Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘सीम कार्ड’ची अफरातफर करणाऱ्या तिघांना अटक
औरंगाबाद, ३ जून /प्रतिनिधी

 

कागदपत्रांच्या आधारे व्होडाफोन कंपनीचे दुसरे प्रिमियम सीम कार्ड काढून एक लाख रुपयांत तिसऱ्यालाच विकण्याच्या प्रयत्न फसला आणि त्यांच्या हातात पोलिसांच्या बेडय़ा पडल्या. या प्रकरणी सिडको पोलिसांनी अभय बन, प्रदीप गजानन राठोड आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे. आरोपी हे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या दुकानाशी संबंधित असून एकजण अशा दुकानाचा मालक आहे.
९८२३७७७७७७ अशा क्रमांकाचे हे कार्ड होते. सध्या ते काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद राठोड यांच्या नावावर आहे. अशा प्रिमियम क्रमांकाचे कार्ड मिळविण्यासाठी आजघडीला थेट दोन लाख रुपये मोजावे लागतात. असे कार्ड मिळविण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असली तरी अशा क्रमाकांना आजही मोठी मागणी आहे. जुने सीम कार्ड कोणी विकण्याच्या विचारात आहे काय, अशी विचारणा नेहमी होत असते. राजकीय नेते, कार्यकर्ते, अधिकारी यांच्याकडे असे मोबाईल क्रमांक असल्याचे आढळून येते. मागणी जास्त आणि उपलब्धता कमी असल्यामुळे यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.
सिडको कॅनॉट गार्डन परिसरात असेलल्या डी. एस. के. कम्युनिकेशन या दुकानात प्रमोद राठोड यांना काही दिवसांपूर्वी सीमकार्ड बदलून घेण्यासाठी पत्ता, ओळख दर्शविण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागली होती. त्याचा फायदा या आरोपींनी उठविला. सीम कार्ड हरविल्यास दुसरे कार्ड लगेच दिले जाते आणि ते कागदपत्रे सादर केल्यास लगेच ते सुरू होते. आरोपींनी प्रमोद राठोड यांच्या वरील प्रिमियम क्रमांकाचे दुसरे कार्ड काढले. यासाठी पहिले कार्ड हरविले असल्याची तक्रार आणि नवे कार्ड देण्यात यावे म्हणून राठोड यांचीच कागदपत्रे त्यांच्या परस्पर सादर केली.
नवीन कार्ड मिळताच ते ग्राहकाच्या शोधात बाहेर पडले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निराला बाजार येथे ते आले होते. येथील एका मोबाईलच्या दुकानात त्यांना एक शौकीन ग्राहक सापडला. या क्रमांकासाठी बाजारात दोन लाख रुपये मोजावे लागत असताना हे आरोपी फक्त एक लाखांत राजी झाले. मात्र त्या दुकानातील एकाने हा क्रमांक प्रमोद राठोड यांचा असल्याचे ओळखले. त्याने तेथूनच राठोड यांना फोन करून बोलावून घेतले. माझ्या क्रमाकांचे दुसरे कार्ड कसे काय तयार झाले आणि त्याची विक्री कशी काय होऊ शकते, असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तेथून दोघांना ताब्यात घेतले. राठोड यांच्याच कागदपत्रावरून त्यांनी हे कार्ड मिळविल्याचे समोर आले. या दोघांना अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक बोडखे पुढील तपास करत आहेत.