मेश्राम, विलास कांबळे, प्रदीप भगत, किरण कानंदे, नामदेव बागेश्वर, राहुल मानकर, दादाराव तक्रनारायण आदींनी सहकार्य केले.

जुगार अड्डय़ावर छापा; सात शिक्षकांना पकडले
गोंदिया, २ जून / वार्ताहर

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे जुगार अड्डय़ावर पोलिसांनी छापा टाकून अकरा आरोपींना पकडले. यात सात शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक योगीराज गोपीचंद मेश्राम, रा. पांढरी, आश्रमशाळा शेरेपार, इसन कवास रा. हलबीटोला, जिल्हा परिषद शाळा सीतेपार, कामेश्वर माणिक बिसेन, रा. शिवणरोल, जिल्हा परिषद शाळा पांढरी, मनोज मोतीलाल मेश्राम रा. पांढरी, जिल्हा परिषद शाळा डुंडा, रामेश्वर परसराम चिंधालोरे, अनिल देवाजी मेंढे (३५), गणेश दुलिचंद पटले, पुंडलिक भरत राणे, चंद्रगुणी मणिराम भोवते, पृथ्वीराज लक्ष्मण चवरे, प्रकाश सावजी भोंडे सर्व रा. पांढरी यांच्यावर जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

वडिलांनी केली मुलाची हत्या
भंडारा, २ जून / वार्ताहर

दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास दिल्याने वाद होऊन वडिलांनी मुलाला उभारीने मारले. यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान रविवारी मृत्यू झाला. रघुनाथ दादाजी भानारकर रा. मोहरना (लाखांदूर) असे मृताचे नाव आहे. मोहरणा येथील दादाजी भानारकर यांचे दोन मुले, मुलगी व पत्नी असे कुटुंब आहे. मात्र, सदाजी नेहमीच दारू पिऊन घरच्यांना त्रास देत होता. त्यांचा मोठा मुलगा रघुनाथ काही दिवसांपूर्वी गावात आला होता. शनिवारला दादाजी दारू पिऊन घरी आला. त्याने नेहमीप्रमाणे दुसरा मुलगा आणि पत्नीसोबत भांडण केले. ते पाहून रघुनाथने त्याच्यासोबत वाद घातला. यात थोडी झटपटही झाली. यात दादाजीला इजा झाली. दरम्यान, रात्री दादाजी घरी आला त्यावेळी घरचे सर्व झोपले होते. झोपलेला मोठा मुलगा रघुनाथवर बापाने उभारीने वार केले. त्याचवेळी त्याच्या पत्नीला जाग आली. तिने आरडाओरड केल्याने गावकरी जमा झाले. त्यांनी रघुनाथला लाखांदूर येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला ब्रह्मपुरी व तिथून नागपूरला हलविण्यात आले. उपचारा दरम्यान रविवारला त्याचा मृत्यू झाला.

मार्कफेडकडून मिळालेले खत विकण्याची परवानगी
यवतमाळ, २ जून / वार्ताहर

जिल्ह्य़ात मार्कफेडकडून प्राप्त झालेल्या एकूण ३६४३ मे. टन डी.ए.पी. खताच्या साठय़ापैकी जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये एक हजार मे. टन. खत शेतकऱ्यांना विकण्यासाठी परवानगी दिली आहे. उपरोक्त २,६४३ मे. टन साठय़ातून पांढरकवडा येथील खरेदी विक्री संघात ३० मे. टन मारेगाव येथे खरेदी विक्री संघात ४०० मे.टन. आर्णीमध्ये स्वस्तिक जिनिंग व प्रेसिंग इंडस्ट्रीज गोदामात ४०० मे. टन, पांडुरंग मेहेंद्रे यांना ३०० मे. टन व पुसद येथे खरेदी विक्री संघाला १०४३ मे. टन या प्रमाणात खत पाठविण्यात आले आहे. संस्थेचे स्टॉकबुक व खताचा साठा संबंधित गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तपासावा प्राप्त झालेल्या साठय़ापैकी ३८ टक्के साठा विक्रीची परवानगी देण्यात आली असल्याने तसे प्रमाणपत्र कृषी अधिकाऱ्यांनी साठा रजिस्टरवर नोंदवावा. ज्या शेतकऱ्यांना खताची विक्री करण्यात येईल त्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती रजिस्टरमध्ये प्रपत्र एक मध्ये खत विक्रेत्याने ठेवणे बंधनकारक आहे. जे खत विक्रेते सदर माहिती न ठेवता डी.ए.पी. खताची विक्री करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेश संबंधित गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी द्यावे.

‘प्रवेशासाठी देणगी मागणाऱ्या शिक्षण संस्थांची तक्रार नोंदवा’
यवतमाळ, २ जून / वार्ताहर

शाळेतील प्रवेशासाठी देणगी मागणाऱ्या खाजगी प्राथमिक शाळा विरुद्ध शैक्षणिक संस्था (देणगी प्रतिबंधक) अधिनियम १९८७ नुसार कारवाई होऊ शकते. असे प्रकार आढळल्यास संबंधित पालकांनी पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक आठवले यांनी केले आहे. या अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्यास किमान एक ते दोन वर्ष कारावास तसेच पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्याच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. शाळा व्यवस्थापक, शैक्षणिक संस्था यांनी प्रवेशासाठी देणगीची मागणी केल्यास अथवा अशी देणगी स्वीकारल्यास त्या संस्थेविरुद्ध ३० दिवसांच्या आत आवश्यक पुराव्यासह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविता येईल. जिल्ह्य़ातील अशा कोणत्याही खाजगी प्राथमिक शाळा देणगी मागत असल्यास त्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी या विषयीच्या कार्यवाहीसाठी उपशिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांची जिल्हा स्तरावर नेमणूक केली आहे.

धिंड प्रकरण, दोषींवर कारवाईची मागणी
मूर्तीजापूर, २ जून / वार्ताहर

वाडेगाव येथील ७० वर्षीय दलित विधवेची मांत्रिक असल्याचा आरोप करून २३ मे रोजी गाढवावर धिंड काढल्याचा घृणास्पद घटनेचा मूर्तीजापूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध करून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात मूर्तीजापूर तालुका चर्मकार महासंघाने उपविभागीय अधिकारी घेवंदे यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. या प्रकरणी न्यायालयासमोर जलदगतीने दोषारोप ठेवण्यात यावे, अशा आशयाची मागणी करणाऱ्यांमध्ये राजकुमार नाचणे, विजय तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती नाचणे, साहेबराव मोहोकार, रणजित इंगोले, अवधुत खंडारे, दीपक वाडेकर, अशोक काकडे, गणेश खंडारे, श्रीकृष्ण शंकर ठाकरे, श्रीकृष्ण तायडे, शंकर नाचणे, सुभाष वानखेडे, ज्योती माहोकार, शंकर नाचणे, महादेव काळे, हिंमत खंडारे, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

वीज कोसळल्याने उंटासह मुलाचा मृत्यू
भंडारा, २ जून / वार्ताहर

भंडारा जिल्ह्य़ात सोमवारी दुपारी वादळी पावसाला प्रारंभ झाला. त्यातच वीज कोसळून चिखली येथील गणपत मेहर यांच्या शेतात मेंढपाळासह एक उंटही ठार झाला. भंडारा तालुक्यासह लाखनी मोहाडी, साकोली, लाखांदूर पवनी तालुक्यात पावसाने हजेरी दिली. त्यात वादळी वारा आणि विजेनेही प्रताप दाखविला. चिखली या गावात शेतात मेंढपाळांनी मेंढय़ा बसविल्या होत्या. सोबत उंटही होते. दुपारी २.३० च्या सुमारास वीज कोसळली आणि १३ वर्षीय मेंढपाळ विक्रम मालू तळवी जागीच ठार झाला. शेजारी उभ्या उंटाचाही मृत्यू झाला. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिसांनी घेतली आहे. भंडारा तालुक्यातील आमगाव येथे झाडावर वीज कोसळली. यावेळेस गावातील आनंदराव लुटे यांच्या चहाच्या टपरीत सहा ग्राहक थांबले होते. विजेमुळे हे सहाही हिरालाल भगवान गायधने (२८), केशव लक्ष्मण भोतमांगे (२५), गणेश भोतमांगे (२५), रवी गायधने (२०), काशीनाथ लुटे (२९), रोशन भोतमांगे (२२) बेशुद्ध पडले. यातील हिरालाल गायधने यांना लवकर शुद्ध आली नाही व प्रकृती चिंताजनक झाली. इतरांना थोडय़ा वेळातच शुद्ध आली.

जामपूरच्या तलावात भावंडाचा मृत्यू
चंद्रपूर, २ जून/ प्रतिनिधी

जामपूरच्या तलावात सोमा बल्ला राठोड (२८) व प्रभू बल्ला राठोड (२४) या दोन मेंढपाळ भावंडाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आली. राजस्थान येथून आलेले मेंढपाळ सोमा व प्रभू राठोड मेंढय़ा व उंटांना पाणी पाजण्यासाठी पोंभूर्णा तालुक्यातील जामपूर येथील तलावात घेऊन गेले. मेंढय़ा व उंटांनी पाणी पिल्यानंतर काही मेंढय़ा तलावात फसल्या. त्यांना बाहेर निघता येत नव्हते. मेंढय़ांना बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम सोमा पाण्यात उतरला. पाण्यातून मेंढय़ा बाहेर काढण्यात त्याला यश आले. मात्र सोमाला बाहेर पडता येत नव्हते. सोमाला तलावातून बाहेर काढण्यासाठी प्रभू पाण्यात उरतला. मात्र या दोघांनाही पाण्याबाहेर निघता आले नाही. बराच वेळ तलावातील खोल पाण्यात हातपाय हलवल्यानंतर थकलेल्या दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोंभूर्णा पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थानी पोहोचले. दोघांचेही मृतदेह तलावातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले.