Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बोरीमध्ये वादळी पावसामुळे नुकसान ; वीज पडून सर्कसमधील उंट ठार
बोरी, ३ जून/वार्ताहर

 

मंगळवारी अचानक आलेल्या सोसाटय़ाचा वारा आणि जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरावरील पत्रे उडून गेले तर वीज पडून ग्रँड सर्कसमधील एक उंट ठार झाला तर दुसरा जखमी झाला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
सुमारे एक तास झालेल्या वादळी पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. जिनिंग प्रेसिंगच्या मैदानावर न्यू ग्रँड सर्कस उभारणीचे काम सुरू होते. सर्कसमधील दोन उंट लिंबाच्या झाडाखाली बांधले होते. वीज पडून त्यातील एक उंट ठार झाला. सर्कसचे मालक शे. फजलोद्दीन शे. कायम (रा. हैदराबाद) यांनी सांगितले की, मालेगाव यात्रेमध्ये चारच महिन्यांपूर्वी हा उंट ४० हजार रुपयांना विकत घेतला होता. दुसरा उंट ही जखमी झाला असून त्यास पशुचिकित्सालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. राहण्यासाठी व सर्कससाठी उभारलेले तंबूही फाटून गेले आहेत. जवळपास ६० ते ७० हजारांचे यात नुकसान झाले.
जमादार ओंकार गिरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. सर्कसचा विमा नसल्यामुळे पोलिसांनी पंचनामा केला नाही. हे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाल्याने सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा सर्कसमालकांनी केली आहे.
सोनाजी हरिभाऊ राऊत यांच्या बैलाचा पाय उडालेल्या पत्र्याने कापला गेला असून बसथांब्याजवळील शेख चाँद शेख महेबूब यांच्या दुकानाच्या पाठीमागची भिंत पडली. त्या बाजूला असलेल्या विठ्ठलराव जाधव यांचे झाड वाऱ्याने उन्मळून पडले. ते झाड दुसऱ्या झाडाला अडकल्यामुळे मोठी हानी झाली नाही. रंगनाथवाडी येथील अशोक वाघ यांची माडी उडून गेली असून अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत. गावातही असाच प्रकार घडला आहे.
काळ आला पण..
ज्या लिंबाच्या झाडाखाली वीज पडून उंट ठार झाला. त्या उंटाच्या दहा फूट अंतरावर नागठाणा येथील रावसाहेब ठमके दारूच्या नशेत पडले होते. त्यांना हा प्रकार कळलाही नाही. उंट पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी ठमके यांना उठवून बाजूला नेऊन बसवले. ‘काळ आला पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय येथे आला.