Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

लोकमानस

‘फ्लेक्स’ फलक : पर्यावरणाला धोका

 

महाराष्ट्र राज्य कठीण आर्थिक चक्रव्यूहातून जाताना दिसत आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असूनही सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्या तिजोऱ्या मात्र तुडुंब भरून वाहत आहेत. सर्व राजकीय पक्षांमधील पदाधिकारी केवळ प्रसिद्धी मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी रस्त्यांवर, प्रवेशद्वारांवर व नाक्यानाक्यांवर ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, ‘जीवेत शरद: शतम्’अशा आशयाचे फ्लेक्सचे अवाढव्य फलक आपल्या समर्थकांमार्फत लावून स्वत:चे कौतुक स्वत:च करून पैशाची उधळण करताना दिसत आहेत.
संपूर्ण मुंबईत अशा प्रकारचे फ्लेक्सचे फलक हजारोंच्या संख्येत असून ते शहराचा चेहरा विद्रूप तर करतातच, परंतु त्यामुळे वाहतूक सिग्नलचा प्रभाव कमी होऊन अपघात घडण्याची शक्यता वाढते.
अशा प्रकारे फ्लेक्सचा प्रचंड प्रमाणातील वापर करून बनविलेल्या फलकांमुळे पर्यावरणास व पर्यायाने आरोग्यास धोका निर्माण होतो. अमेरिकेसहित इतर सर्व प्रगत देशांमध्ये फ्लेक्स व विनाइलपासून बनविण्यात येणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.
पुनप्र्रक्रिया न होणाऱ्या, विघटन होऊ न शकणाऱ्या फ्लेक्सपासून बनविलेल्या फलकांवर बंदी आणणे गरजेचे आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने तसेच महापालिका आयुक्तांनी या गंभीर समस्येबाबत तात्काळ कारवाई केली पाहिजे.
चंद्रकांत पाटणकर, माहीम, मुंबई

एक सायकल, सात सोयी
लट्ठ लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे सायकल वेगळ्या अर्थाने उपयुक्त वाटायला हवी. वाहन म्हणून तर ती चांगली आहेच; पण व्यायामासाठी ती अधिक फायदेशीर! मर्यादित तेलसाठा लक्षात घेता बचतीच्या दृष्टीनेही ती उत्तम साधन. पर्यावरणाला पोषक, पार्किंगचा मोठा प्रश्न नाही. कुठेही थांबते, वेळ वाचवते. वर्षांनुवर्षे टिकते. सायकल चालवताना इतर कामांचा विचारही करता येतो. थोडक्यात एक सायकल सात सोयी. फ्रान्स, पोलंड, बार्सोलोनिया, कॅनडा इत्यादी देशांत तरुणांमध्ये सायकलचे आकर्षण वाढत आहे. शासनाकडून सायकल वापराला उत्तेजन मिळाले पाहिजे.
त्याचवेळी ग्रामीण भागात रस्त्यावरील खड्डे, भारनियमनामुळे अंधार, मोकाट कुत्री, गायी-गुरे या सर्वाना तोंड देणे, सायकलप्रेमिकांना मोठे जिकिरीचे झाले आहे. मोठय़ा वाहनाकडून सायकलला ठोकरी खाव्या लागतात. काहीजण टू-व्हीलरला, फोर-व्हीलरचे हॉर्न लावून गोंधळ उडवतात. त्या बाबतीत आरटीओने लक्ष घालावे.
फादर अ‍ॅलेक्स तुस्कानो, वसई

करमणुकीतून आरोग्य
‘एकाच वेळी हवेत उडण्याचा व पाण्यात पोहण्याचा आनंद मिळवायचा असेल तर तर सायकल चालवून पाहावी,’ असे पूर्वी पाठय़पुस्तकात वाचले होते. सध्याच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या दिनक्रमात मनुष्याला शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे, हे जाणवते तेव्हा या वाक्याची आठवण होते.
व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे शक्य नसते त्यामुळे ‘सायकल चालवणे’ हा सहजसुंदर उपाय ठरतो. खर्चही फारसा नाही. कमी अंतराचा प्रवास सायकलवरून करता येतो.
बाजारहाट करण्यासाठी, शाळेत-कॉलेजला जाण्यासाठी हाताशी राहणारे उत्तम वाहन म्हणजे सायकल.
यातून इंधनबचतही होईल आणि पर्यावरणरक्षणही साधेल. सरकारने अशा गुणी वाहनावरील कर कमी करून त्याच्या खरेदीला उत्तेजन तर द्यावेच; शिवाय रस्ते बनविताना सायकलींसाठी वेगळा ‘ट्रॅक’ ठेवून सायकलचालकांना सुरक्षिततेची हमीही द्यावी.
सदानंद पाटील, रसायनी, रायगड

‘बंदी’साठी सामाजिक सहकार्य हवे
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालण्याच्या आदेशाची अंमलबजावणी सुरुवातीला चांगल्या प्रकारे झाली. पण आता या नियमाची अवस्थाही दारूबंदी, गुटखाबंदीच्याच पानावरून पुढे चालली आहे. तंबाखू सेवनाचा मानवी जीवनावर वाईट परिणाम होतो हे माहीत असूनही केवळ जडलेले व्यसन सुटत नाही म्हणत तर कोणी मिजास दाखविण्यासाठी विडी, सिगारेट, गुटखा आदींचे सेवन करतात. तंबाखू, गुटखाआदींच्या सेवनामुळे माणसावर होणारे वाईट परिणाम प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचे असतील तर परळच्या टाटा रुग्णालयाला भेट द्या. कोणाचे गालफड, कोणाची अन्ननलिका केवळ विद्रूप नव्हे तर कामातूनच गेलेली आहे. घशाचा, तोंडाचा कॅन्सर त्यांना सतावत आहे. तंबाखूचे दुष्परिणाम रोखायचे असतील तर तंबाखूचे उत्पादनच रोखायला हवे. अशा समस्या मुळावर घाव घातल्याशिवाय सुटत नाहीत. त्याचप्रमाणे धूम्रपान आवरण्यासाठी काही समाजकार्यकर्त्यांची मदत संबंधितांनी घ्यायला हवी. विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) आणि पोलीस मोहल्ला कमिटी सदस्य तसेच सरकारी नोकर आणि नोंदणीकृत सामाजिक संस्था यांना समाजकंटकांना समजावण्याचे हक्क द्यावेत.
आनंदराव खराडे, विक्रोळी, मुंबई

मराठी ख्रिस्ती साहित्यिक गप्प का?
वसईतील देवतलाव येथे ८ ते १० मे रोजी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन पार पडले. बाहेरून एकसंध दिसत असलेल्या ख्रिस्ती धर्मीयांमध्ये पुरोहित वर्ग आणि विवाहित वर्ग असे दोन वैशिष्टय़पूर्ण गट आहेत. पुरोहित वर्ग हा सुसंघटित असून धर्मगुरू, बिशप, पोप अशा साखळीमध्ये तो व्हॅटिकनच्या कॅनन लॉद्वारे शिस्तबद्धरीत्या एकटवलेला आहे. हा वर्ग ख्रिस्ती जनतेला उत्तरदायी नसतो तर पोपशी एकनिष्ठ असतो. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, चर्च इत्यादींच्या टोलेजंग इमारती, चर्चचे ट्रस्ट हे सर्व धर्मसत्तेच्या ताब्यात आहेत. भारतातील ख्रिश्चनांची सर्व म्हणजे सुमारे १५० नियतकालिके धर्मगुरू चालवितात.
तुलनेत विवाहितांचा वर्ग खूपच दुर्बल आहे. पुरोहित वर्गाच्या कोणत्याच निर्णयप्रक्रियेत त्याला निर्णायक स्थान नाही. स्वावलंबी अध्यात्म निषिद्ध मानल्याने तसेच साप्ताहिक धार्मिक कर्मकांड अनिवार्य ठेवल्याने सामान्य वर्ग पुरोहित वर्गावर अवलंबून आहे. ख्रिश्चनांतील या दोन गटांतील दरी चिंतेचा विषय आहे.
निद्रिस्त समाजमनाला जागे करून त्याला वैचारिक दिशा देणे हे साहित्यिकांचे काम आहे. ख्रिस्ती पुरोहित वर्गाच्या चर्च या प्रशासकीय संस्थेच्या कारभाराबद्दल भारतीय ख्रिश्चनांमध्येही असंतोष आहे. जोसेफ पुलिकन्नलसारखे सुधारक स्वदेशी कॅथलिक चर्चची कल्पना मांडीत आहेत. प्रापंचिकांच्या दानधर्मातून उभ्या राहिलेल्या चर्चच्या मालमत्तेवर धर्मग्रामातील जनतेचे नियंत्रण का नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस आणि कोचीन विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ. एम. व्ही. पायली प्रश्न विचारीत आहेत. विद्यमान सर्वधर्मप्रेमभावाच्या काळात चर्चचे धर्मातराचे धोरण साफ चुकीचे आहे. दक्षिण भारतातील चर्चमध्ये व दफनभूमीत ख्रिश्चनांमध्ये भेदभाव केला जात आहे.
धर्मगुरू अ‍ॅन्थनी डिमेलो यांच्या समन्वयवादी धार्मिक धोरणाची शिकवण देणाऱ्या पुस्तकांवर व्हॅटिकनने सन १९९८ पासून बंदी घातलेली आहे. ख्रिस्ती नियतकालिकातही सुधारणावादी ख्रिस्ती विचारवंतांची मते दडपली जात आहेत. ख्रिस्ती जगतामध्ये एवढी उलथापालथ चालू असताना मराठी ख्रिस्ती साहित्यिक कुठे आहेत? चर्चमधील सुधारणांबद्दल ते मूग गिळून का बसलेले आहेत? आधुनिक विचार, समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य ते स्वीकारतील काय? मराठी ख्रिस्ती साहित्यिकांपुढे खरे आव्हान आहे.
विन्सेंट बागुल, मुंबई
vincent.bagul@gmail.com