Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मीराकुमार लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष
नवी दिल्ली, ३ जून/खास प्रतिनिधी

 

भारतीय संसदेच्या इतिहासात बुधवार, ३ जून २००९ या दिवसाची सुवर्णाक्षरात नोंद होईल. लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मीराकुमार यांच्या नावाचा आज लोकसभेत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रस्ताव व अनुमोदन केल्यानंतर हंगामी अध्यक्ष माणिकराव गावित यांनी सभागृहाचा कौल मागितला आणि सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे बाके वाजवून व आवाजी मतांसह होकार दर्शविला तेव्हा लोकसभेच्या ६२ वर्षांंच्या इतिहासात एका महिलेला प्रथमच अध्यक्षपदाचा सन्मान लाभत होता. मीराकुमार यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा दोन्ही हातांनी बाके वाजविणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
राष्ट्रपतीपदावर प्रतिभाताई पाटील निवडून आल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांंनी ६४ वर्षीय मीराकुमार यांच्या रुपाने एका दलित महिलेने लोकसभा अध्यक्षपदावर झेप घेतली. लोकसभा अध्यक्षपदी मीराकुमार यांची निवड करण्याचा प्रस्ताव काँग्रेस व युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मांडला आणि लोकसभेचे नेते प्रणव मुखर्जी यांनी त्याचे अनुमोदन केले. भाजपकडून अनुक्रमे विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी आणि उपनेत्या सुषमा स्वराज, तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी आणि रत्ना डे, द्रमुककडून टी. आर. बालू आणि ए. के.एस. विजयन, समाजवादी पार्टीकडून मुलायमसिंह यादव आणि शैलेंद्रकुमार, बसपकडून डॉ. बलीराम आणि दारासिंह चौहान, जनता दल युनायटेडकडून शरद यादव आणि राजीवरंजन सिंह, बिजू जनता दलाकडून अर्जुनचरण सेठी आणि भातृहरी महताब, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय जनता दलाकडून लालूप्रसाद यादव आणि जगदानंद सिंह, नॅशनल कॉन्फरन्सकडून फारुक अब्दुल्ला आणि मिर्झा मेहबूब बेग, ई. अहमद आणि मोहम्मद बशीर, असादुद्दीन ओवेसी आणि तोल तिरुमावलवम, रामसुंदर दास आणि भूदेव चौधरी यांनी मीराकुमार यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव व त्याचे समर्थन केले.
हंगामी अध्यक्ष माणिकराव गावित यांनी मीराकुमार यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मतदानाला टाकला तेव्हा सभागृहातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे बाके वाजवून आवाजी मतांनी त्यांची अविरोध निवड केली. त्यानंतर पहिल्या रांगेतील बाकावर बसलेल्या मीराकुमार यांना पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभेतील नेते प्रणव मुखर्जी आणि विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी सन्मानपूर्वक अध्यक्षांच्या आसनावर बसविले आणि संसदेच्या इतिहासात आणखी एक पान सुवर्णाक्षराने लिहिले गेले. त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभेतील नेते प्रणव मुखर्जी, विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, वासुदेव आचार्य, मुलायमसिंह यादव, अर्जुनचरण सेठी, ममता बॅनर्जी, टी. आर. बालू, चंद्रकांत खैरे, तंबी दुराई, शरद पवार, शरद यादव, गुरुदास दासगुप्ता, लालूप्रसाद यादव यांच्यासह
सभागृहातील मान्यवरांनी मीराकुमार यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षांव केला आणि सभागृहाचे कामकाज गोंधळ, गडबड न होता आदर्श परिस्थितीत चालविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले.