Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नक्षलवाद्यांचे अभयदान धुडकावून पोलीस जवानाने पत्करले वीरमरण
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, ३ जून

 

गेल्या एक फेब्रुवारीला मरकेगावजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हत्याकांडात एका शूर पोलीस जवानाने शत्रूपक्षाने दिलेले अभयदान धुडकावून दोन नक्षलवाद्यांचा बळी घेऊन वीरमरण पत्करले, अशी खळबळजनक माहिती आता उघड झाली आहे. गेल्या तीन महिन्यात नक्षलवाद्यांनी तीन चकमकीत तब्बल ३४ पोलिसांचे बळी घेतल्याने सध्या ही हिंसक चळवळ चर्चेत आली आहे. यापैकी दोन चकमकीत नक्षलवाद्यांनी सर्व पोलिसांना ठार मारले. यामुळे या चकमकीदरम्यान नेमके काय घडले किंवा काही नक्षलवादी ठार झाले, याविषयीची माहिती कुणालाच उपलब्ध होऊ शकली नाही. या पाश्र्वभूमीवर गेल्या एक फेब्रुवारीला मरकेगावजवळ झालेल्या हत्याकांडात नेमके काय घडले, त्याचा तपशील आता हाती आला आहे. या हत्याकांडात पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडधेकर यांच्यासह १५ जवान शहीद झाले होते. येथेही दीडशे ते दोनशेच्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांना चारही बाजूने घेरून अतिशय निर्दयपणे त्यांचा बळी घेतला. ही चकमक सुरू झाल्यानंतर पहिल्याच फटक्यात सर्व पोलीस जखमी झाले. त्याही स्थितीत त्यांनी प्रतिकार कायम ठेवला. जखमी पोलिसांपैकी काहींना दगडावर आपटून ठार केल्यानंतर काही नक्षलवाद्यांची नजर पोलीस जवान बैसाखू पडोतीवर गेली. हा जवान मूळचा कोटगुलचा राहणारा होता. चकमकीत सहभागी झालेले अनेक नक्षलवादी त्याला ओळखत होते. त्यांच्या विनंतीवरून दलम कमांडर दिवाकरने या जवानाला तू पळून जा. आम्ही तुला मारणार नाही, असे ओरडून सांगितले. यावेळी फक्त पोलीस उपनिरीक्षक गुडधेकर गंभीर जखमी अवस्थेत जिवंत होते. पोलिसांकडील दारूगोळा संपलेला होता. यामुळे नक्षलवाद्यांनी या दोघांना घेरले होते. जखमी अवस्थेत असलेल्या बैसाखूने नक्षलवाद्यांचे हे अभयदान साफ धुडकावले. माझे सर्व सहकारी मारले गेले असताना मी जिवंत राहून काय करू. मलाही मारून टाका, असे हा जवान म्हणाला. त्याकडे दुर्लक्ष करीत नक्षलवाद्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या उपेंद्र गुडधेकरांना बंदुकीच्या दस्त्यांनी ठेचणे सुरू केले. आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे, हे लक्षात येताच जखमी बैसाखूने बेसावध असलेल्या एका नक्षलवाद्याची बंदूक हिसकली व त्यातून गोळय़ा झाडत दोन नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नक्षलवादीसुद्धा काही वेळ गांगरून गेले. यानंतर लगेच त्यांनी गुडधेकर व बैसाखू यांना गोळी घालून ठार केले. पोलिसांशी लढताना नक्षलवादी कधीच दयामाया दाखवत नाहीत. आजवरचा त्यांचा तसा इतिहासही नाही. या प्रकरणात काही नक्षलवाद्यांनी बैसाखूला पळून जाण्याची सूचना केली आणि नेमका तेथेच घात झाला. यामुळे घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर या मुद्यावरून नक्षलवाद्यांमध्ये वादंग झाल्याची माहिती आता उघड झाली आहे.
मरकेगाव, मुंगनेर व टवीटोला या तीनही ठिकाणच्या हल्ल्याची आखणी छत्तीसगडमध्ये सक्रिय असलेल्या सुजान नावाच्या जहाल नक्षलवाद्याने केली होती. त्यानेही नंतर सर्व दलम कमांडरची बैठक घेऊन असे दया दाखवण्याचे प्रकार अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा सर्वाना दिल्याची माहिती एका विश्वसनीय सूत्राने दिली. गेल्या २१ मे रोजी धानोरा मार्गावर टवीटोला येथे १६ पोलिसांचे बळी घेणारे नक्षलवादी मुरूमगावच्या सी-६० पथकाची वाट पाहात थांबले होते. त्यांच्यासाठीच त्यांनी सापळा रचला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.