Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘अ‍ॅन इन्कन्व्हीनियन्ट ट्रथ’ आता मराठीत
औरंगाबाद, ३ जून /खास प्रतिनिधी

 

प्रख्यात पर्यावरणवादी लेखक आणि अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अलगोवर यांनी लिहिलेले अ‍ॅन इन्कन्व्हीनियन्ट ट्रथ हे ग्लोबल वॉर्मिगचा इतिहास व भीषणता मांडणारे पुस्तक मराठीत अनुवादीत करून लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
येथील साकेत प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे. अलगोवर यांना २००७ चा नोबेल पुरस्कार मिळवून देणारे हे पुस्तक आहे. येथील पर्यावरण अभ्यासक आणि निसर्ग मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा. विजय दिवाण यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. विश्वसाहित्यातील अजरामर कलाकृती मराठीत या योजनेअंतर्गत हे पर्यावरणवादी पुस्तक साकेत प्रकाशन चार रंगात प्रकाशित करत आहे.
कार्बन उत्सर्जनामुळे २० व्या शतकातच पृथ्वीचे तापमान एका अंशाने वाढले असून अनियमित पाऊस, महापूर, दुष्काळ, ध्रुवांवरील बर्फ वितळणे आणि महासागरांच्या पातळीत वाढ होणे असे परिणाम जगातील अनेक राष्ट्रे अनुभवत आहेत. ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम म्हणजे वसुंधरेचा ऱ्हास, हे लक्षात घेऊन अलगोवर यांनी २५ वर्ष कठोर परिश्रम करून घातक हवामान बदलाच्या नोंदी जगभर फिरून एकत्र केल्या आहेत. त्यातूनच त्यांनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला २००७ सालचे नोबल पारितोषिक देण्यात आले. मूळ पुस्तकातील सर्व छायाचित्रे, रेखाचित्रे आणि आलेख यासह चार रंगात हे पुस्तक मराठीत आणले जात आहे, अशी माहिती साकेत प्रकाशनचे संचालक साकेत बाबा भांड यांनी दिली.