Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

टक्का घसरला
उत्पन्नाचा, उत्पादनाचा आणि मराठीचाही
मुंबई, ३ जून / खास प्रतिनिधी
मराठी माणसावर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन सुरू केले असले तरी मुळातच राज्यातील मराठी भाषकांचे प्रमाण गेल्या तीन दशकांच्या तुलनेत घटल्याची धक्कादायक माहिती नियोजन विभागाने आज विधिमंडळात सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आली आहे. राष्ट्रीय नमुना पाहणीवर आधारित निष्कर्षांनुसार राज्यातील रोजगार सातत्याने वाढून २००४-०५ मध्ये तो ४.३ कोटी इतका झाला असला तरी २००७-०८ मध्ये तो कमी होऊन ४.१ कोटी इतका झाल्याने मंदीची चाहूल स्पष्टपणे दिसून येत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २००८-०९ मध्ये काढण्यात आला आहे.

मीराकुमार लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष
नवी दिल्ली, ३ जून/खास प्रतिनिधी
भारतीय संसदेच्या इतिहासात बुधवार, ३ जून २००९ या दिवसाची सुवर्णाक्षरात नोंद होईल. लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मीराकुमार यांच्या नावाचा आज लोकसभेत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रस्ताव व अनुमोदन केल्यानंतर हंगामी अध्यक्ष माणिकराव गावित यांनी सभागृहाचा कौल मागितला आणि सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे बाके वाजवून व आवाजी मतांसह होकार दर्शविला तेव्हा लोकसभेच्या ६२ वर्षांच्या इतिहासात एका महिलेला प्रथमच अध्यक्षपदाचा सन्मान लाभत होता.

प्रधान समिती अहवालामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची विकेट?
समर खडस
मुंबई, ३ जून

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यामध्ये पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीवर विरोधक नाराज असले तरी या अहवालाच्या कृती आराखडय़ानुसार मुंबई पोलीस दलाच्या चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आता मर्यादित जबाबदारी ठेवून त्यांना सध्याच्या महत्त्वाच्या पदावरून दूर करण्यात येणार आहे.

सामूहिक कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू असताना विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
लातूर, ३ जून/वार्ताहर

मार्च २००९ मधील बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील ३५६१ विद्यार्थ्यांची समान उत्तरे लिहिली असल्याचा ठपका ठेवून लातूर परीक्षा मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांची चौकशी सुरू होती. आज दुपारी १२च्या सुमारास संतप्त विद्यार्थ्यांनी राजस्थान विद्यालयात सुरू असलेल्या चौकशी अधिकाऱ्यांसमोरील फर्निचर व खिडक्यांच्या काचांची मोडतोड केली. त्यामुळे मंडळाला चौकशी स्थगित ठेवावी लागली. बुधवार, ३ जूनला काही वृत्तपत्रात मुखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा निकाल रोखल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच मुखेड तालुक्यातील पालक, संस्थाचालक व विद्यार्थ्यांत एकच खळबळ उडाली.

मुंबईतील हिवाळा ऋतुचक्रातून नाहीसा होण्याची भीती
अभिजित घोरपडे
मुंबई, ३ जून

मुंबईच्या ऋतुचक्रातून नजिकच्या भविष्यात हिवाळा नाहीसा होण्याची भीती असून, ‘मुंबईत गारठा असतो’ हे वाक्यसुद्धा इतिहासजमा होण्याची शक्यता एका संशोधनाद्वारे निर्माण झाली आहे. कारण मायानगरीच्या पर्यावरणात झालेले स्थानिक बदल आणि जागतिक तापमानवाढ यांचा एकत्रित परिणाम म्हणून येथील तापमानात गेल्या शंभर वर्षांमध्ये तब्बल १.६२ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ही वाढ हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये अधिक आहे.

भारतीय नोकरशाही आशियात सर्वात अकार्यक्षम
सिंगापूर, ३ जून/ वृत्तसंस्था

भारतातील नोकरशाही आशियामधील सर्वात ‘अकार्यक्षम नोकरशाही’ असल्याचे हाँगकाँगमधील एका संस्थेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. भारतीय सनदी अधिकारी हे काम करण्यात अत्यंत अक्षम असून, त्यांच्याकडून काम करून घेणे ही सर्वात रटाळ आणि त्रासदायक प्रक्रिया असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. उत्तर आणि दक्षिण आशियातील १२ देशांमधील सुमारे १, २७४ तज्ज्ञांच्या मतचाचणीमधून हाँगकाँगमधील ‘पॉलिटिकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक रिस्क कन्सल्टन्सी’ने (पीईआरसी) हा अहवाल आज सादर केला.

नक्षलवाद्यांचे अभयदान धुडकावून पोलीस जवानाने पत्करले वीरमरण
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, ३ जून

गेल्या एक फेब्रुवारीला मरकेगावजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हत्याकांडात एका शूर पोलीस जवानाने शत्रूपक्षाने दिलेले अभयदान धुडकावून दोन नक्षलवाद्यांचा बळी घेऊन वीरमरण पत्करले, अशी खळबळजनक माहिती आता उघड झाली आहे. गेल्या तीन महिन्यात नक्षलवाद्यांनी तीन चकमकीत तब्बल ३४ पोलिसांचे बळी घेतल्याने सध्या ही हिंसक चळवळ चर्चेत आली आहे. यापैकी दोन चकमकीत नक्षलवाद्यांनी सर्व पोलिसांना ठार मारले.

शासनाच्या अनास्थेमुळे मौल्यवान खनिज संपत्तीचा साठा पडून!
प्रसाद रावकर
मुंबई, ३ जून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील खनिज संपदेमध्ये मोठय़ा प्रमाणावर सोने आणि प्लॅटिनम आढळलेले असतानाही या मौल्यवान संपत्तीचे संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांत कुठलेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने २००४ मध्ये घेतलेल्या पुढाकाराला शासनाकडून थंड प्रतिसाद मिळाल्याने हे मौल्यवान साठे आजही तसेच पडून आहेत.

‘राष्ट्रपुरुषांच्या नावांचे शॉर्टफॉर्मस चालणार नाहीत’
मुंबई, ३ जून/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐवजी छ.शि.म. टर्मिनस किंवा सीएसटी, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याऐवजी एल. टी. मार्ग पोलीस ठाणे, असे राष्ट्रपुरुषांच्या नावांचे शॉर्टफॉर्मस यापुढे चालणार नाहीत. राष्ट्रपुरुषांच्या पूर्ण नावांचा उल्लेख रस्त्यांच्या पाटय़ांना, रेल्वे स्थानकांच्या पाटय़ांवर, तिकीटांवर उपनगरी रेल्वे गाडय़ांवर करावा लागेल. याची पूर्तता उद्या सकाळी ११.०० वाजेपर्यंत करावी, असे निर्देश विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी आज सरकारला दिले.

आज राज्याचा अर्थसंकल्प
मुंबई, ३ जून / खास प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विविध समाज घटकांना सवलती देणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री दिलीप वळसे-पाटील हे उद्या सादर करण्याची चिन्हे आहेत. सप्टेंबरअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याची संधी सत्ताधारी पक्ष सोडणार नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाल्याने सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. विविध घटकांना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सवलती देण्याचा प्रयत्न राहिल. वित्तमंत्री वळसे-पाटील आणि राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी आज अर्थसंकल्पावर अखेरचा हात फिरविला. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला. यामुळे राज्य शासनाच्या विविध महामंडळांनी दिलेले सुमारे १८०० कोटींचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. अर्थसंकल्पात त्याचे पडसाद उमटतील अशी शक्यता आहे. व्हॅट लागू झाल्यापासून नवीन कर बसविण्याचे राज्य सरकारचे अधिकार गेले आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जास्तीत जास्त सवलती देऊन मतदारांना खूश करण्याचाच एकूण हा अर्थसंकल्प असेल !

ऑनलाईन प्रवेशावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई, ३ जून / खास प्रतिनिधी
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यास वाढता विरोध होत असल्याने त्यात तोडगा काढण्याचे प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यात लक्ष घातले असून, ऑनलाईनबरोबरच सध्याची पारंपारिक पद्धत सुरू ठेवता येईल का, या दृष्टीने आढावा घेतला जात आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मुंबईतील आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. विशेषत: सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांनीच ऑनलाईन प्रवेशाला विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला आहे. ऑनलाईन प्रवेशाबाबत आमदरांसाठी प्रात्यक्षिक आज आयोजित करण्यात आले होते. त्यात आमदारांना सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर गोंधळ नको म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी ऑनलाईनबरोबरच सध्याची अर्ज भरण्याची पद्धत सुरू ठेवावी अशी मागणी लावून धरली आहे. एकाच वेळी दोन्ही पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवता येणार नाही, असा निष्कर्ष तज्ज्ञ समितीने काढला आहे. शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर ठाम आहेत. मात्र या संदर्भात येत्या दोन-तीन दिवसांमध्ये काही तरी तोडगा मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर काढला जाईल, असे सांगण्यात आले. काही मंत्र्यांनीही ऑनलाईन प्रवेशाला विरोध दर्शविला आहे.

‘पाकसोबत क्रिकेट खेळणे निर्लज्जपणाचे लक्षण’
मुंबई, ३ जून / प्रतिनिधी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधाराला एकीकडे मोकळे सोडले जात असताना पाकिस्तानसोबत इंग्लडमध्ये क्रिकेट खेळणे निर्लज्जपणाचे लक्षण आहे, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सीसीआय येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत खेळणे बंद केले होते. मात्र आता इंग्लडमध्ये भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळत आहे. दहशतवाद्यांना सजा दिल्याशिवाय भारताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबध ठेवू नयेत, ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनाप्रमुखांनी ही भूमिका आधीच मांडलेली आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला काही वाटत नाही. या मंडळात पाकिस्तानी सदस्य आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

बारावीचा आज निकाल
पुणे, ३ जून/खास प्रतिनिधी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, गुरुवारी जाहीर करण्यात येत आहे. सकाळी ११ वाजता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये तो उपलब्ध करून देण्यात येणार असून संकेतस्थळे व एसएमएसच्या माध्यमातूनही त्याची माहिती मिळेल. राज्य मंडळाचे सचिव तुकाराम सुपे यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे पुण्या-मुंबईसह नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या विभागीय मंडळांमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. या सर्व मंडळांतर्फे सकाळी ११ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. पुढील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत निकाल उपलब्ध होईल - www.mahresult.nic.in, www.rediff.com, www.zoneyuva.com
संपूर्ण राज्याचा व विभागीय मंडळनिहाय निकाल पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे - www.msbshse.ac.in, www.mh-hsc.ac.in