Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ग्रंथालय चळवळीची नाळ तोडू नका - सुभाष मुंढे
लातूर, ३ जून/वार्ताहर

 

ग्रंथपालन वर्गाच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात गेले तरी ग्रंथालय चळवळीची नाळ तोडू नका. ग्रंथालयीन ज्ञानाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात होतच असतो, असे प्रतिपादन संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुभाष मुंढे यांनी केले.
लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ संचालित ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि जिल्हा संघाचा कै. मारुती चिरके आदर्श ग्रंथपाल पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी परीक्षा नियंत्रक अनिल सूर्यवंशी, संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, शरद कारखानीस, कार्यवाह पांडुरंग अडसुळे, मोहन माशाळकर, टेकचंद पोकर्णा, धैर्यधर पांडे यांची उपस्थिती होती.
वेद प्रतिष्ठान ग्रंथालयाचे ग्रंथपाल धैर्यधर पांडे यांना कै. मारुती चिरके आदर्श ग्रंथपाल पुरस्कार, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र संघाच्या वतीने पत्रकार शरद कारखानीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शरद कारखानीस म्हणाले, जो ग्रंथावर प्रेम करतो तो चांगला माणूस असतो. ग्रंथालय हे वेगळे आणि व्यापक क्षेत्र आहे. ते ज्ञानाचे मोठे साधन आहे. मराठीतील नवनवीन साहित्याचे ग्रंथपालांनी वाचन करावे. ग्रंथपाल हा समाजाचा वाटाडय़ा असतो.