Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आठ नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना
तुळजापूर, ३ जून/वार्ताहर

 

येत्या १७ जूनला होणाऱ्या नगराध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया जवळ आल्याची नोंद घेऊन आठ नगरसेवक मंगळवारी (२ जून) अज्ञात स्थळी रवाना झाल्याचे वृत्त असून, स्थानिक राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत एका पुरस्कृत अपक्षासह काँग्रेस-शे.का.प युतीला १९ पैकी १० जागा मिळालेल्या होत्या. तथापि तत्कालिक परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेतृत्व करणाऱ्या देवानंद रोचकरी यांनी शे.का.पच्या एका नगरसेवकास आपल्याकडे खेचून आणून नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणून दाखविण्याचा करिष्मा घडविला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये व नगरसेवकांत फूट पडली. बहुतांशी नगरसेवकांनी रोचकरी यांचे नेतृत्व झुगारून देऊन शे.का.प.- काँग्रेस युतीच्या नगरसेवकांशी जवळीक साधली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील नेतेमंडळी व रोचकरी यांच्या दरम्यानचे संबंध बिघडले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोचकरी यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यावर पाठोपाठ शासकीय स्तरावर वजन वापरून रोचकरी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश काढला. परिणामी त्यानंतर या रिक्त झालेल्या जागेसाठी ३० नोव्हेंबरला पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत शे.का.प.चे दिलीप आप्पा गंगणे हे विजयी झाले.
गेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर बहुमतात असलेल्या शे.का.प.-काँग्रेस युतीला फुटीरतेचा फटका बसला होता. परिणामी साधनाताई साखरे यांना नगराध्यक्ष पदापासून वंचित होण्याची वेळ आली होती. मात्र नगरपालिका वर्तुळात राजकीय स्थित्यंतर घडत गेल्यावरून संगीता यांना अनपेक्षितरीत्या मिळालेले नगराध्यक्षपद १४ महिन्यांनंतर सोडावे लागले, तर साधनाताई साखरे यांना केवळ ९ महिने हे पद भूषविण्याची संधी मिळाली.
आता दिलीप गंगणे व शे.का.प.च्या नेतेमंडळींनी या पदावर आरुढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असता नगरपालिकेतील शे.का.प.चे २, काँग्रेस १ तसेच राष्ट्रवादी पुरस्कृत एक अपक्ष, राष्ट्रवादीच्या ५ नगरसेविका भारती नारायण गवळी यांना पाठिंबा असल्याचे सुचवित मंगळवारी अचानक अज्ञात स्थळी गेले आहेत.