Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नांदेड जिल्ह्य़ात विविध घटनांत महिलेसह चौघांचा मृत्यू
नांदेड, ३ जून /वार्ताहर

 

गेल्या चोवीस तासांत घडलेल्या वेगवेगळ्या चार घटनांत चौघांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे.
पोलिसांनी सांगितले की, हदगाव येथील मुक्ताबाई गजानन आवटे या १९ वर्षीय युवतीचा स्टोव्हचा भडका उडून जळाल्याने मृत्यू झाला. अन्य एका घटनेत मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील मष्णाजी मारोती वाडीकर (वय ५५) हा चहा करत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने ७८ टक्के जळाला होता. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उचपार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मुक्रमाबाद पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कंधार तालुक्यातल्या राऊतखेडा येथील यशवंत डिकळे या २५ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. यशवंत डिकळे याला काही दिवसांपासून दारूचे व्यसन लागले होते. काल रात्री यथेच्च दारू प्राशन केल्यानंतर त्याने नशेतच विषारी औषध प्राशन केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत कंधार तालुक्यातल्या बिजेवाडी येथे एक अज्ञात पुरुषाचे शव आढळले. बिजेवाडी येथील जवाबदार यांच्या शेतात २५ ते ३० वर्ष वय असलेले पुरुष जातीचे शव आढळल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही.