Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

सामूहिक कॉपी प्रकाराबाबत मुख्यमंत्री नाराज
नांदेड, ३ जून /वार्ताहर

नांदेड जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागातील विशेषत: मुखेड तालुक्यातील सामूहिक कॉपीच्या प्रकाराबाबत राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांवर कारवाई झाली त्यापैकी बहुतांश शिक्षणसंस्था काँग्रेस पुढाऱ्यांच्या असून हे सर्व संस्थाचालक मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक आहेत हे विशेष!
नांदेड जिल्ह्य़ातल्या वेगवेगळ्या भागातील कॉपी प्रकरणांची जिल्ह्य़ात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

माझा ‘इनाम’दार सखा
' मागच्या महिन्यात आमचा इनामातला पिंपळ बुडातूनच कोसळून पडला. खरंतर एवढा मोठा पसारा होऊन उभा असणारा हा वृक्षराज असा एकाएकी कोसळून पडला, हे सारं कळण्यापलीकडचच होतं. बातमी कळली, तेव्हा बऱ्याच वेळ विश्वासही बसला नाही. फार मोठी वावटळ आली आणि त्यात कोसळला, असंही झालं नाही. आदल्या दिवशी थोडासा पाऊस झाला होता. अन् या पावसाबरोबर थोडासा वावटळी वाराही आला होता. पण त्यामुळे एवढा पिंपळराजा आडवा होईल, असं वाटलं नाही. काहीतरी निमित्त होऊन आमचा हा कुळपुरुष आपलं अंग आडवं टाकून अखेरचा निरोप घेता झाला होता.

वीज बिल वसुलीसाठी दीडशे पोलिसांना कारणे दाखवा नोटीस
थकबाकी नसल्याचा पोलिसांचा दावा
नांदेड, ३ जून/वार्ताहर
पोलीस वसाहतीत राहणाऱ्या तत्कालिन २२ कर्मचाऱ्यांसह १५० जणांना पोलीस प्रशासनाने वीज बिल वसुलीसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महावितरणाची पोलीस प्रशासनाकडे ४५ लाखांची थकबाकी आहे. जिल्ह्य़ातल्या वेगवेगळ्या पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वेळच्या वेळी वीज बिले वसूल न केल्याने पोलीस प्रशासनाकडे महावितरणची ४५ लाख रुपये थकबाकी झाली आहे.

चौकशी समितीच्या अहवालावर कारवाई करण्यास टाळाटाळ
अविवाहित तरुणाची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया
उस्मानाबाद, ३ जून /वार्ताहर
अविवाहित तरुणाची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान या चौकशी समितीतून आपल्याला वगळावे असा विनंती अर्ज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणातील परिचारिका दणाने यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पैसे मागितल्याचा आरोप लेखी स्वरूपात नोंदविला आहे.

शांतता, पोलीस तपास सुरू आहे!
डॉ. अजय जाधव अ‍ॅसिड हल्ला प्रकरण
प्रदीप नणंदकर
लातूर, ३ जून

क्ष-किरणतज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट) डॉ. अजय अनिरुद्ध जाधव यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोर गेल्या १९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अंगावर अ‍ॅसिड फेकण्यात आले. यामुळे वैद्यकीय जगतात एकच खळबळ उडाली. डॉ. जाधव यांच्यावर प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले. त्यांच्या जीवाचा धोका टळला असला तरी अद्याप किमान १५ दिवस त्यांना रुग्णालयातच उपचारासाठी रहावे लागणार आहे.

‘खते व बियाणांची कृत्रिम टंचाई थांबवा’
मनसेची शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन
परभणी, ३ जून/वार्ताहर
खते व बियाणांची कृत्रिम टंचाई दूर करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याची मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सध्या व्यापारी रासी-१ व रासी-२ या वाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढय़ा भावाने विक्री करीत आहेत. कृषी विभाग याकडे मात्र डोळेझाक करत आहे. खताचा मुबलक साठा असताना व्यापारी खत चढय़ा दराने विक्री करीत आहेत. शेतकऱ्याला मोफत सातबारा देण्याचे आदेश असतानाही प्रत्यक्षात मात्र सातबारा देण्यासाठी तलाठय़ाकडून २०० रुपयांची मागणी होत आहे.

किराणा दुकान आणि ढाब्यावर खुलेआम दारूविक्री!
गंगाखेड, ३ जून/वार्ताहर

तालुक्यातील कोद्री या डोंगरी भागातील गावात किराणा दुकान तसेच ढाब्यावर खुलेआम अवैधपणे दारूविक्री होत आहे. परिणामी गावातील जनमानसावर विपरीत परिणाम होत असल्याने ही दारूविक्री त्वरित बंद करावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावातील सहा बचतगटांच्या ७० महिलांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. आज (३ जून) कोद्री येथील प्रतिक्षा महिला बचतगट, शिवशक्ती महिला बचतगट, सम्यक महिला बचतगट, रमाबाई महिला बचतगट, तसेच पृथ्वी गावदरी व महिला बचतगटांच्या एकूण ७० महिलांनी गंगाखेडच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावात किराणा दुकान व ढाब्यावर खुलेआम दारूची खरेदी-विक्री होत आहे. परिणामी अनेक संसार उघडय़ावर आले असून गावातील सार्वजनिक ठिकाणी महिलांना मद्यपी लोकांकडून मानहानिकारक वागणूक मिळत आहे. या संबंधित अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध त्वरित कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा जनआंदोलनाच्या तयारीने महिला रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विवाहितेचे मुंडन करणारे सात आरोपी गजाआड
परभणी, ३ जून /वार्ताहर

उद्योगधंद्यासाठी २० हजारांची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे पत्नीचे मुंडन करून घरात कोंडून ठेवल्याप्रकरणी अत्याचारग्रस्त संध्या काकडे हिने बीड येथे दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलिसांनी संध्याचा पती भारत काकडे याच्यासह सासरच्या सात आरोपींना गजाआड केले आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलिसात एकंदर १३ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ही घटना सेलू हद्दीमधील असल्यामुळे फिर्याद सेलू पोलीस स्टेशनला वर्ग केल्यानंतर फौजदार उद्धवराव इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जी.आर. कालापाड, उद्धव माने, बबन राठोड यांनी त्वरित सात आरोपींना अटक करून घटनेत वापरलेली कात्री व कापलेले केस जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भारत काकडे, तुळशीराम काकडे, द्वारकाबाई काकडे, कलाबाई काकडे, पंचशीला भवाळे, ज्योती सोनपसारे, मुक्ताबाई सोनपसारे यांना अटक झाली.

नांदेडच्या महात्मा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बॉम्बची अफवा
नांदेड, ३ जून /वार्ताहर

नांदेड शहरातल्या विमानतळालगत असलेल्या महात्मा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती एकाने दिल्यानंतर खळबळ उडाली होती. तब्बल साडेतीनतासांच्या तपासणीनंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महात्मा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी माहिती एका तरुणीने वजिराबाद पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे दिली. पोलीस उपनिरीक्षक तलवारे यांनी तात्काळ ही माहिती नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर नांदेडचे बॉम्बशोधक व नाशक पथक तात्काळ महाविद्यालयात पोहोचले. या पथकाने पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाविद्यालयाची तब्बल साडेतीन तास तपासणी केली. या तपासणीनंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. आता पोलिसांनी दूरध्वनीवरून माहिती देणाऱ्या तरुणीचा शोध सुरू केला असल्याचे सांगण्यात आले. शहरातल्या पाचही पोलीस ठाण्यातील दूरध्वनीला कॉलर आयडीची सुविधा देण्यात आली होती; परंतु गेल्या महिन्यापासून ही यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे दूरध्वनी करणाऱ्यांचा शोध घेणे किंवा कोणत्या दूरध्वनीवरून फोन आला याची माहिती मिळविणे अवघड झाले आहे.

जालना जिल्ह्य़ात १४ जूनपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश
जालना, ३ जून /वार्ताहर

जिल्ह्य़ात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये शस्त्रबंदी आणि कलम ३७ (३) अन्वये जमावबंदी आदेश १४ जून २००९ पर्यंत लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार शस्त्र जवळ बाळगण्यास तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

तडी पिंपळगाव येथे राष्ट्रभक्ती संस्कार संमेलन
परभणी, ३ जून/वार्ताहर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील अप्रकाशित पैलूही अभ्यासला पाहिजे, असे मत शिवकालीन गडकिल्ल्यांचे अभ्यासक प्रमोद मांडे यांनी रविवारी व्यक्त केले.
सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथे दुसऱ्या राष्ट्रभक्ती संस्करण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन मधुसूदन महाराज मोरे देहूकर यांच्या हस्ते झाले. या वेळी दत्ता महाराज पाथरीकर, अरुण ग. माळी, शीला शेरे, आर. एच. साखरे उपस्थित होते. वीरपत्नी विद्या सुभाष सानप, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामराव जोगदंड, ज्येष्ठ वारकरी ज्ञानोबा राऊत यांचा सत्कार करण्यात आला. श्री. मांडे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकारण, व्यापार, प्रशासन, न्याय आदी गोष्टींवर मार्गदर्शन केले. सरपंच सुनील जोगदंड, संमेलनाचे समन्वयक नितीन चिलवंत यांनी संमेलनामागील भूमिका विशद केली. संमेलनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन आसाराम लोमटे यांच्या हस्ते झाले.

झरीच्या यंग क्रिकेट संघाने पटकावला प्रथम क्रमांक
लातूर, ३ जून /वार्ताहर
यंग क्रिकेट संघ झरी (बु.) विरुद्ध जय हनुमान क्रिकेट क्लब धानोरा (बु.) यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात यंग क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
अहमदपूर तालुक्यात धानोरा बु. येथे जय हनुमान क्रिकेट क्लब धानोरा बु., ता. अहमदपूर यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमरसिंह भोसले, निवृत्ती कांबळे, अ‍ॅड. टी. एन. कांबळे यांची उपस्थिती होती. यंग क्रिकेट संघ झरीने पहिले, जय हनुमान क्रिकेट क्लब धानोराने दुसरे, सगीर क्रिकेट संघ किनगावने तिसरे बक्षीस मिळविले. या क्रिकेट स्पर्धाची बक्षिसे बाबासाहेब पाटील, कमलाकर पाटील, जगन्नाथ आदटराव यांच्या हस्ते देण्यात आली.

विरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र
जालना, ३ जून /वार्ताहर
जिल्ह्य़ातील विरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विरेगाव येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांची या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी सततची मागणी होती. जिल्हा नियोजन विकास मंडळानेही विरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २९ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार या आरोग्य केंद्रास मंजुरी दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आकृतीबंधानुसार या आरोग्यकेंद्रातील ११ पदे भरण्यात यावीत, असेही या शासन निर्णयात नमूद केले आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वाहन, वेतन व भत्ते, बांधकाम आदीसाठी आवश्यक असलेला १ कोटी ४ लक्ष २२ हजार रुपये खर्च जिल्हा नियोजन विकास महामंडळाकडून करण्यात यावा, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

रोटरी व छात्रसेनेच्या वतीने गुटख्याची होळी
अंबाजोगाई, ३ जून /वार्ताहर
जागतिक तंबाखूविरोधीदिनाचे औचित्य साधून रोटरी व रोटरॅक्ट क्लब, एन. सी.सी. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने रविवारी (३१ मे) येथील सावरकर चौकात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची होळी करण्यात आली. एन.सी.सी. छात्र, रोटरी व रोटरॅक्ट सदस्यांनी तंबाखूविरोधी घोषणा देत मुख्य मार्गावरून फेरी काढली. छात्रसेनाधिकारी एस. के. निर्मळे यांनी सर्वाकडून व्यसनविरोधी प्रतिज्ञा म्हणून घेतली. तंबाखूनजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी प्रभारी अधिष्ठाता डॉ. एन. जी. तिरपुडे, डॉ. सुरेश अरसुडे, आदींनी मार्गदर्शन केले. या वेळी तंबाखूजन्य पदार्थाचा प्रतिकात्मक पुतळा व गुटख्याची होळी करण्यात आली. याप्रसंगी सुहास काटे, भागवत कांबळे, प्रताप पवार, बाभुळगावकर, आदी उपस्थित होते.

हिंगोली पालिकेच्या वतीने महिला बचत गटास धनादेश वाटप
हिंगोली, ३ जून /वार्ताहर

सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेअंतर्गत हिंगोली नगरपालिकेच्या वतीने महिला गटास धनादेश वाटप करण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कार्यक्रमात १६ बचत गटांना सुमारे २० लाखांचे धनादेश तर दुसऱ्या १६ बचत गटाला प्रत्येकी १० हजार रुपयेप्रमाणे १ लाख ६० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या प्राप्त निधीचा योग्य उपयोग केला जावा अशी अपेक्षा नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी धनादेश वाटपाच्या कार्यक्रमातून बोलताना व्यक्त केली. या वेळी न.प.चे उपाध्यक्ष बापूराव बांगर, न.प. सदस्य उमेश गुठ्ठे, बाबाराव बांगर, सदाशिव सूर्यतळ आदींची उपस्थिती होती.

पश्चिम विभाग क्रिकेट संघात विजय झोल याची निवड
जालना, ३ जून /वार्ताहर
येथील विजय झोल याची १६ वर्षांखालील पश्चिम विभाग क्रिकेट संघात निवड झाली आहे. या संघात महाराष्ट्रातून एकूण तिघाजणांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये विजय झोल याचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी निवड होणारा तो जालना जिल्ह्य़ातील पहिलाच खेळाडू आहे. आई आणि वडिलांच्या प्रोत्साहनामुळे विजयने क्रिकेट क्षेत्रातही प्रगती केली आहे. यापूर्वी १३ वर्षांखालील पश्चिम विभागाच्या संघातही त्याची निवड झाली होती. जालना येथील काणे क्रिकेट प्रशिक्षण अकादमीत त्याने क्रिकेटचे धडे घेतले आहेत. विजय झोल हा जालना येथील फौजदारी वकील अ‍ॅड. हरिभाऊ झोल यांचा मुलगा आहे. जालना येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील अकरावी वाणिज्य वर्गातील तो विद्यार्थी आहे.

किनीच्या सरपंचाचे जात प्रमाणपत्र अवैध
भोकर, ३ जून/वार्ताहर

तालुक्यातील किनी येथील सरपंच अनुसयाबाई दत्तात्रय कोरडेवार यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र औरंगाबाद येथील जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्याचे पत्र नुकतेच भोकर तहसीलला प्राप्त झाल्यामुळे सरपंचपदावरून त्यांना लवकरच पायउतार व्हावे लागणार आहे. किनी येथील अनुसयाबाई कोरडेवार या मनेरवाल्लू समाजाच्या असून अनुसूचित जमातीच्या राखीव वर्गातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

एका विवाहितेने जाळून घेतले; तर दुसरी भाजली
औरंगाबाद, ३ जून /प्रतिनिधी
औरंगाबाद जिल्ह्य़ात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहिता भाजल्या. यात एकीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले तर दुसरी जळाली. या घटनेत एकीचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील छाया माणिकराव मोहिते या २० वर्षांच्या विवाहितेने पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वत:ला जाळून घेतले. यात ती शंभर टक्के जळाली होती. शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.दुसरी घटना फुलंब्री गावात घडली. सकाळी ११ वाजता येथील विवाहिता कविता सचिन लहाने ही भाजली. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या जळण्याचे कारण समजू शकले नाही.अन्य एका घटनेत बिडकीन येथील दशरथ पुंजाजी तुरे या ४० वर्षांच्या नागरिकाने स्वत:ला जाळून घेतले. काल ही घटना घडली होती. त्याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.

पुतळ्यांच्या उभारणीसाठी बहुजन क्रांतिदलाचे उपोषण
औरंगाबाद, ३ जून /प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ उद्यानात भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारण्यात यावी, या मागणीसाठी बहुजन क्रांती दलाच्या वतीने आजपासून पालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली.डॉ. आंबेडकर आणि भगवान गौतमबुद्ध यांच्या पुतळ्यांना काहींनी विरोध केला असून त्यांच्या दबावामुळेच हे पुतळे आतापर्यंत उभारण्यात आले नसल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी केला आहे.

लग्नासाठी म्हणून नेलेली मोटार घेऊन एकजण पसार
औरंगाबाद, ३ जून /प्रतिनिधी
मित्राच्या लग्नासाठी म्हणून नेण्यात आलेली टाटा सुमो ही मोटार घेऊन एक जण पसार झाला. रविवारी ही मोटार नेण्यात आली होती. आतापर्यंत ती परत न आल्याने छाया रामराव सोनवणे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. छाया यांच्या मालकीची टाटासुमो आहे. कैलास गायकवाड (रा. नायगाव, ता. औरंगाबाद, हल्ली मुक्काम काबरानगर) याने मित्राच्या लग्नासाठी म्हणून रविवारी नेली होती. जाफराबाद येथे हे लग्न होते. सायंकाळी परत येतो असे त्याने सांगितले होते. मात्र घटनेला चार दिवस उलटल्यानंतरही तो परत आला नाही. ही मोटार पळविण्यात आली असल्याची तक्रार छाया (रा. सहकार कॉलनी) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण
औरंगाबाद, ३ जून /प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना सिडको एन-२ येथील तोरणागडनगरात घडली. संदीप दांडगे असे आरोपीचे नाव आहे. संदीप याने गेल्या शुक्रवारी सकाळी १० वाजता मुलीला पळविले. नातेवाईकांनी तिचा अन्यत्र शोध घेतला. नंतर तिला संदीपने पळवून नेल्याचे समोर आले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित
औरंगाबाद, ३ जून /खास प्रतिनिधी

येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणात पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता व प्रशासक यांच्या हस्ते झाले. या वेळी अधीक्षक अभियंता अ. प्र. कोहिरकर, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. बी. केंद्रे आदी उपस्थित होते. या पूरनियंत्रण कक्षाचा संपर्क दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३६३९३७ असा आहे. हा कक्ष येत्या ३१ ऑक्टोबपर्यंत २४ तास कार्यरत आहे. या कक्षामार्फत जायकवाडी धरण, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, माजलगाव, मांजरा, मानार आदी प्रमुख धरणांच्या पूर नियंत्रणांची माहिती मिळेल. तसेच पर्जन्यविषयक माहितीही संकलित केली जाईल.

खैरलांजी हत्याकांड प्रकरणी आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
हिंगोली, ३ जून/वार्ताहर
येथील काही नागरिकांनी खैरलांजी हत्याकांडानंतर तसेच कानपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेनंतर हिंगोली शहरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केले. त्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.या निवेदनात नमूद केले आहे की, खैरलांजी हत्याकांड व कानपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे झालेले विटंबन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी केलेल्या आंदोलनकर्त्यांनी शांततामय मार्गाने ३० नोव्हेंबर २००६ रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी खोटय़ा व चुकीच्या माहितीच्या आधारे शहरातील बौद्धवाडा येथे रात्री जाऊन आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. हा अन्याय दूर करण्यासाठी दाखल करण्यात आलेले गुन्हे महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. निवेदनावर रमेश इंगोले, राजेंद्र वाढवे बबन कवानेसह ५३ लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

डॉ. किशोर सानप यांना सतकर स्मृती पुरस्कार
जालना, ३ जून /वार्ताहर
या वर्षीचा कै. नागोजीराव सतकर पुरस्कार वर्धा येथील किशोर सानप यांना जाहीर झाला आहे. डॉ. सानप हे प्रसिद्ध समीक्षक, कादंबरीकार, वारकरी संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. या वर्षीच्या पुरस्कारासाठी नियुक्त केलेल्या परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार डॉ. सानप यांना रविवारी (७ जून) सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात २००९ वर्षांसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राम अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. येथील श्री. बाबूराव सतकर यांनी गतवर्षीपासून रोख ५ हजार रुपये, शाल, श्रीफळ असा पुरस्कार देऊन गुणसंपन्न लेखकांचा गौरव करण्याची परंपरा जालना शहरात सुरू केली आहे. त्यानुसार पहिला कै. नागोजीराव सतकर पुरस्कार कोल्हापूरचे कवी वसंत पाटील यांना देण्यात आला होता.

अ‍ॅड. मुकुंद कोल्हे सहायक जिल्हा सरकारी वकील
जालना, ३ जून /वार्ताहर
येथील अ‍ॅड. मुकुंद लक्ष्मणराव कोल्हे यांची सहायक जिल्हा सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने त्यासंदर्भात नुकतेच आदेश काढले असून ही नियुक्ती ३ वर्षांसाठी आहे. अ‍ॅड. कोल्हे हे गेल्या १० वर्षांपासून जालना जिल्हा न्यायालयात वकिली करीत आहेत. जालना जिल्हा वकील संघाचे ते माजी सचिव आहेत. यापूर्वी अ‍ॅड. मुकुंद कोल्हे यांनी विविध संस्थांचे वकील म्हणून काम पाहिलेले आहे.

‘मल्हारराव होळकर’ कादंबरीचा उद्या लोकार्पण सोहळा
लातूर, ३ जून /वार्ताहर
राजे मल्हारराव होळकर ट्रस्ट लातूरच्या वतीने ‘हिंदुस्थानाचा युगपुरुष मल्हारराव होळकर’ या ऐतिहासिक कादंबरीच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन ५ जूनला सकाळी ९ वाजता शिवछत्रपती ग्रंथालयात करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील उपस्थित राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून अण्णा डांगे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, विजयअण्णा बोराडे, अमर बारगुळ, खान्देश जहागीरदार, डॉ. गणेश मतकर, इंदूर, डॉ. एम. एस. भातांब्रे आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी नगराध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे हेही उपस्थित राहणार आहेत.

तंबाखूविरोधीदिनी लातुरात गाढव रॅली
लातूर, ३ जून /वार्ताहर

जागतिक तंबाखूविरोधीदिनाचे औचित्य साधून वॉरियर ग्रुप व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या वतीने शहरात गाढव रॅली काढण्यात आली.वॉरियर ग्रुपच्या वतीने मागील वर्षी निव्र्यसनी राहण्याची शपथ दिलेल्या ११२ युवकांपैकी ५० जण व्यसनमुक्त झाले. यावर्षी सुभाष चौक, हनुमान चौक, गांधी चौक, आझाद चौक, रत्नापूर चौक, पटेल चौक, साळेगल्ली, सम्राट चौक या भागात गाढवाच्या गळ्यात गुटख्याच्या माळा, कानात सिगारेट, पाठीवर व्यसनाचे बॅनर लावून प्रबोधन करण्यात आले. या वेळी वॉरियरचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश ढवळे, डॉ. अरुण शहा, अ‍ॅड. मधुकर कांबळे, सचिन शिंदे, बालाजी पिंपळे आदी उपस्थित होते.