Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

टक्का घसरला
उत्पन्नाचा, उत्पादनाचा आणि मराठीचाही
मुंबई, ३ जून / खास प्रतिनिधी

 

मराठी माणसावर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन सुरू केले असले तरी मुळातच राज्यातील मराठी भाषकांचे प्रमाण गेल्या तीन दशकांच्या तुलनेत घटल्याची धक्कादायक माहिती नियोजन विभागाने आज विधिमंडळात सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आली आहे. राष्ट्रीय नमुना पाहणीवर आधारित निष्कर्षांनुसार राज्यातील रोजगार सातत्याने वाढून २००४-०५ मध्ये तो ४.३ कोटी इतका झाला असला तरी २००७-०८ मध्ये तो कमी होऊन ४.१ कोटी इतका झाल्याने मंदीची चाहूल स्पष्टपणे दिसून येत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २००८-०९ मध्ये काढण्यात आला आहे. राज्यांतर्गत स्थूल उत्पन्नात घट ६.७ टक्क्यांनी घट झाली असून खरीप आणि रब्बी हंगामातील एकत्रित अन्नधान्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा २४ टक्क्यांनी कमी आहे. तेलबियांच्या उत्पादनातही ४९ टक्के इतकी तीव्र घट अपेक्षित असून उसाचे उत्पादनही गेल्यावर्षीच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी कमी आहे.
मराठी भाषकांचे प्रमाण घटले असतानाच हिंदी भाषिकांचे प्रमाण मात्र महाराष्ट्रात वाढले आहे. १९७१ मध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण राज्याच्या एकूण लोकसंख्येत ७६.५ टक्के होते. १९८१ मध्ये हेच प्रमाण ७२.८ टक्के झाले होते. १९९१ मध्ये मराठी भाषकांचे प्रमाण ७३.३ टक्क्यांवर घटले होते. २००१ मध्ये हे प्रमाण ६८.८ टक्क्यांवर आले होते. मराठी भाषकांचे घटते प्रमाण लक्षात घेता २०११ मध्ये होणाऱ्या जनगणनेत हे प्रमाण तर आणखी घटलेले असेल. १९७१ मध्ये हिंदी भाषकांचे प्रमाण पाच टक्क्यांच्या आसपास होते. हेच प्रमाण २००१ मध्ये ११ टक्क्यांवर गेले होते. नव्या जनगणनेत हेच प्रमाण नक्कीच आणखी वाढलेले असले यात काहीच शंका नाही. २००७-०८ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नमुना पाहणी अहवालानुसार गेल्या पाच वर्षांंमध्ये राज्यात स्थलांतरित झालेल्यांमध्ये उत्तर भारतातून आलेल्यांचे प्रमाण जास्त आहे.