Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कोंडावार हत्या प्रकरणी सचिन तायडेला सात दिवसांची पोलास कोठडी
औरंगाबाद, ३ जून /खास प्रतिनिधी

 

औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वित्त अधिकारी कोंडावार यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन तायडे याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एम. शेंडे यांनी दिले आहेत.
शनिवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन अशोक गिरी यांच्या दालनात वित्त अधिकारी कोंडावार यांना सचिन तायडेने गोळी झाडली. त्याच्या विरोधात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात खून, धमकी देणे तसेच भारतीय हत्यार कायदा ३ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गोळ्या झाडल्यानंतर सचिन तायडे याने पलायन केले होते. क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव मोरे यांनी मंगळवारी सचिनला पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात अटक केली. बुधवारी दुपारी श्री. शेंडे यांच्या न्यायालयात सचिन तायडेला हजर करण्यात आले.
सचिन तायडेकडून काडतुस जप्त करायचे आहे तसेच त्याने या प्रकरणात वापरलेले हत्यारही शोधायचे आहे. घटना घडण्याच्याआधी दोन मिनिटे तो अशोक गिरी यांच्या दालनातून बाहेर पडला. त्यावेळी बाहेर दोन साथीदार होते. या साथीदारांचा शोधही घ्यायचा आहे. घटनेच्या वेळी वापरलेले कपडेही जप्त करायचे आहेत. घटना घडल्यानंतर सचिन तायडेने पलायन केले होते. तो कुणाकुणाकडे आश्रयासाठी होता याचाही तपास करायचा आहे, असे सरकारी वकील श्री. काझी यांनी न्यायालयात सांगितले. तसेच ही हत्या करण्यामागचा हेतू काय आहे हेही स्पष्ट व्हायचे आहे. त्यामुळे सचिन तायडेला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. सचिन तायडेचे वकील एस. आर. इंगळे यांनी सचिन हा गुन्हेगार नसल्याचे सांगितले. तो निष्पाप आहे. तणावामध्ये असताना त्याच्या हातून ही चूक घडली आहे. पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवादही त्यांनी केला.