Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

विशेष लेख

लोहपुरुषाचे स्वप्न भंगले!

सारी ताकद पणाला लावूनही हाती करवंटीच येते तेव्हा माणसाचा क्षोभ अनावर होतो. हीच क्षुब्धावस्था पुढे त्याला निराशा आणि वैफल्याच्या वाटेवर आणून सोडते. परिणाम व्हायचा तोच होतो.. माणूस आपला आत्मविश्वास गमावून बसतो आणि सुरू होतो परतीचा पळपुटा प्रवास.. घेऊन जातो त्याला दूर, त्याच्याच ध्येयांपासून.
नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनी हे वास्तव अधोरेखित करून लालकृष्ण अडवाणींमधील पोकळ लोहपुरुषाचे पितळ उघडे पाडले आहे. सत्तेच्या शिखरस्थानी विराजमान होण्याचे स्वप्न मनोमन जोपासणाऱ्या लालकृष्णांना युपीएकडून हा अहेर मिळाला आहे.. सध्या कुरकुरत का होईना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारायला ते तयार झालेत खरे; परंतु १५ व्या लोकसभा निवडणूक निकालांच्या घोषणेनंतर लगोलग त्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला नकार दिला तेव्हा लोकांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. लोहपुरुष अडवाणींच्या मनाची अशी ‘चलबिचल’ ही गोष्टच अनपेक्षित होती.
लोकसभा मतदानाची पाचवी फेरी संपल्यानंतर दिल्ली येथील केंद्रवर्ती कार्यालयातील सभेत कार्यकत्यांचे आभार मानताना ते म्हणाले होते, ‘जनतेने आपले मत नोंदवले आहे. १६ मे रोजी जनादेश हातात येईल; आता यापुढे आपण भगवद्गीतेतील उपदेशानुसार वागणे उचित ठरेल. अत्यंत निष्ठापूर्वक आपण आपले कर्तव्य पार पाडले आहे आणि कर्मफलाचा अधिकार अर्थातच परमात्म्याकडे आहे. जनतेचा आदेश आपण अत्यंत नम्रपणे व आदरपूर्वक स्वीकारणार आहोत..’ हे त्यांचेच शब्द आणि निकाल जाहीर होताक्षणी त्यांनी घेतलेला पवित्रा किती

 

परस्परविसंगत आहेत! डळमळणाऱ्या जहाजाला वादळाच्या कचाटय़ात सोडून स्वत:चा जीव बचावीत पळू पाहणाऱ्या कप्तानासारखी ही वर्तणूक त्यांच्यासारख्या ‘पोलादी’ पुरुषाला शोभत तर नाहीच किंबहुना पक्षाच्या अशा आणीबाणीच्या प्रसंगी विरोधी पक्षनेतेपद नाकारून राजकारण संन्यासाची भाषा करणारे अडवाणी ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान! आपण कोरडं पाषाण’ या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. त्यांच्याशिवाय भाजप? हे कसे शक्य आहे? म्हणूनच ऊरबडवेपणा सुरू झाला. या लोहपुरुषाची मनधरणी करण्यासाठी जो तो धावत सुटला. ‘अगं, अगं म्हशी’ मला कुठे नेशी?’ सारखा सारा प्रकार. मनधरणी आणि मान घेणं या सोहळ्यात संघ मुख्यालयानेदेखील भाग घेतला आणि हुश्श! एकदाचे अडवाणी राजी झाले. मन वळवणाऱ्यांचे घोडे गंगेत न्हाले!
वास्तविक या लोकसभा निवडणूक प्रचारात ‘देशाचा भावी सक्षम पंतप्रधान’ या भूमिकेतच अडवाणी वावरले. दिल्लीतील भाजपा केंद्रवर्ती कार्यालयासमोर झळकणाऱ्या महाकाय फलकावर अत्यंत ठाशीव अक्षरांमध्ये लिहिले आहे, ‘मजबूत नेता, निर्णायक सरकार.’ देशात आर्थिक मंदीने मांडलेले थैमान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगार संत्रस्त तरुण, शिक्षण- आरोग्य, अन्नधान्य-पिण्याचे पाणी अशा अत्यंत मूलगामी समस्यांनी जनजीवन वेढून टाकलेले असताना त्याकडे कानाडोळा करीत भाजपाने ‘कणखर नेतृत्वा’च्या मुद्दय़ाला प्राधान्य देऊन कर्नाटकापासून कन्याकुमारीपर्यंत डॉ. मनमोहनसिंग एक दुबळा-नेभळा पंतप्रधान असल्याचे कंठशोष करीत सांगितले. त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मुभा नाही. प्रत्येक बाबतीत ते सोनिया गांधींच्या तोंडाकडे पाहतात. अशा कळसूत्री बाहुल्याला राष्ट्र कसे सांभाळता येईल? अफजल गुरूच्या फाशीचा मुद्दा पुढे करून देशात जातीय तणाव वाढवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आणि आज..? भक्कम पंतप्रधान होण्याचे ते स्वप्न असे क्षणार्धात विरून गेले? युद्धाला सुरुवातही झाली नाही आणि हा शूर वीर तलवार म्यान करून रणांगणातून काढता पाय घेऊ लागला, याला म्हणावे तरी काय? पुळपुटेपणा की वैफल्य?
आम्हाला असे वाटते की, ‘या देशाचे हिंदू राष्ट्रात रूपांतर होऊ शकत नाही’ याची पुरेपूर खात्री आता लालकृष्ण अडवाणींना पटली असावी. येथील सर्वसमावेशक सांस्कृतिक वारसा नष्ट करून जातीय वादाच्या वर्चस्वाला सत्तेच्या कोंदणात बसविणे वाटते तितके सोपे नाही. अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांची नासधूस आणि भगव्या पलटणीकडून ओकले जाणारे जाती- धर्मद्वेषाचे गरळ आता सामान्य जनता सहन करणार नाही. आधी उत्तर प्रदेश, मग राजस्थान आणि आता ओरिसातील निवडणूक निकालांनी भाजपच्या मनोरथांना लगाम घातला. अशा स्थितीत आणखी पाच वर्षे लोकसभेत विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्यात काय हशील? १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपास १८२ जागा मिळाल्या होत्या. २००४ च्या निवडणुकीत १३८ पर्यंत घसरण होऊन आता तर चक्क ११६ ची अधोगती प्राप्त झाली आहे. २००४ मधील निवडणुकीत मिळालेली २२.१६% मतं आणि आता १८.८%, जनतेने दिलेला हा कौल पाहता भाजपची घसरगुंडी अधिक उतरणीची झाली आहे. ‘बच्चा-बच्चा राम का, मंदिर के काम का’, ‘मंदिर वहीं बनाएंगे’ यांसारख्या घोषणांची जादू आता ओसरली आहे. सेतुसमुद्राचा मुद्दा लोकांना भावला नाही आणि कंधमालमध्ये तर भाजप तोंडावरच आपटला. भाजपने नरेंद्र मोदी आणि वरुण गांधींना ‘हिरो’ बनवण्याचा प्रयत्न केला; तो निव्वळ वाया गेला. पिलीभीत येथे वरुण गांधीने जो जातीय विखार ओतला त्याची जनमानसात कडवट प्रतिक्रिया उमटली. नरेंद्र मोदी यांना भाजपने ज्या रीतीने ‘स्टार’ प्रचारक बनवून २०१४ मधील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून बाशिंग बांधले त्यास रालोआच्या घटक पक्षांनी तीव्र विरोध केला. अशा स्थितीत रालोआची एकात्मता अखंड ठेवणे हेदेखील एक आव्हानच झाले. पोलादी पुरुष अडवाणींना आता हे कळून चुकले आहे की, ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ आणि ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ यांचा भुलभुलैया आता लोकांच्या चांगलाच ध्यानात आला आहे. अशा स्थितीत पलायन आणि संन्यासाचा मार्ग चोखाळू नये तर मग त्यांनी करावे तरी काय?
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची धूळधाण झाली तेव्हा माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या सेवानिवृत्तीचा फतवा जारी केला होता. ‘आपला दत्तक जावई रंजन भट्टाचार्य यास सरकार आणि पक्षाच्या कामकाजात ढवळाढवळ करण्याची मोकळीक दिली व वाजपेयींनी स्वत: कुठलेही उल्लेखनीय काम करून दाखविलेले नाही’, असे विधान करून सुदर्शन थांबले नाहीत तर त्यांच्या रुपात अत्यंत निकृष्ट पंतप्रधान समोर आला असून त्यांनी हिंदुत्वाच्या चळवळीचेदेखील मोठे नुकसान केले आहे, असेही आरोप करण्यात आले.
संघाने सदैव आपल्या छुप्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी वाजपेयींच्या मुखवटय़ाचा वापर केला. वाजपेयींनी नेहमी उदारमतवादी धोरणांची पाठराखण केली. आपल्या आयुष्यात त्यांनी कधीही कडवेपणाचे उघड उघड समर्थन केले नाही. रालोआच्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत मंदिर उभे राहू शकले नाही याची खंत संघाला आजही वाटते. त्याचप्रमाणे कलम ३७० रद्द करणे असो की समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न असो, राजकारणात त्यांनी जातीयवाद आणि धार्मिक कट्टरतेचे उघड समर्थन कधी केले नाही. त्यामुळेच ते संघाच्या डोळ्यातला ‘सल’ होऊन राहिले. वाजपेयींच्या लोकप्रियतेसमोर अडवाणींची प्रतिमा नेहमी खुजीच राहणार याची संघाला पुरेपूर कल्पना होती. वाजपेयी आहेत तोवर अडवाणी पंतप्रधान होऊच शकत नव्हते. म्हणूनच वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत अडवाणींसाठी उपपंतप्रधानपदाची निर्मिती करून वाजपेयींच्या वारसदाराच्या रुपात त्यांना सादर करण्याची धडपड भाजपने केली; परंतु जनताजनार्दनाच्या मनात काही वेगळेच होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान होण्याच्या शक्यतेने जोर धरताच जनतेने स्वत:हून या धार्मिक जातीयवादी राजकारणास सुस्पष्टपणे नकार दिला. परिणाम? पोलादी पुरुष लालकृष्ण अडवाणींचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्नदेखील कायमच्यासाठी अंतर्धान पावले.
प्रा. रामसागर पांडे
(अनुवाद : प्रा. हिरा भुजबळ)