Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईतील हिवाळा ऋतुचक्रातून नाहीसा होण्याची भीती
अभिजित घोरपडे
मुंबई, ३ जून

 

मुंबईच्या ऋतुचक्रातून नजिकच्या भविष्यात हिवाळा नाहीसा होण्याची भीती असून, ‘मुंबईत गारठा असतो’ हे वाक्यसुद्धा इतिहासजमा होण्याची शक्यता एका संशोधनाद्वारे निर्माण झाली आहे. कारण मायानगरीच्या पर्यावरणात झालेले स्थानिक बदल आणि जागतिक तापमानवाढ यांचा एकत्रित परिणाम म्हणून येथील तापमानात गेल्या शंभर वर्षांमध्ये तब्बल १.६२ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ही वाढ हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये अधिक आहे. मुंबईच्या कुलाबा वेधशाळेतील १९०१ ते २००७ या काळातील कमाल तापमानाच्या नोंदींचे विश्लेषण करून ही वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेचे प्रमुख व भारतीय हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक डॉ. आर. व्ही. शर्मा व त्यांच्या गटाने हा अभ्यास केला. गेल्या शतकाच्या सुरुवातीला ३०.१२ अंश सेल्सिअस असलेले मुंबईचे कमाल तापमान (दुपारच्या वेळी नोंदवले जाणारे सर्वाधिक तापमान) आता ३१.७४ अंशांवर पोहोचले आहे, असे या अभ्यासावरून स्पष्ट झाले. ही १.६२ अंश सेल्सिअसची वाढ लक्षणीय आहे, असे डॉ. शर्मा यांनी या बदलांबाबत माहिती देताना सांगितले. या बदलांचा संबंध जागतिक तापमानवाढीशी तर आहेच, पण त्याचबरोबर मुंबईतील पर्यावरण आणि एकूणच विकासाच्या प्रक्रियेत झालेल्या बदलांचाही तो परिणाम आहे, अशी कारणमीमांसाही या अभ्यासाद्वारे करण्यात आली आहे. मुंबईसाठी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे तीन महिने खऱ्या अर्थाने थंडीचे! मुंबईत थंडीचा कडाका नसला, तरी निदान या तीन महिन्यांमध्ये हवेत गारवा जाणवतो. तसेच, उष्ण-दमट हवामान आणि घामापासून सुटका होऊन दिलासासुद्धा मिळतो. कुलाबा वेधशाळेच्या नोंदींनुसार, गेल्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे १९०१ ते १९१० या दशकात डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीनही महिन्यांमध्ये कमाल तापमान तीस अंशांच्या आतमध्येच राहिले आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये तर ते २८ अंशांच्या आसपासच होते. याचबरोबर वर्षांतील बारापैकी सात महिन्यांमध्ये सरासरी कमाल तापमान ३० अंशांच्या खालीच होते. गेल्या शंभर वर्षांमध्ये मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता ऑगस्ट महिना वगळता इतर सर्वच महिन्यांमधील सरासरी कमाल तापमान ३० अंशांपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. ही तापमानातील वाढ मुख्यत: हिवाळ्यातच दिसून आली आहे. हिवाळ्यातील नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे तापमान तर या शंभर वर्षांच्या काळात तीन अंशांनी वाढले आहे. त्या मानाने पावसाळ्याच्या काळात (जून ते सप्टेंबर) तापमानात अतिशय कमी वाढ झाली आहे. जून व ऑगस्ट महिन्यांमध्ये ती केवळ अध्र्या अंशांचीच आहे. हिवाळ्यात तापमानाची वाढ अशीच कायम राहिली तर भविष्यात मुंबईतील हिवाळा हळूहळू नष्ट होण्याची भीती डॉ. शर्मा यांनी व्यक्त केली आहे. या बदलांची कारणे शोधताना मुंबईत झालेल्या स्थानिक बदलांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये लोकसंख्येत झालेली वाढ, त्यामुळे काँक्रिटचे जंगल फोफावणे, बऱ्याचशा भागातील घनदाट जंगल नाहीसे होणे, पूर्वी हिरव्या असलेल्या जमिनींवर वाढलेले उद्योग यांचा हा एकत्रित परिणाम आहे, असे हा अभ्यास सांगतो.