Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

व्यापार - उद्योग

देशाच्या संरक्षणविषयक उणीवांचे परीक्षण करण्यासाठी संरक्षण तज्ज्ञांचा‘थिंक टँक’
व्यापार प्रतिनिधी:
संरक्षणविषयक विदेशी तज्ज्ञांच्या सल्ल्याऐवजी आपल्याला स्थानिक अनुभव अधिक उपकारक ठरेल. अमेरिकेने ९/११ घटनेसाठी जो मार्ग स्वीकारला तोच आपल्याला २६/११ साठी वापरात आणता येणार नाही. प्रत्येक देशाची संरक्षणासंबंधी आपली स्वत:ची योजना असायला हवी, अशी टिप्पणी प्रख्यात संरक्षण तज्ज्ञ व ‘मायक्रो सिक्युअर थिंक टँक (एमएसटीटी)’चेअध्यक्ष विजय मुखी यांनी केली. मायक्रो टेक्नॉलॉजीज इंडियाने दहशतवादाविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात नवीन आणि अद्य्यावत तंत्रासंबंधी शिक्षण तसेच प्रबोधनाचे लक्ष्य ठेऊन ‘एमएसटीटी’ नावाच्या ना-नफा तत्त्वावरीलसंरक्षण व्यासपीठाची स्थापना केली आहे.

आरती इंडस्ट्रीजच्या नफ्यात १२० % वाढ
व्यापार प्रतिनिधी:
विशेष रसायनांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आरती इंडस्ट्रीज लिमिटेडची निव्वळ विक्री आणि संबंधित उत्पन्न चालू आर्थिक वर्षांत ५० टक्क्यांनी वाढून ते २००७-०८ या वर्षांत असलेल्या रु. ८९६.३ कोटींवरून यंदा रु. १३४१.४ कोटी झाले आहे. त्याचबरोबर करोत्तर नफ्यातही वर्ष ते वर्ष आधारावर १२० टक्क्यांनी वाढ झालेली असून तो याच कालावधीत ३६.७ कोटी रुपयांवरून ८०.७ टक्क्यांवर गेला आहे. कंपनीची प्रति समभागामागील मिळकत गेल्या वर्षांतल्या ५.०४ रुपयांवरून ११.०८ रुपयांवर गेली आहे. पाच रुपये दर्शनी मूल्याच्या समभागासाठी कंपनीने प्रत्येकी रु. १.८० हंगामी लाभांश दिला होता आणि आता कंपनीने प्रति समभाग १.२० रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे वर्षांसाठी एकूण सरासरी लाभांश पाच रुपयाच्या समभागासाठी प्रत्येकी तीन रुपये झाला आहे.

जोसेफ मॅसी एमसीएक्स स्टॉक एक्स्चेंजचे नवे सीईओ
व्यापार प्रतिनिधी:
भारताचे नवीन स्टॉक एक्स्चेंज ‘एमसीएक्स-एसएक्स’च्या वरिष्ठ संचालकांमध्ये तसेच नेतृत्वपदांमध्ये महत्त्वाचे फेरबदल केले गेले आहेत. एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून जोसेफ मॅसी यांची नियुक्ती घोषित करण्यात आली असून, माजी केंद्रीय वित्त सचिव अशोक झा यांची बिगर कार्यकारी अध्यक्षपदावर नियुक्ती घोषित करण्यात आली आहे. जोसेफ मॅसी मल्टि-कमॉडिटी एक्स्चेंजचे (एमसीएक्स) व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून आजवर कार्यरत होते, त्यांच्या जागी विद्यमान सह-व्यवस्थापकीय संचालक लॅमन रटेन यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. काकोडकर यांनी तब्येतीच्या कारणाने निवृत्ती मागितल्यामुळे त्यांच्या जागी अशोक झा यांची एमसीएक्स-एसएक्सचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली आहे. झा हे १ ऑगस्ट २००९ पासून एमसीएक्स-एसएक्सचा संचालक मंडळाचा कार्यभार स्वीकारतील. या व्यतिरिक्त यूटीआयचे माजी अध्यक्ष एस. ए. दवे यांची एमसीएक्स-एसएक्सचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती घोषित केली गेली आहे. अल्पावधीत भारतातील आघाडीचे करन्सी एक्स्चेंज बनलेल्या एमसीएक्स-एसएक्सवर लवकरच इक्विटी (समभाग), बॉण्ड, एसएमई, आयआरडी आणि अन्य बाजार घटकांचे व्यवहार सुरू करण्याचा मानस झा यांनी व्यक्त केला आहे.

महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या विक्रीत ४६ % वाढ
व्यापार प्रतिनिधी:
महिंद्रा उद्योग समूहातील महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फार्म इक्विपमेंट विभागाने (एफईएस) मे महिन्यात देशाच्या ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रात आघाडी टिकविली आहे. महिंद्रा एफईएस विभागाचे अध्यक्ष अंजनीकुमार चौधरी याबाबत म्हणाले की, मे २००९ महिन्यात विक्री ४६ टक्के वाढून १२८७० ट्रॅक्टरपर्यत पोहोचली आहे. तसेच वर्तमान वित्तीय वर्षांत कंपनीने स्थानिक व निर्यात बाजारपेठ मिळून एकूण २५१४० ट्रॅक्टर विक्री केली आहे. गतसालच्या तुलनेत या विक्रीत ३९ टक्के वाढ झाली आहे. गतसाली या कालावधीत कंपनीने एकूण १८११५ ट्रॅक्टर विक्री केली होती. मे महिन्यात कंपनीने एकूण ६३० ट्रॅक्टर निर्यात केले असून गतसाली याच महिन्यात ६४५ ट्रॅक्टर निर्यात केले होते.

‘लॉरिएल इंडिया’ची मुलींसाठी विज्ञान शिष्यवृत्ती
व्यापार प्रतिनिधी:
लॉरिएल इंडिया कंपनीतर्फे दरवर्षी यंग विमेन इन सायन्स स्कॉलरशिप्स या शिष्यवृत्ती दिल्या जातात. यंदाच्या (वर्ष २००९) शिष्यवृत्तीसाठी कंपनीने महाराष्ट्रातील होतकरू व पात्र विद्यार्थिनींनी अर्ज पाठविण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे हे सलग सातवे वर्ष आहे.द ओरिएल इंडिया महाराष्ट्र राज्यातील पाच विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देणार आहे. प्रत्येक शिष्यवृत्ती अडीच लाख रुपयांची असून भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालय अथवा विद्यापीठात वैज्ञानिक क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी चार वर्षे मुदतीसाठी दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षा चालू शैक्षणिक वर्षांत (मार्च २००९ अखेर संपलेल्या) उत्तीर्ण केलेल्या, पीसीएम/ पीसीबी विषयगटांत किमान ८५ टक्के गुण मिळविलेल्या आणि ३१ मे २००९ रोजी वय १९ वर्षांपुढे नसलेल्या विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. शिष्यवृत्तीचे अर्ज www.foryoungwomeninscience.com या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून, ३० जून २००९ पूर्वी ते भरून पाठवावयाचे आहेत.