Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सहाव्या वेतन आयोगाबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांत असंतोष
लातूर, ३ जून/वार्ताहर

 

राज्य शासनाच्या २००९ च्या सुधारित वेतनश्रेणीत वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी सवंर्ग व वरिष्ठ पदावरील डॉक्टर्सना केंद्र शासनानुसार वेतन न दिल्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांत तीव्र अंसतोष पसरला आहे. आरोग्य सेवा संघ अधिकारी महासंघाच्या वतीने या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ४ जूनला राज्यातील प्रत्येक रुग्णालयासमोर द्वारसभा घेऊन सर्व डॉक्टर्स काळ्या फिती लावून काम करणार आहेत. केंद्र शासनाने देऊ केलेल्या वेतनश्रेणीप्रमाणे राज्य शासनाने वेतनश्रेणी न दिल्यास ४ जूननंतर ११ जून रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम आरोग्यसेवेवर होणार आहे. गरीब व दारिद्र्य रेषेखालील जनतेच्या हितार्थ डॉक्टर्सना आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही; त्यामुळे राज्यातील सर्व डॉक्टर्स अधिकारी यांनी आंदोलन पुकारले आहे.
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना लातूर विभागीय कार्यकारिणीच्या वतीने निवेदन देताना डॉ. येलूरकर, डॉ. शेटकार, डॉ. निसाले, डॉ. स्वामी, डॉ. वाघमारे, डॉ. भिसे, डॉ. पाटील, डॉ. वारद, डॉ. शेख, डॉ. पातळे, डॉ. तांदळे, डॉ. पाठक, डॉ. सोनवणे, डॉ. शिंदे, डॉ. हरिदास, डॉ. कदम, डॉ. कापसे आदी उपस्थित होते.