Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विलासरावांचा वारसदार कोण?
लातूर मतदारसंघ
प्रदीप नणंदकर

 

लातूरची ओळख राज्यभर करून देण्यात या मतदारसंघाचे सातत्याने प्रतिनिधित्व करणाऱ्या विलासराव देशमुखांना श्रेय जाते. शिक्षण, सहकार, व्यापार अशा विविध क्षेत्रांतील लातूर पॅटर्न गाजतो आहे. १९९५ च्या निवडणुकीत विलासराव देशमुखांचा दारुण पराभव जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केला. १९९५ ते ९९ दरम्यान मतदारांशी संपर्क ठेवून १९९९ साली विलासराव राज्यात सर्वाधिक मताने विजयी झाले. ते थेट राज्याचे मुख्यमंत्री बनले. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांना पुन्हा शिवाजी पाटील कव्हेकर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून आव्हान दिले मात्र विलासरावांनी ७७ हजार मतांनी त्यांचा पराभव केला व दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले. ‘तळे राखील तो पाणी चाखील’ ही म्हण विलासरावांनीच जास्त प्रसिद्ध केली व आपल्या कारकीर्दीत रस्ते, पाणी, सिंचन, रेल्वेसेवा, विमानसेवा असे विकासाचे भरलेले ताट मतदारांपर्यंत पोहोचविले. मांजरा, विकास, रेणा या साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकाराचे काम जोरदार, राज्यातील अग्रणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून गौरव अशा सर्व जमेच्या बाजू. दुसरीकडे विस्कटलेला, असंघटित, स्वार्थात अडकलेला भाजपा हा एकमेव विरोधी पक्ष. अशी स्थिती असतानाही जनतेत मात्र सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी निर्माण होत गेली. लातूर तालुक्याची स्थापना झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना कधी यश मिळाले नव्हते एवढे यश विलासराव राज्याच्या सर्वोच्च पदावर असताना झालेल्या निवडणुकीत भाजपाला मिळाले. तीन जिल्हा परिषद सदस्य व पाच पंचायत समिती सदस्य निवडून आले त्यानंतर मात्र विलासरावांनी आत्मचिंतन करण्यास सुरुवात केली. सर्व सत्तास्थाने देशमुखांच्या गटात यामुळे सुप्त अस्वस्थता होती. कुशल संघटक व सच्चे मित्र अ‍ॅड. बी. व्ही. काळे यांच्या निधनानंतर लोकांशी संवाद साधणारा दुवा नाहीसा झाला. सामूहिक प्रयत्नातून त्यांची पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघाच्या आघाडीमुळेच खासदार निवडून आल व त्यामुळेच विलासरावांना केंद्रात मंत्रीपद मिळाले. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघाच्या पुनर्रचनेत लातूर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन शहर व ग्रामीण असे दोन मतदारसंघ बनले आहेत.
लातूर शहर मतदारसंघात संपूर्ण लातूर शहर व १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. २००४ च्या निवडणुकीत शहरातील शंभर टक्के मतदानकेंद्रावर विलासराव देशमुखांना आघाडी होती. आताच्या लोकसभा निवडणुकीत २० हजार ५७४ मतांचे मताधिक्य होते. नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. काँग्रेसची बाजू भक्कम आहे.
या मतदारंसघातून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र अमित देशमुख, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपातर्फे शिवाजी पाटील कव्हेकर किंवा त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील कव्हेकर ही नावे चर्चेत आहेत. मात्र ऐनवेळी ‘आले गोपीनाथरावांच्या मना..’ असा निर्णय होऊ शकतो. बसपा, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य याही पक्षाचे उमेदवार रिंगणात राहतील. लातूरकर विलासरावांचा वारस म्हणून कोणाला निवडणार याची उत्सुकता आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळूनही त्याचा लाभ मतदारसंघापेक्षा त्यांच्या कुटुंबालाच सर्वाधिक झाला. रस्ते, इमारती म्हणजे विकास असे सांगणे धूळफेक करणारे आहे. रोजगार निर्मितीच्या घोषणा झाल्या. कृतीच्या नावाने बोंबाबोंब. सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढीस लागावी, त्याचा आथिक स्तर उंचावण्यासाठी काहीही काम झाले नाही. असंवेदनशील प्रतिनिधी जनतेने अनुभवला असा आरोप माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केला.

लातूरचा विकास हाच माझा ध्यास राहिला. सातत्याने विकासाचे टप्पे गाठत गेलो. गेल्या पाच वर्षांत लातूर-मुंबई थेट रेल्वेसेवा, विमानसेवा, सहापदरी रस्ते, शेतकऱ्यांच्या जीवनात सिंचनाच्या माध्यमातून क्रांतीकारी बदल करणारे मांजरा नदीवरील बॅरेजेस पूर्ण झाले. लातूरची चौफेर प्रगती वेगाने करण्यात मी माझे काम पूर्ण केले याचा मला मनस्वी आनंद असल्याचे लातूरचे आमदार विलासराव देशमुख यांनी सांगितले. ’