Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दलित चळवळीचा लचका.. कुणीही मोडावा!
सत्तासंग्राम ०९

 

काँग्रेसने दगाबाजी केल्याचा आरोप करीत रिपब्लिकन नेते रामदास आठवले सध्या राजकीय वाळवंटात वणवण भटकत आहेत. त्यांचा ठणाणा कितपत गांभीर्याने घ्यायचा यावर सावकाश विचार करू, अशा बेफिकिरीत काँग्रेस नेतृत्व आहे. तिकिटापासून ते मंत्रीपदापर्यंत कमरेपर्यंत झुकणाऱ्या नेत्यांसमवेत ऐक्य कसे होणार, असा उपहासगर्भ सवाल करीत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी आठवले यांना जोरदार टोला लगावला आहे तर याचवेळी आंबेडकरी चळवळीतील आणखी एक नेते ‘पीपल्स रिपब्लिकन’चे जोगेंद्र कवाडे यांची शिवसेनेशी घसट वाढू लागली आहे. दहा दिशांना दहा तोंडे, हे रिपब्लिकन चळवळीचे दुर्दैवी वास्तव स्वयंभू नेत्यांच्या अहंकारामुळे फारसे बदलण्याची चिन्हे अध्येमध्येच दिसली आणि आता नजिकच्या भविष्यकाळात ती दिसतही नाहीत.
फुटीची तर प्रदीर्घ म्हणावी अशी ‘परंपरा’ रिपब्लिकन पक्षाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम इच्छेप्रमाणे १९५७ साली त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केला. पी. एन. राजभोज हे अध्यक्ष असलेल्या या पक्षात बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, आवळे बाबू, दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे, आर. डी. भंडारे, दत्ता कट्टी, अ‍ॅड. ना. ह. कुंभारे, अ‍ॅड. दा. ता. रुपवते असे नेते होते. पण पक्षाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच फूट पडली. पक्षातील पहिल्या फुटीतून एन. शिवराज, बॅ. खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड आदींचा एक गट तर अ‍ॅड. बी. सी. कांबळे, अ‍ॅड. आवळे बाबू असा दुसरा गट स्थापन झाला. या फुटीचा आणि अहंकारी नेत्यांच्या स्वभावाचा फायदा वेळोवेळी सत्ताधारी काँग्रेसने पुरेपुर घेतला. प्रत्येक वेळी छोटय़ा - छोटय़ा सत्तास्थानांच्या तुकडय़ासाठी रिपब्लिकन नेत्यांना काँग्रेसने वापरून घेतले आणि संधी येताच लाथाडलेही. मात्र तरीही दलित चळवळीने कायम काँग्रेसच्या वळचणीलाच राहणे पसंत केले. ११९८ च्या लोकसभा निवडणुकीत तर संपूर्ण दलित चळवळच काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. या निवडणुकीत रिपब्लिकन चळवळीतील सर्व गटांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र काही महिन्यांतच महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्यामुळे ९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या मागे जायचे यावरून रिपब्लिकन नेत्यांत मतभेद झाले आणि आठवले, कवाडे, गवई गटांत बखेडा उभा राहिला. कवाडे आणि गवई काँग्रेसबरोबर राहिले तर रामदास आठवले यांनी पवारांचे बोट पकडले.
धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दय़ावरून कायम काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण करणाऱ्या दलित चळवळीला आपल्या सोबत यायचे आवाहन शिवसेनेने सातत्याने केले. मात्र शिवसेनेच्या गळाला दलित नेत्यांतील अगदीच छोटे मासे लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रारंभापासूनच शिवशक्ती - भीमशक्ती एकत्र यावी, असे प्रयत्न केले. १९७३ च्या महापालिका निवडणुकांत तर शिवसेनेने मुस्लिम लीगशी युती केली होती आणि चाँद तारा रेखाटलेल्या व्यासपीठावरून ठाकरेंनी भाषण केले होते. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी २००३ साली भीमशक्तीला पुन्हा एकदा मैत्रीची साद घातली. मात्र नामदेव ढसाळ वगळता त्यांच्या हाकेला दलित नेत्यांपैकी कुणी ओ दिली नाही. आता २००९ चा सत्तासंग्राम काहीही करून जिंकायचा असेल तर राज्यातील एकेक जागा पक्की करीत न्यावी लागणार आहे, याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. मुंबई, ठाण्यात राज ठाकरेंचा मनसे पुन्हा एकदा युतीच्या मनसुब्यांना खिंडार पाडण्याच्या तयारीत असताना उद्धव ठाकरेंना हिंगणघाट व अडय़ार येथे प्रभाव असलेल्या कवाडे यांचा हात हातात हवा आहे. महाराष्ट्र विधानसभेचा सत्तासंग्राम जसजसा जवळ येईल तसतशा अशा निवडणूकपूर्व मैत्री, आघाडय़ांच्या चालींना वेग येत जाणार आहे.
लोकसत्ता पोलिटिकल ब्युरो