Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मारहाण प्रकरणात आरोपीला अंतरिम अटकपूर्व जामीन
औरंगाबाद, ३ जून /खास प्रतिनिधी

 

सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपी अनिल मिरकर यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी अटकपूर्व जामीन अर्ज तात्पुरता मंजूर केला आहे.
सय्यद सलमान यांच्या फिर्यादीवरून अनिल मिरकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध दंगल, मारहाणीच्या आरोपाखाली सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल मिरकर यांनीही फिर्यादीच्या विरोधात तक्रार दाखल केली.
जटवाडा रस्त्याने जात असताना एक इसम अनिल मिरकर यांच्या गाडीसमोर आला आणि जखमी झाला. त्यांनी या जखमी इसमाला महात्मा गांधी मिशनच्या इस्पितळात आणले.
त्या ठिकाणी या जखमी व्यक्तीचे १७ ते १८ समर्थक आले. त्यांनी मारहाण केल्याची तक्रार अनिल मिरकर यांनी दिली आहे. सोन्याची अंगठी व सोन्याची चेनही काढून घेतली असे या तक्रारीत म्हटले आहे. सय्यद सलमानचे काका हे जखमी झाले. त्यांच्या उपचारासाठी व औषधासाठी पैसे द्या या मुद्यावरून सय्यद सलमान आणि मिरकर यांच्यात मारामारी झाली.
अनिल मिरकरने औरंगाबाद सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज नामंजूर करण्यात आला. अनिल मिरकरने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली. ३१ मे रोजी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे या कारणावरून अनिल मिरकरला सशर्त अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला. ५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यासह अनिल मिरकर यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला. ही मनाई ८ जूनपर्यंतच आहे.
या प्रकरणात अनिल मिरकरच्या वतीने अॅड. साधना जाधव, अॅड. रवींद्र गोरे हे तर राज्य शासनातर्फे अॅड. विठ्ठल दिघे हे काम पाहत आहेत.