Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येशी संबंध नाही- पद्मसिंह पाटील
उस्मानाबाद, ३ जून/वार्ताहर

 

काँग्रेसचे दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव पुढे आले. जिल्ह्य़ात एकच खळबळ उडाली. तालुक्यातील खेड या गावात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा पुतळा जाळण्यात आला. तर शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना अटक करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदार रवींद्र गायकवाड यांनाही संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या हत्येशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण डॉ. पद्मसिंह पाटील यांनी एका निवेदनाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.
हत्येचे गूढ उकलल्याचा दावा करत ओमराजे निंबाळकर आणि पवनराजे विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक करण्याची मागणी सीबीआयच्या संचालकांना केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्य़ात या विषयावर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी तपासातील महत्त्वाची कागदपत्रे व हत्येच्या वेळी पवनराजे वापरत असलेली गाडी तपासासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागितली असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सतीश मंदाडे ही व्यक्ती तेरणा कारखान्याच्या आसवानी प्रकल्पाशी संबंधित असल्यामुळे त्याच्या एकूण अर्थव्यवहाराशी असलेले संबंध नव्याने चर्चेत आले आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मात्र आपल्यावर राजकीय वैमनस्यापोटी आरोप होत असल्याचे म्हटले आहे. चौकशीतून सत्य लवकरात लवकर पुढे यावे, अशी भूमिका असल्याचे स्पष्ट करत राजकीय द्वेषापोटी षडयंत्र रचून सातत्याने आरोप केले जात असल्याचे श्री. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान (कै.) पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमागे डॉ. पद्मसिंह पाटीलच असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. सतीश मंदाडे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या जवळचा माणूस होता. त्याची आर्थिक भागिदारी होती. डॉ. पद्मसिंह पाटील यांचे बंधू अजित बाबा पाटील यांच्या पंचम अ‍ॅक्वाकल्चर या प्रकल्पात तो भागिदार असल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.
केवळ एवढेच नाही तर जिल्ह्य़ाच्या प्रशासनावर देखील त्यांचाच सतत दबाव असतो. वडिलांची हत्या झाल्यानंतर संरक्षण मिळावे अशी प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही ती फेटाळल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जीवितास धोका असल्याबाबतचा अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केला होता. दोन अत्याधुनिक शस्त्रधारी पोलीस संरक्षक द्यावेत, अशी त्यांची मागणी फेटाळून लावली गेली असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.