Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

अग्रलेख

आपण सारे उपरे..

 

भारतीय ‘वंशा’चे सुमारे १२ लाख विद्यार्थी भारताबाहेर शिक्षण घेत आहेत. (‘भारतीय’ असा ‘वंश’ मानववंशशास्त्रात नाही, परंतु ‘मूळचे’ भारतीय असलेल्यांना तसे संबोधायची प्रथा गेली काही वर्षे पडली आहे.) या १२ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे एक लाख ऑस्ट्रेलियात आहेत. साधारणपणे साडेतीन लाख अमेरिकेत आहेत. ब्रिटनमध्येही दोन लाखांच्या आसपास आहेत. कमी-अधिक प्रमाणात कॅनडा, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, रशिया, आखाती देश अशा बऱ्याच ठिकाणी असे भारतीय विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. बहुसंख्य विद्यार्थी इंग्रजी भाषिक देशांमध्ये आहेत. कारण इंग्रज राजवटीमुळे भारतीय उपखंडात इंग्रजी भाषेचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर झाला. देशभर, विशेषत: मध्यमवर्गात, इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयात पाल्यांना घालण्याची पद्धत रूढ झाली आहे. शालान्त परीक्षेनंतर वा पदवी प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी इंग्लंड-अमेरिका-कॅनडा-ऑस्ट्रेलियात जाण्याला भारतात अवास्तव प्रतिष्ठा आहे. त्या देशांमधल्या सर्टिफिकेट, डिप्लोमा, पदवी वा साध्या ‘शॉर्ट टर्म फेलोशिप्स’ना भारतातच नव्हे तर तिसऱ्या जगातील सर्व देशांत असेच महत्त्व आहे. त्या देशांमध्ये शिकायला जाणाऱ्यांपैकी बहुतेकांची मनीषा तिकडेच स्थायिक व्हायची असते. या मध्यमवर्गाव्यतिरिक्त इतरही स्तरांतून स्थलांतर करणाऱ्यांचाही एक प्रचंड मोठा वर्ग आहे. हॉटेल्स-रेस्तराँमध्ये काम करणारे, टॅक्सी वा ट्रक चालविणारे, घरकाम करणारे, हॉस्पिटल्समध्ये नर्स वा वॉर्डबॉय म्हणून नोकरी करणारे, सफाई कामगार, सुतार-गवंडी काम करणारेही या गौरवर्णीय, विकसित देशांमध्ये जातात. काही नशीब काढण्यासाठी, काही भारतातील जाचाला कंटाळून, काही आकर्षण वा साहस म्हणून तर काहीजण भारतात कसलीच आशा नाही म्हणून. या ‘कनिष्ठ’ वर्गातून गेलेले त्याच देशात स्थायिक होतात आणि त्यांची मुले तेथील शाळा-महाविद्यालयात जातात. त्यांचे उत्पन्न वाढलेले असते. पण ते उच्चभ्रू मध्यमवर्गातले नसतात. आपल्याच देशातले तेथे राहणारे उच्चवर्णीय, सुस्थित वा सधन, विद्याविभूषित लोक या ‘कनिष्ठ’ भारतीयांना कसे वागवितात हे ज्यांनी पाहिले-अनुभवले आहे, त्यांना या प्रकारच्या ‘आधुनिक’ उच्चनीचतेची कल्पना आहे. बहुसंख्य मध्यमवर्गीयांची (आयआयटी-आयआयएम-मेडिकलसकट) इच्छा अमेरिकेला जाण्याची असते. इतर स्तरांतही तीच इच्छा असली तरी अमेरिकन प्रशासन व्हिसा देताना उच्चशिक्षितांना प्राधान्य देते. याचा अर्थ अमेरिकेला जाणारे सर्वजण ‘आयटी’वालेच असतात असे नाही. परंतु या क्षेत्रातील लोकांचे व्हिसा पाच-दहा हजारांनी कमी होण्याची शक्यता जरी दिसली तरी भारतीय मध्यमवर्गात अस्वस्थता व घबराट पसरते. जे विद्यार्थी-विद्यार्थिनी म्हणून जातात, त्यांना आपण सहजच तेथील व्यवस्थेत सामील होऊ असे वाटत असते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे (साधारणरणे १९७० पर्यंत) इंग्लंडला जाण्याची प्रथा होती. आज ज्या प्रकारची चर्चा ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या संबंधात चालली आहे, तशीच वा त्याहूनही गंभीर चर्चा साठीच्या दशकात इंग्लंडमध्ये चालू होती. ‘नॅशनल फ्रंट’ नावाच्या राजकीय संघटनेने तर अशी मागणी केली होती की, सर्व आशियातील लोकांना- मुख्यत: अर्थातच भारतीयांना- त्यांच्या देशातून हाकलून देण्यात यावे. ‘या उपऱ्यांचे लाड’ आपण चालू देता कामा नयेत. ‘नॅशनल फ्रंट’च्या या वंशवादी भूमिकेला काही सुशिक्षित (सुसंस्कृत!) इंग्लिश लोकांचाही (मीडियाचासुद्धा) पाठिंबा होता. ‘जे लोक इंग्लंडमध्ये राहतात, पण क्रिकेट सामन्यांच्या वेळेस इंग्लिश संघाऐवजी आपल्या मूळ देशाच्या बाजूने टाळ्या वाजवितात, त्यांना या देशात राहायचा हक्क असता कामा नये. त्यांना घालवून दिले पाहिजे’ असे म्हणणाऱ्यांनी त्यांच्या भूमिकेचे नावच ‘क्रिकेट टेस्ट’ असे दिले होते. असे हल्ले, हंगामा व हाहाकार झाला तेव्हा भारत हा देशच गरीब (भुकेला!) म्हणून ओळखला जात होता. अमेरिकेतही नव्वदीच्या दशकात थोडेफार असे हल्ले भारतीयांवर झाले. निषेधसभा-निषेध खलिते झाले. मग स्थिरस्थावर झाले. ऑस्ट्रेलियात शिकायला जाण्याची प्रथा पडली ती इंग्लंड व अमेरिका येथील संधी आकुंचन पावल्यानंतर किंवा ज्यांना इंग्लंड-अमेरिकेत शिकण्याची/ नोकरीची/ एच वन वा ग्रीनकार्डची शक्यता नव्हती, त्यांचा (मुख्यत: मध्यमवर्गीय) पर्याय ऑस्ट्रेलिया होता. ऑस्ट्रेलियालाही अशा सुशिक्षित भारतीयांची व कुशल कामगारांची गरज होती. इंग्लंडला तर आपल्या (लयाला गेलेल्या) साम्राज्याचा एवढा गर्व आहे की, ते ऑस्ट्रेलियाला नफरतीनेच वागवितात. (अजूनही ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रध्वजावर ब्रिटिश झेंडय़ाचे संलग्न अस्तित्व आहे आणि राणीही!) ऑस्ट्रेलिया गौरवर्णीय व विकसित देश असला तरी एकूण विज्ञान, तंत्रज्ञान, कॉर्पोरेट, शिक्षण क्षेत्रात आघाडीवर नाही. क्रिकेट व इतर काही खेळ यापलीकडे ऑस्ट्रेलियाचा जागतिक दबदबाही नाही. लोकसंख्या महाराष्ट्राच्याही एकतृतीयांश आणि देशाचा आकार संपूर्ण भारताच्या जवळजवळ चौपट. इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर, अ‍ॅकॅडमिक क्षेत्र या सर्वात ऑस्ट्रेलिया भारताच्या मागे आहे. त्यांना कुशल कामगारांची जशी गरज आहे तशीचइंजिनियर- आयटीवाल्यांचीही. त्यांची विद्यापीठे आर्थिकदृष्टय़ा अवलंबून आहेत ती इतर देशातील विद्यार्थ्यांच्या फीवर. सुमारे ६० कोटी डॉलर्स इतके उत्पन्न त्यांच्या विद्यापीठांना भारतीयांकडून मिळते. म्हणजेच ऑस्ट्रेलिया त्या दृष्टिकोनातून भारतावर (व इतरही देशांवर) अवलंबून आहे. परंतु जवळजवळ सर्व गौरवर्णीय देशांत इतर वर्णाविषयी थोडय़ाफार प्रमाणात तरी नफरत आहेच. याचा अर्थ असा नाही की, ते सर्व वंशवादी आहेत. किंबहुना त्या देशांमध्ये राहणारे बहुतेक भारतीय त्या गौरवर्णीयांपेक्षा अधिक वंशवादी/ धर्मवादी/ जातीयवादी आहेत. त्यामुळे आपणच त्या गोऱ्या वंशवादाचे बळी आहोत असे आकांडतांडव करणे म्हणजे आत्मवंचना आहे. याउलट बहुसंख्य गोऱ्यांनी बराक हुसेन ओबामा यांची अध्यक्षपदी निवड केली. ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांवरचे हल्ले निषेधार्ह असले, तरी त्यामुळे त्या देशात नागरिकत्व मिळवू पाहणारे, शिकायला जाऊ इच्छिणारे वा व्यवसाय करू पाहणारे कमी होणार नाहीत. कारण ऑस्ट्रेलियाची जशी ती गरज आहे, तशीच हजारो भारतीयांचीही ती सामाजिक/सांस्कृतिक वा आर्थिक गरजही आहे. शिवाय त्या देशात हा वंशवादी जाच आहे हे पाहून भारतीय विद्यार्थ्यांनी ऑस्ट्रेलियातील तमाम आशिया-आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनाही बरोबर घेऊन निषेध संघटित करायला हवा होता. ऑस्ट्रेलियातील या सर्व विद्यापीठांमध्ये मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, कोरिया, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश त्याचप्रमाणे आफ्रिकेतील अनेक देशातील विद्यार्थी आहेत. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न भारतीय विद्यार्थ्यांनी केला नाही. याचे एक कारण अनेक भारतीय मुले-मुलीही स्वत:कडे उपजत श्रेष्ठत्वाच्या भावनेने पाहतात. त्यांची खंत ही असते की, त्यांना गौरवर्णीय, उच्चपदस्थ, प्रतिष्ठित समाजात पूर्णपणे सामावून घेतले जात नाही. वस्तुत: हे स्वयंभू सुसंस्कृत भारतीय जसे आपल्या मायदेशी वागतात, तसेच तेथेही वागतात. त्यामुळे भारतीयांबद्दल शिक्षण, हुशारी इत्यादी गोष्टींबद्दल आदर वाटला तरीही त्यांना तसा समभाव मिळतोच असे नाही. तुलनेने अमेरिकेत ही सांस्कृतिक विषमता बरीच कमी झाली आहे. इंग्लंडपेक्षाही अधिक सामाजिक समरसता आज अमेरिकेत आहे. जागतिकीकरणानंतर हे तथाकथित वंशवादाचे प्रश्न अधिक तीव्रतेने उफाळून वर आले. याचे मुख्य कारण हेच की गेल्या १५ वर्षांत भारताची आर्थिक प्रगती मोठय़ा प्रमाणात झाली आणि भारताचा दबदबा वाढला. शैक्षणिक क्षेत्रात भारतीय विद्यार्थी सगळीकडेच आघाडीवर असतो. त्यामुळे स्थानिक समाजात भारतीयांबद्दल असूया निर्माण होत होती. एकेकाळी गरीब व कंगाल असलेला हा गहूवर्णीय लोकांचा देश कॉर्पोरेट रूम्समध्ये आणि विद्यापीठांमध्ये उच्चपदस्थ झालेला, त्या दृष्टिकोनातून मागे राहिलेल्या गोऱ्यांना, त्यांच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेला धक्का देत होता. मुंबईत, दिल्लीत वा गोव्यात, युरोप-अमेरिकेतील मुलींवर बलात्कार होतात, त्यांच्यावर गुन्हेगारी हल्ले होतात, खूनही होतात. पण म्हणून त्या देशांमध्ये भारतविरोधी मोर्चे निघत नाहीत. जागतिकीकरणामुळे अवघ्या समाजांमध्ये सांस्कृतिक बदल होत आहेत, त्याचबरोबर तणाव वाढत आहेत. सर्वानाच वांशिक-धार्मिक-राष्ट्रीय-जातीय-वर्णीय अस्मितांचा त्याग करावा लागणार आहे. कारण आपण सर्वच कुठे ना कुठे त्या अस्मितांच्या दृष्टिकोनातून उपरेच आहोत. दुर्दैवाने भारतीय समाज धर्म-वर्ण-जातीने एकारलेला राहिला आहे. ऑस्ट्रेलियातील वंशद्वेष्टय़ा हिंसाचाराचा निषेध व्हायलाच हवा व तो आपल्या देशाने केलेलाच आहे. पण आपण आत्मपरीक्षणही करायला हवे.