Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रोहिदास पाटलांची अस्वस्थता हाच मुद्दा
धुळे ग्रामीण मतदारसंघ
संतोष मासोळे

 

एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या रोहीदास पाटील यांचा कुसुंबा मतदारसंघ नव्या रचनेत धुळे ग्रामीण या नावाने ओळखला जाणार असून त्यात नव्या ४२ गावांची भर पडल्याने जवळपास सव्वा लाख मतदारांची वाढ झाली आहे. खान्देश भागातील आमदारांना एकत्र करून अलीकडे विशाल खान्देशचा प्रयोग करणारे पाटील सध्या पक्षांतर्गत साठमारीमुळे अस्वस्थ असून त्यांची ही अस्वस्थता आणि त्या अनुषंगाने विरोधकांची होणारी मोर्चेबांधणी हेच येत्या निवडणुकीचे वैशिष्टय़ ठरणार आहे.
या पारंपरिक मतदारसंघासह जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागावर बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या पाटील यांना गेतवेळी शिवसेनेच्या प्रा. शरद पाटील यांनी चालंगीच टक्कर दिली होती. नंतरच्या काळातही प्रा. पाटील यांनी रोहीदास पाटील यांना ग्रामीण भागात चाप लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. निवडणुकीत पराभूत होऊनही गेल्या पाच वर्षांत त्यांनी ग्रामीण भागात सेनेचा पाया रुंदावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील प्रश्न ऐरणीवर आणण्यात ते अग्रेसर राहिल्यानेच धुळे पंचायत समितीवर भगवा फडकू शकला. पाठोपाठ जिल्हा परिषद व धुळे लोकसभा युतीकडे खेचण्यातही प्रा. पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचा हा प्रवास प्रस्थापितांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. परिणामी, येत्या निवडणुकीत रोहीदास पाटलांसमोर त्यांचेच कडवे आव्हान असेल, हे निश्चित.
रोहीदास पाटलांच्या राजकीय कारकीर्दीविषयी शंका उपस्थित करण्याजोगी स्थिती नसली तरी काळाच्या ओघात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रदेश स्तरावरील काँग्रेसच्याच एका बलाढय़ गटाचा त्यांना कडवा विरोध आहे. त्यातूनच त्यांची लोकसभेसाठी उमेदवारी कापली गेली. लोकसभेचे तिकीट कापले गेल्यावर पाटील यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी उघड नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर त्याचे जाहीर प्रदर्शनही करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. नंतरही पक्षाचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांच्या प्रचारात त्यांचा काडीचा देखील सहभाग दिसला नाही. किंबहुना, त्यांच्या जवाहर गटाने पटेल यांच्या विरोधातच काम केल्याची उघड चर्चा आहे. असे असून देखील धुळे ग्रामीण मतदारसंघातून पटेल यांनी तब्बल ३५ हजार मते घेतली. या मतदारसंघाला नव्याने जोडल्या गेलेल्या शिंदखेडा मतदारसंघातील २८ गावांवर पटेल यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने वचपा काढायचे ठरविले व या भागावर पकड असणारे अपक्ष आमदार द. वा. पाटील आणि आमदार जयकुमार रावल यांच्याही गटाने रोहीदास पाटलांविरोधात शक्ती लावल्यास ते चांगलेच अडचणीत येऊ शकतील. पण दरम्यानच्या काळात खुद्द पाटील यांना गळाला लावण्यासाठी युतीने प्रयत्न सुरू केल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. यदाकदाचित तसे काही झाले तर सारीच समीकरणे नव्याने मांडायला लागतील. त्यामुळे भविष्यातील चित्र नेमके काय असेल, त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अक्कलपाडा प्रकल्प कळीचा
या मतदारसंघात अनेक प्रश्न असले तरी स्थानिकांच्या दृष्टीने अक्कलपाडा प्रकल्पाचा प्रश्न विशेष जिव्हाळ्याचा आहे. या प्रकल्पाचे रेंगाळलेले काम पूर्णत्वास नेऊन अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणणे, गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्याच्या माध्यमातून शिरूड पट्टय़ातील जमीन ओलीताखाली आणणे, मानव विकास मिशन अंतर्गत या भागाचा समावेश करणे, सुलवाडे-जामफळ-कनोली योजनेचा तालुक्याला लाभ देणे हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. गावांतर्गत रस्त्यांचे मजबूतीकरण, दळणवळणाची सक्षम साधने व नव्या झोडगे औद्योगिक वसाहतीला चालना हे मुद्दे देखील प्रचारात असतील.

‘विशिष्ट मुद्दा नाही’
विधानसभेची येती निवडणूक कोणत्याही एका विशिष्ट मुद्दय़ावर लढण्याचा आपला विचार नसल्याचे आमदार रोहीदास पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. आपण सातत्याने लोकांच्या संपर्कात असून त्यामुळे स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांची जाण आपणास आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगताना बाकी राजकीय घडामोडींचा वा घटनांचा आजच विचार करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गणिते सोपी नाहीत
गेल्या निवडणुकीत रोहीदास पाटील यांना ८०, ४१९ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रा. शरद पाटील यांनी ४१, १२२ मते घेत प्रस्थापित जवाहर गटाला हादरा दिला होता. रोहीदास पाटलांचे आणखी एक विरोधक अपक्ष विनायक शिंदे यांना १९ हजार तर माजी आमदार अनिल गोटे यांना हजारभर मते मिळाली होती. या निवडणुकीत रोहीदास पाटील यांनी जवळपास ४० हजाराचे मताधिक्य घेतले असले तरी दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने यंदा त्यांना सगळी गणिते जुळवून आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. ’