Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सामूहिक कॉपी प्रकाराबाबत मुख्यमंत्री नाराज
नांदेड, ३ जून /वार्ताहर

 

नांदेड जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागातील विशेषत: मुखेड तालुक्यातील सामूहिक कॉपीच्या प्रकाराबाबत राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांवर कारवाई झाली त्यापैकी बहुतांश शिक्षणसंस्था काँग्रेस पुढाऱ्यांच्या असून हे सर्व संस्थाचालक मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक आहेत हे विशेष!
नांदेड जिल्ह्य़ातल्या वेगवेगळ्या भागातील कॉपी प्रकरणांची जिल्ह्य़ात सर्वत्र चर्चा सुरू आहे. सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यासंदर्भात लातूर शिक्षण बोर्डाचे अधिकारी सध्यातरी ठाम असल्याने पालक, विद्यार्थी व संस्थाचालक अस्वस्थ झाले आहेत. देणगीच्या नावाखाली मोठी रक्कम घेऊन क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश द्यायचे. प्रवेश देतानाच उपस्थितीबाबत मुक्त सूट देऊन उत्तीर्ण करण्याची हमी द्यायची असे उद्योग संस्थाचालक करतात. कंधार, मुखेड व नायगाव तालुका कॉपीबाबत कुख्यात आहे.
या तालुक्यातल्या अनेक केंद्रांना परीक्षेच्या दरम्यान जत्रेचं स्वरूप येते. संस्थाचालकांच्या या गैरप्रकाराला शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांची मूक संमती आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देणाऱ्या एकाही संस्थेविरुद्ध शिक्षण विभागाने कारवाईचे धाडस केले नाही किंवा कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. परीक्षेदरम्यान चार दोन भरारी पथके नेमायची, आदर्श शाळांना या पथकांनी भेटी द्यायच्या, चार दोन कारवाया करायच्या व खूप मोठी कारवाई केल्याचा आव आणायचा असा प्रकार दरवर्षी नांदेड जिल्ह्य़ात घडतो. दरवर्षी असे प्रकार घडत असताना यंदा लातूरच्या बोर्डाने कारवाईचे हत्यार उपसले आणि सर्वाचेच अवसान गळाले. कॉपीसारख्या गैरप्रकाराबाबत मोठय़ा प्रमाणावर कारवाई होणार असल्याने या भागातील शिक्षणसम्राट म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार अविनाश घाटे, नगराध्यक्ष गंगाधर राठोड, मुखेडचे सभापती व्यंकटराव गोजेगावकर, सुभाष पाटील, शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. सर्व प्रकार ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री स्वत: एका शिक्षणसंस्थेचे प्रमुख आहेत. नांदेड जिल्ह्य़ात त्यांची शिक्षणसंस्था आदर्श मानली जाते. कॉपी किंवा कोणत्याही गैरप्रकाराला त्यांच्या संस्थेत थारा नाही. मुखेड तालुक्यातील शिष्टमंडळाकडे त्यांनी सर्व प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. हे काय चालू आहे? गेल्या आठवडय़ात तुमच्याच तालुक्यातल्या मालगुजारी तलावातील गाळ काढण्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. हे अयोग्य आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत काय करता येईल ते करू अशी ग्वाही त्यांनी दिली परंतु एकंदरीत संपूर्ण प्रकाराबाबत त्यांनी शिष्टमंडळाला सौम्य शब्दात फटकारले.
आमदार सुभाष साबणे वगळता शिष्टमंडळातील सर्वचजण मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक आहेत. लातूरचे बोर्ड आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसेल अशी भीती काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे.
लातूर बोर्डाने कारवाई आकसातून केली असे म्हणणे चुकीचे आहे. जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात तशी कारवाई झाली असती. परंतु मुखेड तालुक्यातल्याच बहुतांश विद्यार्थ्यांवर कारवाई होण्याचे चिन्हे असल्याने बोर्डाच्या भूमिकेचे काहींनी स्वागत केले आहे. सामूहिक कॉपी समाजाला लागलेली कीड आहे. असे असताना त्याचे समर्थन कसे करायचे असा सवाल करून कुणीतरी हे प्रकार थांबविलेच पाहिजे. लातूर बोर्डाने त्याची सुरुवात केली आहे. या कारवाईने भविष्यात सामूहिक कॉपीचे धाडस कुणी करणार नाही. त्यामुळे कोणतेही राजकारण न करता किंबहुना कोणाच्या दबावाला बळी न पडता लातूर बोर्डाने आपल्या कारवाईवर ठाम रहावे अशी अपेक्षा नांदेड शहरातील एका शिक्षणसंस्थाचालकाने व्यक्त केली.
संपूर्ण जिल्ह्य़ातच नव्हे तर मराठवाडय़ात चर्चिल्या जाणाऱ्या सामूहिक कॉपी प्रकरणाबाबत कोणती भूमिका घ्यावी यावरून संबंधित विभागातील अधिकारीही बुचकळ्यात सापडले आहेत. कारवाई करावी तर विद्यार्थ्यांचे नुकसान, नाही केली तर गैरप्रकाराला खतपाणी असा प्रकार घडेल असे मानले जाते.