Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची गरज - मोनिका ठक्कर
औरंगाबाद, ३ जून /खास प्रतिनिधी

 

चित्रपटसृष्टीतील कोणत्याही माध्यमात करिअर करावयाचे असेल तर चित्रपट सृष्टीतील प्रवेशापूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे. स्वत:च्या क्षमता, मर्यादा आणि कौशल्याची जाणीव ठेवून चित्रपट सृष्टीत प्रवेश करावा. कारण प्रारंभीच्या काळात खूप संघर्ष करावा लागतो. त्यासाठी कलावंतांनी तयार रहावे, असे डबिंग डायरेक्टर व अभिनेत्री मोनिका ठक्कर हिने सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित टी. व्ही. प्रॉडक्शन अॅण्ड बेसिक इन फिल्ममेकिंग या अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेत मोनिका ठक्कर बोलत होत्या. या कार्यशाळेत त्यांनी भूमिका केलेली ‘झुंज एकाकी’ हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांकडून ऑडिशनची प्रात्यक्षिके करून घेतली.
डबिंग हे क्षेत्र रोजगाराच्या दृष्टीने चांगले क्षेत्र आहे. अभिनय, दिग्दर्शक व अन्य तांत्रिक माध्यमाएवढेच ते महत्त्वाचे आहे. आवाजाच्या भरवशावरच आपले करिअर करू शकता असेही मोनिका ठक्कर म्हणाल्या. प्रारंभी विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी स्वागत केले. या वेळी प्रा. डॉ. सतीश पावडे, प्रा. जयंत शेवतेकर आदी उपस्थित होते.