Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘राष्ट्रपुरुषांच्या नावांचे शॉर्टफॉर्मस चालणार नाहीत’
मुंबई, ३ जून/प्रतिनिधी

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐवजी छ.शि.म. टर्मिनस किंवा सीएसटी, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याऐवजी एल. टी. मार्ग पोलीस ठाणे, असे राष्ट्रपुरुषांच्या नावांचे शॉर्टफॉर्मस यापुढे चालणार नाहीत. राष्ट्रपुरुषांच्या पूर्ण नावांचा उल्लेख रस्त्यांच्या पाटय़ांना, रेल्वे स्थानकांच्या पाटय़ांवर, तिकीटांवर उपनगरी रेल्वे गाडय़ांवर करावा लागेल. याची पूर्तता उद्या सकाळी ११.०० वाजेपर्यंत करावी, असे निर्देश विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी आज सरकारला दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हेमंत टकले यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. टकले म्हणाले की, छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी त्या स्थानकास सीएसटी असे संबोधले जाते. लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी लो. टि. टर्मिनस असे संबोधले जाते, हा त्या राष्ट्रपुरुषांचा अवमान आहे.
यावर शिवसेनेचे दिवाकर रावते म्हणाले की, केवळ स्थानकांनाच नव्हे तर येणाऱ्या जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांवरही या स्थानकांचा उल्लेख असाच केला जातो.
रेल्वेच्या तिकीटांवर, तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या घोषणाही अशाच पद्धतीने केल्या जातात. भाजपच्या मधू चव्हाण यांनीही राष्ट्रपुरुषांच्या नावांचे शॉर्टफॉर्मस सर्रास वापरले जात असल्याचे सांगितले. अखेर उपसभापती वसंत डावखरे यांनी यातील ज्या गोष्टी एमएमआरडीए म्हणजेच राज्य सरकारच्या अखत्यारित येत असतील त्यांना तात्काळ कळवावे व राष्ट्रपुरुषांची पूर्ण नावे लिहावीत व छापावीत असे निर्देश दिले. तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या गोष्टींबाबत राज्य सरकारने तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधून असा अवमान होणार नाही, हे पहावे, असे सांगितले.