Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

नवी पद्धत,नवीन स्पर्धक
स्टार प्रवाहच्या ‘जोडी जमली रे’ या आगळ्यावेगळ्या रिअॅलिटी शोचे नवे पर्व आजपासून सुरू होतेय. विवाह जुळविण्याच्या या रिअॅलिटी शोमध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला जातो. गुरुवारपासून नवीन सहा स्पर्धक प्रेक्षकांसमोर येणार आहेत. विवाहासारखा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेताना स्पर्धक कशा प्रकारे विचार करतात, त्यांची मते काय आहेत, त्यांच्या पालकांची मते त्यांना पटतात का अशी साधकबाधक चर्चा ‘जोडी जमली रे’ या कार्यक्रमात नेहमी केली जाते. त्यामुळे जोडीदार निवडताना तसेच इंटरॅक्टिव्ह खेळ खेळताना सर्वच स्पर्धक मोकळेपणी वागू शकतात. वेळोवेळी त्यांना कविता मेढेकर आणि अतुल परचुरे हेही खूप चांगल्या प्रकारे सहाय्य करतात. नेहमीसारखे इंटरॅक्टिव्ह खेळ आणि ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट’ तर असतीलच पण त्याचबरोबर आता स्पर्धकांना एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे सुसंवाद साधता यावा, त्यांना एकमेकांशी मोकळेपणाने बोलता यावे यासाठी ‘जोडी जमली रे’मध्ये नवी पद्धत विकसित करण्यात आली आहे. गुरुवारच्या भागात नवीन स्पर्धकांशी सूत्रसंचालक जोडी कविता मेढेकर आणि अतुल परचुरे ओळख करून देतील. ओळख परेडनंतर स्पर्धक मुली जोडीदार निवडीबाबत आपली मते मांडतील. मुलींना ‘प्रपोज’ करण्याचा एक गमतीदार खेळही गुरुवारच्या भागात पाहायला मिळेल.
प्रतिनिधी

आजार शोधणारे भ्रमणध्वनी
अनेकदा आपल्यावर बिकट प्रसंग ओढवले, जिथं कुठलीही वैद्यकीय मदत मिळणं सहज शक्य नाही, अशा ठिकाणी आपण किंवा आपल्याबरोबरचं कुणीतरी आजारी पडतं. नेहेमीच्या गोळ्यांनी ताप कमी होत नाही. आजाराची लक्षणंही नेहेमीच तापाची नसतात. अशा प्रसंगी आपण गडबडून जातो. कुणाचीही अशी गडबड होऊ नये म्हणून डॅनिअल फ्लेचर या अभियंत्याने भ्रमणध्वनीचा वापर करून आजाराचा पत्ता लावायचं एक तंत्र शोधून काढलंय. त्याच्या भ्रमणध्वनीतच त्यानं थोडी सुधारणा केली. त्याला एक परिदर्शकासारखी जोडणी बसवली. रुग्णाच्या त्वचेवर हा परिदर्शकासारखा भाग न्यायचा किंवा एखाद्या काचेच्या स्वच्छ तुकडय़ावर रुग्णाच्या रक्ताचा एक थेंब घ्यायचा आणि त्या दिशेनं परिदर्शकाचं (पेरिस्कोपचं) मुख करायचं, एक बटण दाबायचं आणि संदेश पाठव, अशी आज्ञा भ्रमणध्वनीला द्यायची. दहा मिनिटाच्या आत रोगाचं निदान तुम्हाला तुमच्या भ्रमणध्वनिपटलावर पाहता येईल. तुम्ही जिथं असाल तिथं तुम्हाला त्या रुग्णाला काय झालंय हे कळू शकेल. फक्त तुम्ही ज्या भागात असाल तिथं भ्रमण ध्वनिसंदेश वहनाचे मनोरे जवळपास असायला हवेत. याला फ्लेचर ‘सेलस्कोप’ असं म्हणतो. ही भ्रमणध्वनी रोगनिदान यंत्रणा निर्माण करण्याची कल्पना कशी सुचली. फ्लेचर बर्कले इथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात जीव अभियांत्रिकी विषयाचा शिक्षक आणि संशोधक आहे. विद्यार्थ्यांना एखादा प्रकाशकीय यंत्रणेसंबंधी प्रकल्प द्यावा, असा विचार त्याच्या मनात घोळत होता. बहुतेक अभियंते प्रकाशकीय संशोधनाकडे बहुदा दुर्लक्ष करतात, यावर काहीतरी उपाय शोधायला हवा, असं फ्लेचरला वाटत होतं. त्याच्या सर्वच विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी कॅमेरा युक्त होते. या कॅमेऱ्यांचा उपयोग ते ज्या पद्धतीनं करत होते, ती तंत्रज्ञानाची उधळपट्टी आहे, असं फ्लेचरला वाटत होतं. फ्लेचर या विचारात असतानाच त्याची नजर त्याच्या प्रयोगशाळेतील सूक्ष्मदर्शीवर पडली. जर भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्याला सूक्ष्मदर्शीची जोड देता आली तर हा विचार त्याच्या मनात आला. त्यानं लगेचच त्याच्या विद्यार्थ्यांना हा प्रकल्प हाती घ्यायला सांगितलं. भ्रमणध्वनी हवे तेवढे होते. पण सूक्ष्मदर्शीचे हवेतसे सुटे भाग मिळवणं अवघड होतं. याचं कारण भ्रमणध्वनी कॅमेरे हे केंद्रांतराप्रमाणे स्वनियंत्रण (ऑटो फोकसिंग) करत असतात. सूक्ष्मदर्शी अशी बनवायची तर ते सहज शक्य नसतं. यावर अर्थातच फ्लेचर आणि त्याच्या विद्यार्थ्यांनी मात केली. आता त्यांच्या भ्रमणध्वनी सूक्ष्मदर्शी संकरित यंत्रणेनं ५० पट मोठं चित्रण भ्रमणध्वनीच्या साहाय्यानं प्रयोग शाळेत प्रक्षेपित करता येतं. यामुळं तांबडय़ा रक्तपेशी, त्यातील प्लास्मोडियम (म्हणजे हिवतापकारक जंतू) क्षयाचे जंतू, त्वचारोग, कीटक दंश आणि त्वचेवर उद्भवणारे कर्करोगजन्य मस यांचा पत्ता लावणं शक्य होतं. इ. स. २००८ च्या उत्तरार्धात फ्लेचरचा एक विद्यार्थी, एरिक डग्लस काँगोत या यंत्रणेची चाचणी करण्यासाठी गेला होता. तिथल्या खेडय़ापाडय़ातून या भ्रमणध्वनीची उपयुक्तता अजमावली गेली. त्या रोगशोधक भ्रमणध्वनीमुळे काँगोतील डॉक्टर आणि स्वत: एरिक डग्लस, फारच प्रभावित झाले. आता ही यंत्रणा अधिक सुटसुटीत बनवून तिचं विक्री योग्य स्वरूप बनविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तसं जर झालं तर खेडय़ापाडय़ातील डॉक्टरांना हे रोगशोधक भ्रमणध्वनी हे एक वरदानच ठरेल. मुख्य म्हणजे हे सर्व अतिशय स्वस्तात होईल.यामुळे ग्रामीण आरोग्य सेवेची उपयुक्तताही वाटेल. केवळ विकसनशील देशातच नव्हे तर प्रगत देशातही हे भ्रमणध्वनी उपयुक्त ठरतील. असा फ्लेचर यांना विश्वास वाटतो.
निरंजन घाटे