Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भारतीय नोकरशाही आशियात सर्वात अकार्यक्षम
सिंगापूर, ३ जून/ वृत्तसंस्था

 

भारतातील नोकरशाही आशियामधील सर्वात ‘अकार्यक्षम नोकरशाही’ असल्याचे हाँगकाँगमधील एका संस्थेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. भारतीय सनदी अधिकारी हे काम करण्यात अत्यंत अक्षम असून, त्यांच्याकडून काम करून घेणे ही सर्वात रटाळ आणि त्रासदायक प्रक्रिया असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. उत्तर आणि दक्षिण आशियातील १२ देशांमधील सुमारे १, २७४ तज्ज्ञांच्या मतचाचणीमधून हाँगकाँगमधील ‘पॉलिटिकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक रिस्क कन्सल्टन्सी’ने (पीईआरसी) हा अहवाल आज सादर केला. या व्यावसायिक सर्वेक्षणामध्ये सिंगापूरमधील सनदी अधिकारी आशियातील सर्वात कार्यक्षम ठरले आहेत. कोणताही तणाव नसणाऱ्या सर्वसामान्य परिस्थितीत सिंगापूरमधील सनदी अधिकारी अत्यंत सक्षमतेने कार्यरत दिसतात. मात्र एखादी चूक यंत्रणेला अडचणीत आणणारी ठरते, तेव्हा हे अधिकारी पारदर्शकतेबाबत असहाय झालेले दिसतात. झालेल्या चुकीबाबत जबाबदार घटकांबाबत त्यांनी मौन बाळगल्याचे दिसून येते. मात्र सर्वसाधारण परिस्थितीत आशियामधील इतर कुठल्याही सनदी अधिकाऱ्यांपेक्षा सिंगापूरमधील नोकरशाही सर्वात कार्यक्षम ठरली आहे.विशेष म्हणजे सलग तीन वर्षे सिंगापूरमधील नोकरशाही सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आहे. याउलट भारतीय नोकरशाही ही केंद्राकडे सत्ता असलेली आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर एखादा निर्णय घेतले जाताना अधिकाऱ्यांच्या हातात कोणतेही अधिकार नसतात, स्वतमध्ये बदल करण्यास हे अधिकारी नाखूष असतात किंवा आपल्या कामांमध्ये कुचराई करण्यात पटाईत असतात, असे अहवालात म्हटले आहे.
अकार्यक्षम सरकार असले तरी थायलंडमधील सनदी अधिकारी तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे ‘पीईआरसी’ने म्हटले आहे. देशासमोर असलेल्या अस्थिर परिस्थितीमुळेच सनदी अधिकारी कार्यक्षम असल्याचे अहवालात म्हटले आहे. दुसऱ्या स्थानी हाँगकाँगचा समावेश करण्यात आला आहे. चीनने आपल्या नोकरशाहीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विविध उपाय केले असले, तरी या मतचाचणीतून ती नवव्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अहवालामध्ये कार्यक्षमतेनुसार लावण्यात आलेली देशांची क्रमवारी पुढीलप्रमाणे : सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड, दक्षिण कोरिया, जपान, मलेशिया, तैवान, व्हिएतनाम, चीन, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, भारत.