Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

विविध

हाफिजच्या सुटकेवर भारताची तीव्र नाराजी
नवी दिल्ली, २ जून/खास प्रतिनिधी

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली गेल्या सहा महिन्यांपासून नजरकैदेत असलेल्या जमात-उद-दवाचा संस्थापक हाफिज सईदची सुटका करण्याच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आज दिल्लीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुंबईवरील हल्ल्याची चौकशी करणाऱ्या पाकिस्तानच्या प्रामाणिकतेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह लागले आहे, असे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.

भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ऑस्ट्रेलिया स्थापणार ‘टास्क फोर्स’
मेलबर्न, २ जून/पी.टी.आय.

ऑस्ट्रेलियातील भारतीयांवरील हल्ल्याबाबत भारताने घेतलेल्या गंभीर भूमिकेमुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे. ही घोषणा आज ऑस्ट्रेलियाच्या ‘पार्लमेंट’मध्ये करण्यात आली. हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाईच्या सर्व त्या प्रक्रिया प्रशासनाकडून याआधीच करण्यात आल्या आहेत.

मोठय़ा पराभवानंतरही भाजप नेत्यांमध्ये पदांसाठी तीव्र स्पर्धा..
नवी दिल्ली, २ जून/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षित मोठा पराभव होऊनही त्यातून बोध न घेता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये पदांवरून मानापमानाचे नाटय़ रंगत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापाठोपाठ लोकसभेतील उपनेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची निवड निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी वेंकय्या नायडू यांची निवड होण्याची शक्यता आहे. लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेतेपद तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद आणि उपनेतेपदावरून भाजपमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

मीराकुमार, मुंडा यांची आज बिनविरोध निवड होणार
नवी दिल्ली, २ जून/खास प्रतिनिधी

लोकसभा अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीराकुमार तर उपाध्यक्षपदी भाजपचे करिया मुंडा यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता उद्या पार पडेल. आज काँग्रेसतर्फे मीराकुमार यांच्या उमेदवारीचे १३ अर्ज दाखल करण्यात आले, तर भाजपने उपाध्यक्षपदासाठी ७२ वर्षीय आदिवासी नेते मुंडा यांचे नाव निश्चित केले. मीराकुमार आणि मुंडा यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. पहिल्या महिला लोकसभाध्यक्ष म्हणून इतिहास घडविणार असलेल्या मीराकुमार यांनी महिलांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.

लंडनच्या हॉटेलात तब्बल २००० पौंडाची ‘करी’
लंडन, २ जून/पी.टी.आय.

जगभरातील ‘हॉटेल’ उद्योग आर्थिक मंदीच्या कचाटय़ात आले असले, तरी येथील प्रख्यात भारतीय रेस्टॉरंटमध्ये जगातील सर्वात महागडी करी आजपासून उपलब्ध होणार आहे. या ‘करी’ची किंमत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २ हजार पौंड इतकी आहे. ‘ताज हॉटेल्स’च्या मालकीच्या ‘बॉम्बे ब्रेसेरी’ या रेस्टॉरंटने ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ या चित्रपटाच्या डीव्हीडी प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने या करीची घोषणा केली आहे. ‘समुंदरी खजाना’ नावाच्या या करीमध्ये माशांची अंडी (कॅव्हिअर), शिंपल्या, चिंबोरी आणि सोन्याचा वर्ख आहे.

काश्मीरप्रश्नी पाकचा पुन्हा कांगावा
इस्लामाबाद, २ जून/पीटीआय

जम्मू-काश्मीरमध्ये चालविलेली दडपशाही आता थांबवावी अशी मागणी करून पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आज भारताविरोधात कडक पवित्रा घेतला.
इस्लामाबाद येथे आझाद काश्मीर कौन्सिलने आयोजित केलेल्या सभेत बोलताना गिलानी पुढे म्हणाले की, स्वयंनिर्णयाच्या हक्क मिळण्यासंदर्भात काश्मिरी लोकांनी केलेल्या मागणीला पाकिस्तानचा राजकीय, नैतिक व राजनैतिक पाठिंबा आहे. भारत-पाकिस्तान व परिसरामध्ये शांतता नांदण्यासाठी आधी काश्मीर प्रश्न सुटणे आवश्यक आहे.

‘अमेरिका आपली मूल्ये इतर देशांवर लादणार नाही’
लंडन, २ जून/वृत्तसंस्था

आमची मूल्ये आम्ही इतर देशांवर लादू इच्छित नाही पण लोकशाही आणि कायद्याचे राज्य ही वैश्विक संकल्पना असल्याने त्याबाबत आमचा आग्रह निश्चितच राहील, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.ओबामा सौदी अरेबिया आणि इजिप्तच्या दौऱ्यावर जात असून नंतर ते युरोपचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या मूल्यांबाबत आम्ही आग्रही आहोत त्यांची जपणूक करून आम्ही प्रथम आदर्श निर्माण केला पाहिजे. त्यासाठी क्युबातील ग्वांटानमाओ बे येथील छळछावणी बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ही छावणी २२ जानेवारी २०१० पर्यंत बंद होईल.प्रत्येक देशाचा इतिहास आणि संस्कृती वेगळी आहे. तेव्हा आम्ही आमची मूल्ये दुसऱ्यांवर लादू, असा विचार जर अमेरिका व अन्य कुणी करणे घातकच आहे. मात्र लोकशाही, कायद्याचे राज्य, भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य ही केवळ पाश्चात्यांची मूल्ये नाहीत. ती सार्वत्रिक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रसारासाठी आग्रही राहिलेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सौदी अरेबिया, इजिप्त व युरोपच्या दौऱ्यात मी त्यासाठी आग्रही राहीनच. मात्र नुसत्या प्रचारापेक्षा आपणही त्या मूल्यांच्या जपणुकीतले ‘रोलमॉडेल’ बनले पाहिजे, असा माझा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नारायणन, नायर पदावर कायम
नवी दिल्ली, २ जून / पी.टी.आय.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि पंतप्रधानांचे मुख्य सचिव टी. के. ए. नायर या दोघांनाही पुढील आदेश मिळेपर्यंत पदावर कायम राहण्यास सांगण्यात आले आहे. ही दोन्ही पदे पंतप्रधानपदाशी निगडित असल्यामुळे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांना पदावर कायम राहण्याचा सल्ला दिला. इंटेलिजन्स ब्यूरोचे माजी प्रमुख असलेल्या नारायणन यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या मोठय़ा अधिकाराच्या पदावर २००५ मध्ये नियुक्ती झाली होती. निवृत्त आय. ए. एस. अधिकारी असलेल्या नायर यांना २००४ साली पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

पुरीतील साधू मौनीबाबा यांची हत्या
पुरी, २ जून/पी.टी.आय.

मौनीबाबा या नावाने परिचित असलेले साधू रामचरण दास यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण हत्या केली. येथील कुंभारपाडा या भागात आज सकाळी हा प्रकार घडला. मौनीबाबा नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी आश्रमाबाहेर पडले असता त्यांच्यावर हल्लेखोरांनी वार केले, अशी माहिती पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी दिली. या प्रकरणी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मौनीबाबा यांचा गुरुकृपा आश्रम येथील कुंभारपाडय़ातील महावीर कॉलनीत आहे. ते ओरिसातील मठ महंत संघटनेचे सक्रिय सभासद होते. गेल्या वर्षी विश्व हिंदू परिषदेचे नेते स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येनंतर मौनीबाबा यांनी निषेध कार्यक्रम हाती घेतले होते.

गटारात पडलेला मुलगा बेपत्ताच
बंगलोर, २ जून/वृत्तसंस्था

शहरातील उघडय़ा गटारात रविवारी पडलेल्या पाच वर्षांच्या अभिषेकचा देह अद्याप महापालिकेच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे. आपल्या आईबरोबर तो घरी परतत असताना गटारात पडला होता. बंगलोर महापालिकेने अभिषेकच्या पालकांना आज एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊ केले पण त्यांनी ते धुडकावले. आम्हाला आमच्या मुलाचा पत्ता लावून द्या, भरपाई देणे अमानुष आहे, असे शोकसंतप्त पालकांनी सांगितले. पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळजवळ दहा किलोमीटपर्यंत आम्ही शोध घेतला असून तो अद्याप जारी आहे.