Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सामूहिक कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू असताना विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
लातूर, ३ जून/वार्ताहर

 

मार्च २००९ मधील बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील ३५६१ विद्यार्थ्यांची समान उत्तरे लिहिली असल्याचा ठपका ठेवून लातूर परीक्षा मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांची चौकशी सुरू होती. आज दुपारी १२च्या सुमारास संतप्त विद्यार्थ्यांनी राजस्थान विद्यालयात सुरू असलेल्या चौकशी अधिकाऱ्यांसमोरील फर्निचर व खिडक्यांच्या काचांची मोडतोड केली. त्यामुळे मंडळाला चौकशी स्थगित ठेवावी लागली.
बुधवार, ३ जूनला काही वृत्तपत्रात मुखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा निकाल रोखल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच मुखेड तालुक्यातील पालक, संस्थाचालक व विद्यार्थ्यांत एकच खळबळ उडाली. दोन दिवसांपासून विद्यार्थी व पालकांची चौकशी अतिशय शांततेत राजस्थान विद्यालयातील काही खोल्यांत सुरू होती. ४ जूनला जाहीर होणाऱ्या बारावीच्या निकालाची चौकशी सुरू असणाऱ्या ३५६१ विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला जाईल व चौकशी पूर्ण झाल्यावरच त्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असे मंडळाचे प्रभारी सचिव आर. एस. मुदाळे यांनी पत्रकारांना सांगितले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे बुधवार, ३ जूनला सकाळी सुरू असलेल्या चौकशीस मुखेड तालुक्यातून सुमारे ४०० विद्यार्थी, पालक, संस्थाचालक दाखल झाले. ११ ते १२ अशी एक तास सुमारे ५० विद्यार्थ्यांची चौकशी झाली. १२च्या सुमारास चौकशी आटोपून एक विद्यार्थिनी बाहेर आली तेव्हा ती रडत होती. कोणीतरी चौकशी अधिकारी बळजबरीने आम्ही कॉपी केली आहे असे लिहून घेत आहेत, असे वृत्त पसरले. त्यानंतर रांगेतील सर्व विद्यार्थी आत घुसले व त्यांनी चौकशी सुरू असलेल्या सर्व कक्षांच्या खिडक्यांची तावदाने फोडली. आतील फर्निचर बाहेर फेकून दिले. विद्यार्थ्यांचा रुद्रावतार पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. दरम्यान पोलिसांना हे वृत्त समजताच गांधी चौक व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दाखल झाले. पोलिसांची संख्या कमी व विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे गोंधळ सुरू होता.