Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रधान समिती अहवालामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची विकेट?
समर खडस
मुंबई, ३ जून

 

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यामध्ये पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीवर विरोधक नाराज असले तरी या अहवालाच्या कृती आराखडय़ानुसार मुंबई पोलीस दलाच्या चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आता मर्यादित जबाबदारी ठेवून त्यांना सध्याच्या महत्त्वाच्या पदावरून दूर करण्यात येणार आहे. ही माहिती एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली. या संपूर्ण हल्ल्यामध्ये पोलिसांच्या विविध खात्यांचा एकमेकांशी समन्वयाचा अभाव असल्याचे प्रधान समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले असून ज्या पद्धतीने विरोधकांना हा अहवाल मुंबई पोलिसांची एकतर्फी बाजू घेणारा वाटतो आहे तो प्रत्यक्षात तसा नसल्याची माहितीही या सूत्रांनी दिली. या अहवालावरून २६ / ११ च्या हल्ल्याला तोंड देताना ज्या अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडता आली नाही, अशा अधिकाऱ्यांवर काही प्रमाणात ठपका ठेवून त्यांची बदली केली जाणार असल्याचे समजते. यात मुंबई पोलीस दलातील अत्यंत वरिष्ठ अधिकारी आहेत. या हल्ल्याबाबतची गुप्त माहिती, त्याचे संकलन, त्याचे विश्लेषण व त्यातून अन्वयार्थ काढून त्या पद्धतीची तयारी करण्यात आली नव्हती. त्यामुळे गुप्त माहिती विभागातील एक अधिकारी, तसेच पोलीस कंट्रोल रूममध्ये राहून संपूर्ण ऑपरेशनचे समन्वय साधण्याची ज्यांची जबाबदारी होती, ते अधिकारी तसेच संपूर्ण प्रकरणाची अंतिम जबाबदारी ज्यांच्यावर येते अशा एका अधिकाऱ्यांवर या संपूर्ण प्रकरणाचे खापर फोडले जाणार असल्याचे समजते. या प्रकरणाची कुणकुण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागली असल्याने आता या अधिकाऱ्यांनी विकेट जाऊ नये म्हणून त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. एकवेळ बदली चालेल पण २६/११ च्या हल्ल्याला सामोरे जाताना गलथानपणा झाल्याचा दोषारोप नको, अशी रदबदली यातील काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर सुरू केली असल्याचेही समजते. मात्र या एकूण प्रकाराबाबत विरोधक सध्या खूपच आक्रमक झाले असल्याने कोणाचा ना कोणाचा बळी या प्रकरणात जाणारच, असेही सूत्रांनी सांगितले.