Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अनिल अंबानींना जिल्हा ग्राहक मंचासमोर हजर राहण्याचा आदेश
वर्धा, ३ जून / प्रतिनिधी

 

जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ‘रिलायन्स कम्युनिकेशन’चे अध्यक्ष अनिल धीरूभाई अंबानी यांना मंचासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. येथील मनोज सोनछात्रा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रकरणी ग्राहक मंचाने हा आदेश जारी केला. ‘रिलायन्स’च्या भ्रमणध्वनी सेवेबाबतच्या त्रुटीवर मंचाकडे प्रकरण उपस्थित झाले होते. ‘रिलायन्स’च्या महाराष्ट्र सर्कलमधील ‘पोस्टपेड’ व ‘हैलो’ योजनेतील जे ग्राहक वेळेवर बिलांचा भरणा करतील, अशांपैकी तीन हजार ग्राहकांसाठी ‘ड्रॉ’ काढला जाईल. त्यातील विजेत्यांना मारुती कार, मोटार सायकल, मोबाईल संच, सोन्याचे नाणे व अन्य पुरस्कार दिले जाणार होते. या ‘ड्रॉ’ची कंपनीने ‘एसएमएस’ तसेच, बिलासोबत पत्रक पाठवून भरभरून प्रसिध्दी केली. मात्र, ही योजना केवळ मुंबई विभागासाठी असून उर्वरित महाराष्ट्रातील ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे कं पनीने नंतर स्पष्ट के ले. ही फ सवणूक असल्याचे सांगून मनोज सोनछात्रा यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. मंचाने ३० जून २००८ ला दिलेल्या निकालात एक महिन्यात या ‘ड्रॉ’चा निकाल देण्याचे निर्देश कंपनीस दिले. याबाबत स्मरण देणारी पत्रे वारंवार पाठवूनही कंपनीने त्याची साधी दखलही घेतली नाही. त्यावर १५ मार्च २००९ ला मंचाने अवमान झाल्याची तक्रार दाखल केली. त्याअंतर्गत ‘कंपनीचे अध्यक्ष व सरव्यवस्थापकांवर अटक वारंट का दाखल केला जाऊ नये’ अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली. सात दिवसांनी प्राप्त या नोटीशीची दखलही कंपनीने घेतली नाही. यापुढील कारवाई म्हणून मंचाने १२ मे २००९ च्या आदेशानुसार कंपनीचे अध्यक्ष व सरव्यवस्थापकांविरोधात मंचापुढे हजर राहण्याचा जामिनपात्र वारंट जारी केला. या दोघांनाही ९ जून २००९ ला वर्धा जिल्हा ग्राहक मंचापुढे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.