Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कारागृहातील ‘मुन्नाभाई’ गांधी शांती परीक्षेत उत्तीर्ण
उस्मानाबाद, ३ जून/वार्ताहर

 

महात्मा गांधींच्या विचारांची ‘लगे रहो मुन्नाभाई’ला गांधीगिरी शिकविली. अशीच गांधीगिरी मुंबईच्या सवरेदय मंडळाने उस्मानाबाद जिल्हा कारागृहात केली आणि काय आश्चर्य! कारागृहातील सारेच ‘मुन्नाभाई’ ‘गांधी शांती’ परीक्षेत उत्तीर्ण झाले. राजकुमार सूर्यवंशी या कैद्याने तर चक्क ८० पैकी ७५ गुण मिळवून पहिला क्रमांकही पटकाविला. गुन्हेगारांनी परीक्षेत केलेल्या या विक्रमाने भल्याभल्यांना चक्क तोंडात बोटे घातली.
माणूस मुळात गुन्हेगार नसतो. त्याची परिस्थितीच गुन्हेगारी प्रवृत्तीला कारणीभूत ठरते. महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान क्रूर प्रवृत्तीलाही परावृत्त करू शकते. त्याच अनुषंगाने मुंबईच्या सवरेदय मंडळाने उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील ५१ कैद्यांची ‘गांधी शांती’ परीक्षा घेतली. या परीक्षेत सारेच कैदी हिरो ठरले. आज जिल्हाधिकारी डी. आर. बनसोड, जिल्हा सत्र न्यायाधीश जी. एम. कुबडे यांच्या हस्ते विजेत्या कैद्यांचा गौरव करण्यात आला.
परिस्थितीमुळे माणसांचे आचार-विचार बदलतात. मात्र अशा परिस्थितीत महात्मा गांधींचे विचारच शांतीच्या मार्गाचा उपदेश करतात असे सांगून जिल्हाधिकारी बनसोड यांनी महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करावे, असा सल्ला कैद्यांना दिला, तर जिल्हा सत्र न्यायाधीश जी. एम. कुबडे म्हणाले की, गांधी शांती परीक्षा एक चांगला उपक्रम आहे. अशा उपक्रमाने चांगले नागरिक तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गांधी शांती परीक्षेत राजकुमार बाबुराव सूर्यवंशी, शरद मनोहर बिराजदार, हरिभाऊ गजानन कुलकर्णी या तीन गुन्हेगारांनी अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. सर्वात कमी गुण ५२ असल्याचे कारागृह अधीक्षक पी. डी. भालेराव यांनी सांगितले. या विजेत्यांचा गौरवही गांधी विचारधारेप्रमाणेच करण्यात आला. खादीचे कपडे देऊन त्या गुन्हेगारांना पुन्हा गांधी विचारांची प्रेरणा देण्यात आली. या वेळी सवरेदय मंडळाचे प्रचारक बजरंग सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशफाक अहमद, भास्कर गोळे आदींची उपस्थिती होती.