Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

माझा ‘इनाम’दार सखा

 

' मागच्या महिन्यात आमचा इनामातला पिंपळ बुडातूनच कोसळून पडला. खरंतर एवढा मोठा पसारा होऊन उभा असणारा हा वृक्षराज असा एकाएकी कोसळून पडला, हे सारं कळण्यापलीकडचच होतं. बातमी कळली, तेव्हा बऱ्याच वेळ विश्वासही बसला नाही. फार मोठी वावटळ आली आणि त्यात कोसळला, असंही झालं नाही. आदल्या दिवशी थोडासा पाऊस झाला होता. अन् या पावसाबरोबर थोडासा वावटळी वाराही आला होता. पण त्यामुळे एवढा पिंपळराजा आडवा होईल, असं वाटलं नाही. काहीतरी निमित्त होऊन आमचा हा कुळपुरुष आपलं अंग आडवं टाकून अखेरचा निरोप घेता झाला होता. खरंतर या पिंपळवृक्षाबद्दल मी अनेक ठिकाणी लिहून-सांगूनही त्याचं मनातलं स्मरण- अस्तित्वच संपत नाही. आजही इनामाच्या शेतात गेलं, की त्याचा सारा मागचा इतिहास आठवत राहतो. त्याच्या खाणाखुणा मनात उमटून येतात. विनाकारण मनात एक अनामिक उदासी येऊन जाते. आमच्या साऱ्या वतनाचा आणि घर-घराण्याचा तो अखेरचा साक्षीदार वाटायचा. या थोरल्या वृक्षानं आपले थोरलेपण अबाधितपणे राखले होते. आपली हुकमत या साऱ्या परिसरावर राखली होती. शेताचा आणि आमच्या या ‘इनामा’चा तो रखवालदार होता. साऱ्या साऱ्या ‘कुळकथा’ त्याच्या पोटात दडलेल्या होत्या. अनेक स्वकीयांचा तो आधार होता. आजूबाजूच्या झाड, झाडोऱ्यांचा तो खराखुरा मालक होता. त्यांचा तो हक्कदार होता. आमच्या या इनामातल्या पिंपळाबद्दलही साऱ्या गावाला आस्था होती. आपलेपण होतं. गावाच्या वयाचा तो होता. भलामोठय़ा थोराड माणसानं आपल्या डोक्यावर छत्री उघडून धरावी तसा त्याचा डेरेदार आकार होता. छत्रीचा भलामोठा गोंडा दूर-दूरवरून दिसायचा. हा डेरेदार छत्रीदार गोंडा हीच त्याची अन् गावाची ओळख होती. पिंपळावरून गावाचं ठिकाण वाटसरूंना लागायचा.
खरंतर बहात्तरच्या दुष्काळातच हा वाचतो का जगतो असं वाटत होतं. त्याच्या साऱ्या शेंडेफांद्या वठून गेल्या होत्या. लहान-मोठय़ा वाऱ्यात तो कण्हल्यासारखा आवाज करीत कडकडून जायचा. त्याच्या चार-दोन फांद्या गळून पडायच्या. आता त्याच्या अंगाबुडावरही म्हातारपणाच्या साऱ्या खाणाखुणा दिसायच्या. सालीचे पोपडे उलथून पडायचे. त्याच्या पानाचाही आकार आता आता लहानखुरी झाला होता. आम्ही आमच्या गरजेनुसारही त्याच्यावर अधूनमधून कुऱ्हाड चालवीत असू. पण आता आता कुऱ्हाड उचलायलाही मन धजत नव्हतं. खरंतर या ‘इनाम’दार वृक्षपुरुषानं त्याची त्याची वृक्षजमात मोठय़ा आस्थेनं जपली-जोपासली होती. तिथंच विहिरीच्या काठावर औदुंबर पसारा धरून उभं असणारा त्याचा ‘सखा’ होता. आंबा-जांभळीची चार झाडं त्याच्याच बाजूला आदबीनं उभी होती. रामफळही त्याचा मान राखून होते. एवढंच नव्हे तर त्याच्या पसारेदार सावलीला आमची अनेक गुरंढोरं बिनधास्त असत. सीताफळ, चंदन अन् चिंचाच्या झाडांचाही पसारा त्याच्या दिमतीला असायचा. सारं रान कसं वैभवात जगत होतं. साऱ्या गडय़ा-माणसांचा, गुराढोरांचा ‘राबता’ त्याच्या साक्षीनं अन् त्याच्या सावलीच्या मायेनं वावरत होता. दहा-बारा बैलांचा विस्तारलेला गोठा, रिकामी म्हसरं अन् गायरं त्याच्या मुळा-मुळकंडात बांधलेली असायची. सणावाराला या वृक्षराजाचं सारं वैभव डोळ्यात भरायचं. पोळ्याच्या सणाला हे सारं ‘इनामी’ रान दणकून जायचं. तेव्हा या महाराजाचे ऐश्वर्य द्विगुणित व्हायचं. पायथ्याला नरसोबा-हिसोबा पलिकडच्या मोठय़ा फांदीत सातीअसरा असल्याचं लोक बोलायचे. त्याच्या त्याच्या चमत्काराच्या कथा सांगायचे. त्या त्या चमत्कारी कथेत पिंपळराजाचं स्थान अबाधित असायचं. दिवसा गजबजलेल्या या साऱ्या वातावरणात रात्री काहीएक अनामिक गूढ भयता निर्माण व्हायची. रानपाखरांचा आधार असणारा हा पिंपळ अधिक गूढ तपस्वी वाटायचा. वटवाघुळानं आणि त्यांच्या रात्रीच्या चिरकत उडणाऱ्या अस्तित्वानं भयपान निर्माण व्हायचं. तर घुबडं, पिंगळ्यांच्या आवाजानं साऱ्या रानाला एक प्रकारचा ‘थरार’ निर्माण व्हायचा. अनेक भयकथा जाग्या व्हायच्या. या भयकथांचा नायक अर्थातच माझा हा ‘इनाम’दार मित्रच असायचा. भय-श्रद्धा- भक्ती- आणि सारा सारा आमचा आत्मीय भाव त्याच्या पानामुळात वसलेला असायचा. अभिमान वाटायचा.
अखेर निसर्गनियम त्याच्यासाठीही अपवाद राहिला नाही. अनपेक्षितपणे माझा ‘इनाम’दार मित्र-सखा कुळपुरुष निघून गेला! आता फक्त त्याची ‘जागा’ स्मरणाचा इतिहास दाखवित राहाते. आठवणीतूनच तो पुन्हा पुन्हा साठवून ठेवता येतो, एवढेच!