Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विवाहितेच्या खून प्रकरणी सासू-सासऱ्यांना अटक
औरंगाबाद, ३ जून /प्रतिनिधी

 

डोक्यावर वार तसेच तोंड दाबून विवाहितेचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी वाळूज येथील दोघाजणांना अटक केली. विठ्ठल बापुराव राऊत आणि भागूबाई विठ्ठल राऊत अशी आरोपींची नावे असून ते मृत विवाहितेचे सासू-सासरे आहेत. यातील मुख्य आरोपी सुनील विठ्ठल राऊत हा फरार आहे. स्वाती सुनील राऊत असे खून करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे.
गेल्या शनिवारी (३० मे) ही घटना घडली होती. स्वाती हिची प्रकृती गंभीर असल्याचे सुनील याने तिचे वडील मछिंद्र विश्वनाथ सोनुले (वय ४८, रा. वडाळा महादेव. जिल्हा नगर) यांना कळविले. सोनुले यांनी तातडीने वाळूज येथे धाव घेऊन पाहणी केली असता स्वाती मृतावस्थेत होती. तिच्या डोक्यावर वार करण्यात आले होते. तसेच वार करतेवेळी तिचे तोंड दाबण्यात आल्याच्या खुणाही तेथे दिसत होत्या.
सोनुले यांनी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खून आणि हुंडाबळीच्या गुन्ह्य़ाची नोंद केली. त्यानंतर दोघांना अटक केली. मुख्य आरोपी सुनील हा पसार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.