Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

एनसीसी विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!
औरंगाबाद, ३ जून/प्रतिनिधी

 

एनसीसी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ते २० जूनदरम्यान राज्यभरातील एनसीसीच्या १२०० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिली. राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या प्रमुख उपस्थितीत या आपत्ती व्यवस्थापन वर्गाला सुरुवात होईल. राज्यातील १९ विद्यापीठांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला या वर्गासाठीचा मान मिळाला आहे. याला ‘आव्हान-२००९’ असे नाव देण्यात आले आहे.
‘आव्हान २००९’मध्ये २० मुले, १० मुली अशा प्रकारे ३० एनसीसी विद्यार्थ्यांचा प्लॅटून जिल्हा-जिल्ह्य़ात सिद्द करून ३५ जिल्ह्य़ांमधून १०५० जणांना या ठिकाणी वर्गाला पाठविण्यात येणार आहे. आव्हानवर व्यक्तिगत नजर ठेवण्यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पंडित पलांडे या ठिकाणी आलेले आहेत. एनसीसी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण वर्गाच्या नियोजन- आयोजनाची पाहणी करण्यासाठी राज्याचे संयुक्त सचिव विकासचंद्र रस्तोगी शहरात आले होते.
पत्रकार परिषदेत कुलगुरूंसह ब्रिगेडियर महेशचंद्र माथूर, कर्नल सुधीर भोसले यांनी प्रशिक्षण वर्गाविषयी सविस्तर माहिती दिली. कर्नल सुधीर भोसले म्हणाले, विद्यापीठ परिसर तसेच हर्सूल तलावात हे प्रशिक्षण चालणार असून यातून तयार झालेल्या विद्यार्थ्यांचा उपयोग राज्यात व देशाच्या इतर भागांत संकटकालीन परिस्थितीत केला जाईल.
८०० विद्यार्थी आणि ४०० विद्यार्थिनी या वर्गात सहभागी होतील, असे ब्रिगेडियर महेशचंद्र माथूर यांनी सांगितले.
माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आव्हानचे हे तिसरे वर्ष आहे. आपात्कालिन परिस्थितीला सामोरे जात त्यातून जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठीची धडपड जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर येत असली तरी एनसीसीतून तयार झालेल्या या विद्यार्थ्यांची मदत घेता येईल, असा विश्वास संयुक्त सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी स्पष्ट केले.
खासगी क्षेत्रातून एनसीसी प्रशिक्षितांना तुफान मागणी
जुन्या जमान्यात एनसीसीमध्ये दाखल होताना भविष्यात सैन्यात भरती व्हायचे हा विचार मोठय़ा प्रमाणावर केला जात होता. मात्र आताच्या काळात या प्रशिक्षितांना खासगी क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर हॉटेल ग्रुप ताजने देशभरातून एनसीसी प्रशिक्षितांचा डाटा गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती ब्रिगेडियर माथूर यांनी दिली.