Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

इचलकरंजीत गणपूर्तीअभावी पालिकेची विशेष सभा रद्द
इचलकरंजी, ३ जून / वार्ताहर

इचलकरंजी नगरपालिकेच्या बुधवारच्या विषयसमिती सभा व विशेष सभा गणपूर्ती अभावी रद्द करण्याची नामुष्की स्पष्ट बहूमत असतानाही सत्तारूढ काँग्रेसवर ओढवली. सत्तारूढ गटाने बहूमत गमावल्याने नैतिक पराभव समजून राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते जयवंत लायकर व मदन कारंडे यांनी केली. तर गणपूर्ती अभावी सभा रद्द झाल्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगून नगराध्यक्ष किशोरी आवाडे व पक्षप्रतोद अशोक आरगे यांनी नगराध्यक्ष काँग्रेसचाच होणार असा विश्वास व्यक्त केला.

सोलापूर पालिका विभागीय कार्यालयास कुलूप ठोकले
सोलापूर, ३ जून / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही वॉर्डातील विकासकामे होत नाहीत, अधिकाऱ्यांची निष्क्रियता कायम असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी सकाळी सोलापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक ६ ला कुलूप ठोकून आपली प्रतिक्रिया नोंदविली.बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बुधवार पेठेतील त्यांच्या वॉर्डातील नागरिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जीवनगौरव पुरस्कार प्रसादासमान- सुलोचनादीदी
कोल्हापूर, ३ जून / प्रतिनिधी

नवी दिल्ली येथे स्वीकारलेल्या पद्मपुरस्काराइतकाच आज येथे मला मिळालेला जीवनगौरव पुरस्कार मोठा वाटतो. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या जयंतीदिनीच मिळालेला हा पुरस्कार मला प्रसादासमान आहे असे भावोत्कट उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुलोचनादिदी यांनी आज सायंकाळी येथील केशवराव भोसले नाटय़गृहात बोलताना काढले. निमित्त होते कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोल्हापूर २००९ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

असह्य़ उकाडय़ात सातारा, सोलापूर भागात तीव्र पाणीटंचाई
पुणे, ३ जून/ प्रतिनिधी

अनेक ठिकाणी वळवाच्या पावसाची गैरहजेरी, वाढता असह्य़ उकाडा, उन्हाच्या झळांनी जीव कासावीस होत असताना अगदी अखेरच्या टप्प्यात अनेक गावांना भीषण पाणीटंचााईला सामोरे जावे लागत आहे. सोलापूर जिल्हायत पावणेतिनशे वाडय़ा व गावांना तर सातारा जिल्ह्य़ात २०० ठिकाणी पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते आहे. या भागांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र जून उजाडल्यानंतरही अजूनही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पाणीटंचाईचे संकट आणखी किती लांबणार याची चिंता लागून राहिली आहे.

वसंतदादा साखर कारखाना कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न
सांगली, ३ जून / प्रतिनिधी

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा. तसेच कामगारांची थकित देणी तातडीने द्यावीत, या मागणीसाठी साखर कामगार युनियनच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचाही प्रयत्न केला.वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याकडे कामगारांची चार कोटी रूपयांची देणी थकित आहेत. याबाबत कारखाना व्यवस्थापन योग्य तो निर्णय घेत नाही. तसेच कारखानाही पूर्ण क्षमतेने चालविला जात नाही. त्यामुळे साखर कामगारांत असंतोष पसरला असून हा कारखाना पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने चालवावा. अन्यथा, सक्षम व्यवस्थापनाकडे भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा, या मागणीसह कामगारांची सन २००३ पासूनचे थकित वेतन व ग्रॅज्युएटी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो अयशस्वी ठरविला. या आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते आर. बी. शिंदे यांनी केले.

एसटीच्या धडकेने सांगलीत वृद्ध ठार
सांगली, ३ जून / प्रतिनिधी

एसटी बसने ठोकरल्याने झालेल्या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना जिल्हा काँग्रेस भवनासमोरील चौकात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
सदाशिव माळी हे रस्ता ओलांडत होते. याच सुमारास कोल्हापूर-आटपाडी या बसने त्यांना ठोकरले. या अपघातात ते बसच्या मागील चाकाखाली सापडले. याचवेळी एक मोर्चाही चौकातून निघाला होता. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी श्री. माळी यांना उपचारासाठी येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक
इचलकरंजी, ३ जून/ वार्ताहर
पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून इचलकरंजी शहरातील २७४ लोकांची ५ कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील डॉ. अशोक जडेजा याच्याविरुद्ध बुधवारी रात्री गावभाग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक झालेल्यांमध्ये लालानगर, शांतीनगर भागातील कंत्राटदारांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. डॉ. जडेजा व त्याच्या साथीदारांनी अहमादबादजवळील सरसेज या गावातील नाममंदिरात पैसे तिप्पट करण्याच्या नावाखाली फसवणूक चालवली होती. आठ दिवसांत पैसे तिप्पट करण्याचे आमिष त्यांनी नागरिकांना दाखवले होते. नंतर ही मुदत वीस दिवस करण्यात आली. तीन महिन्यांनंतर कोटय़वधी रुपयांची माया घेऊन जडेजा बेपत्ता झाला.

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर डॉ. नांदगावकर
सोलापूर, ३ जून/प्रतिनिधी
येथील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप नांदगावकर यांची मुंबई विद्यापीठाच्या आयुर्वेद अभ्यास मंडळावर तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. नांदगावकर हे आयुर्वेद महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून प्राचार्यपदावर कार्यरत आहेत. तसेच ते सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून आयुर्वेद विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेद रुग्णालयात क्षय, एड्स, कर्करोग, कावीळ अशा अनेक रोगांवर संशोधन सुरु आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उद्योगपती अरविंद दोशी, मानद सचिव दीपक आहेरकर, उपप्राचार्य वैद्य प्रदीप कस्तुरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सोलापुरात लोकमंगलतर्फे करीअर मार्गदर्शन कार्यशाळा
सोलापूर, ३ जून/प्रतिनिधी
दहावी व बारावीनंतर पुढे काय, याबाबत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने लोकमंगल प्रतिष्ठानच्यावतीने ५ व ६ जून रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत हुतात्मा स्मृतिमंदिरात करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे समन्वयक विजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री कीर्ती कॉम्प्युटरच्या सहकार्याने आयोजिलेल्या या कार्यशाळेत दि. ५ रोजी अनिल जाधव (उद्योजकता व कौशल्ये), संतोष नाईक (माहिती व तंत्रज्ञान), डॉ. हुसेन, चेन्नई(व्यवस्थापन) आणि प्रा. सावंत (औद्योगिक प्रशिक्षण) तसेच दि. ६ रोजी प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे (अभियांत्रिकी), सीमा दायमा (फॅशन डिझायनिंग) व सुशीलकुमार काळे (स्पर्धा परीक्षा) यांची व्याख्याने होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

किणी टोलनाक्यावर पुन्हा वसुली कर्मचाऱ्याला मारहाण
पेठवडगाव, ३ जून / वार्ताहर
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या उत्तरेला २१ किलोमीटरवरील किणी टोल नाक्यावर पथकर देण्यावरून पुन्हा वाद होऊन येथील पथकर वसुली कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी वाहनचालक रहिमतुल्ला अली बुटलेर (रा.उचगाव,ता.करवीर) याला ताब्यात घेतले आहे. किणी टोलनाक्यावर घडणारे वादाचे प्रसंग हे नेहमीचेच झाले आहे. एमएच०९-५४५० ही गाडी घेऊन रहिमतुल्ला बुटलेर हा तांदुळवाडीला गेला होता. टोलनाक्यापासून ४ किलोमीटरच्या तांदूळवाडीतून परत येताना पथकर देण्याबाबत वाद होऊन आपल्याला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार जखमी कर्मचारी अरविंद शिवाजी वाकसे (रा.मिणचे) यांनी दिली आहे.

तलवारबाजी पंच परीक्षेत आदित्यराज घोरपडेंचे यश
सांगली, ३ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशनच्यावतीने औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या राज्य तलवारबाजी पंच परीक्षेत येथील आदित्यराज सुभाष घोरपडे हे उत्तीर्ण झाले आहेत. राज्य तलवारबाजी पंच परीक्षेत घोरपडे यांनी ‘बी’ श्रेणी प्राप्त करून राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. घोरपडे हे सन २००३ चे राज्य सुवर्णपदक विजेते खेळाडू असून त्यांना भारतीय खेल प्राधिकरण (स्पोर्टस अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया)ची शिष्यवृत्तीही मिळालेली आहे. घोरपडे यांना राज्य तलवारबाजी असोसिएशनचे सचिव अशोक दुधारे (नाशिक), प्रा. उदय डोंगरे (औरंगाबाद), स्टेट फेन्सिंग रेफ्री बोर्डाचे चेअरमन राजू शिंदे (नाशिक), सांगली जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, कार्याध्यक्ष तथा निवृत्त जिल्हा क्रीडाधिकारी रा. म. यादव, प्रा. जहाँगीर तांबोळी, एनआयएस तलवारबाजी प्रशिक्षक भूषण जाधव (औरंगाबाद) व शिवछत्रपती पुरस्कार विजेती शिल्पा नेने (पुणे) यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

सुहेल काझी यांचा सत्कार
माळशिरस, ३ जून/वार्ताहर

लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुहेल काझी यांचा अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. सुहेल काझी हे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारे अकलूजचे पहिले विद्यार्थी असल्याने या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे वडील अंनीस काझी हे सध्या पुणे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम करीत असून, तेही अकलूजचे पहिले फौजदार झाले होते, तर त्यांचे वडील सुलेमान काझी हे अत्यंत कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, विद्यमान उपसरपंच बाळासाहेब सणस यांनी या सत्काराचे आयोजन केले होते. त्यांच्या हस्ते सुहेल काझी, अनीस काझी व नजमुनाबी अंनीस काझी यांचा सत्कार करण्यात आला.

दानपेटीतील रोकड लंपास
सांगली, ३ जून / प्रतिनिधी
सांगली शहरातील झुलेलाल मंदिराच्या दानपेटीतील १२ हजार रूपयांची रोकड अज्ञाताने लंपास केली. याशिवाय घनश्यामनगर व बालाजीनगर येथेही चारठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला.
येथील झुलेलाल मंदिराच्या गाभाऱ्यातील खिडकीतून प्रवेश करून अज्ञाताने दानपेटी फोडून त्यातील १२ हजार रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत संतोष चावला यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतही घनश्यामनगर येथील एस. जी. लामतुरे यांच्या घरातील सिलेंडरही अज्ञाताने चोरला. तसेच रफिक इनामदार व संतोष प्रकाश इंगळे यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न झाला. बालाजीनगर येथेही काल भुरटय़ा चोरांनी चोरीचा प्रयत्न केला.

मुद्रांक विक्रीतील कमिशनमध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ संप
माळशिरस, ३ जून/वार्ताहर
मुद्रांक विक्रीतील कमिशनमध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेच्या वतीने पुकारलेला लाक्षणिक संप तालुक्यात १०० टक्के यशस्वी झाल्याची माहिती तालुका अध्यक्ष अमोल चोथे यांनी दिली. या संघटनेच्या वतीने तहसीलदारांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये मुद्रांक विक्रेत्यांना पूर्वीपासून विक्रीवर ३ टक्के कमिशन मिळते. त्यामध्ये अद्याप कसलीही वाढ झालेली नाही. उलट ७ मे २००९ रोजी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून यामध्ये एक टक्का कपात केली आहे. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असल्याने संघटनेने २ व ३ जून रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारला. त्याचा पहिला दिवस १०० टक्के यशस्वी झाला. तालुक्यातील ३३ विक्रेत्यांनी एक रुपयाचाही मुद्रांक विकला नसल्याची माहिती चोथे यांनी दिली.

जैवतंत्रज्ञान पदवी परीक्षेत गोडसे विद्यापीठात प्रथम
सोलापूर, ३ जून/प्रतिनिधी

येथील लोकमंगल जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. विजया गोडसे ही बी.एस्सी. जैवतंत्रज्ञान परीक्षेत ८१.५६ टक्के गुण मिळवून सोलापूर विद्यापीठात प्रथम आली.
या परीक्षेला लोकमंगल महाविद्यालयातून ७१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १४ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. या परीक्षेत लोकमंगलचीच कु. स्नेहल कदम ही ८०.६८ टक्के मिळवून दुसरी, वैभव जगदाळे हा ७७.२८ टक्के गुण मिळवून चौथा आणि कु. स्वाती सूर्यवंशी ही ७६.८० टक्के गुण मिळवून विद्यापीठात पाचवी आली. या विद्यार्थ्यांना डॉ. सुदीन दळवे, प्रा. बाजारे, प्रा.अन्नलदास यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष देशमुख, सचिवा अनिता ढोबळे व प्राचार्य डॉ. जे. जी. देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले.

एसटी वाहकाची बसस्थानकावरच कीटकनाशक पिऊन आत्महत्या
इस्लामपूर, ३ जून / वार्ताहर
इस्लामपूर एसटी आगारातील वाहक विवेक वसंतराव मोरे (वय २१, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) यांनी रविवारी बसस्थानकावरच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या जागी वाहक (कंडक्टर) म्हणून नोकरीस लागलेल्या विवेकचे एका तरूणीशी प्रेमसंबंध होते. तिच्याशी लग्न करण्याचा त्याचा विचार होता. मात्र कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. बसस्थानक आवारातच विवेक मोरे याने कीटकनाशक प्याले व चक्कर येऊन तो खाली कोसळला. आगार व्यवस्थापक डी. एच. घाटगे यांनी त्याला तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. याप्रकरणी घाटगे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माधुरी शास्त्री, मैमुना शेख यांना पीएच.डी. प्रदान
सोलापूर, ३ जून/प्रतिनिधी
सोलापुरातील माधुरी शास्त्री आणि प्रा. मैमुना शेख यांना संशोधनपर प्रबंधाबद्दल डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. शास्त्री यांनी उदयपूरच्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठातून पाली, प्राकृत व जैनॉलॉजी विभागातून पीएच. डी पदवी मिळवली आहे. ‘बीसवी शताब्दी के दिगंबर जैनाचार्यो में आचार्य श्री विद्यानंद विचार और योगदान’ या विषयावर त्यांनी प्रा. डॉ. उदयचंद जैन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनपर प्रबंध लिहिला होता. युनियन एज्युकेशन सोसायटी संचालित महिला महाविद्यालयातील प्रा. मैमुना शेख यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली आहे.‘मुन्शी सज्जादहुसेन आणि शौकत थानवींच्या व्यंग कादंबरी लेखनाचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधनपर प्रबंध लिहिला होता. त्यासाठी प्राचार्य डॉ. गुलाम दस्तगीर शेख यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

सहकाराची मंदिरे व्हावीत गावची न्यायमंदिरे- कोरे
पेठवडगाव, ३ जून / वार्ताहर
गावोगावी असलेल्या सहकारी संस्था, सहकाराची मंदिरे असून ती त्या गावातील न्यायमंदिरे झाली पाहिजेत, असे प्रतिपादन अपारंपरिक ऊर्जा व फलोत्पादन मंत्री विनय कोरे यांनी नुकतेच बहिरेवाडी येथे केले. बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील तात्यासाहेब कोरे विकाससेवा सोसायटीच्या गोडाऊनची पायाभरणी कोरे यांच्या हस्ते झाली, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे चेअरमन डॉ.भाऊसाहेब गुळवणी होते. या सोसायटीचे संस्थापक एच.आर.जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.