Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चौकशी समितीच्या अहवालावर कारवाई करण्यास टाळाटाळ
अविवाहित तरुणाची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया
उस्मानाबाद, ३ जून /वार्ताहर

 

अविवाहित तरुणाची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान या चौकशी समितीतून आपल्याला वगळावे असा विनंती अर्ज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणातील परिचारिका दणाने यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पैसे मागितल्याचा आरोप लेखी स्वरूपात नोंदविला आहे. आता या प्रकरणाला जातीय रंग दिला असल्याने जिल्हा प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.
अमोल पंडागळे या उस्मानाबाद शहरातील अविवाहित तरुणाची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्याचे उघडकीस आल्यानंतर चौकशी समितीतून जिल्हा आरोग्य अधिकारी एस. एम. साळुंके यांना वगळण्यात आले आहे. दुसरीकडे या समितीतील डॉ. आऊलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यामुळे आता या समितीत फक्त दोनच सदस्य उरले आहेत. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार अमोल पंडागळे याचे नाव अमोल भालेराव असे नोंदवून तुळजापूर येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली होती काय, हे अद्यापही प्रशासनाला समजू शकले नाही. या प्रकरणातील ठपका ठेवण्यात आलेल्या महिला परिचारिका श्रीमती दणाने यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरूध्द तक्रार केली आहे. त्यांच्यावर थेट पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशी समितीतून न वगळल्यास दणाने यांनी आत्मदहनाचाही इशारा दिला होता. याच वेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनाही या समितीतून स्वत:ला वगळावे अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर बुधवारी निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, श्रीमती दणाने यांना अमोल भालेराव नावाच्या व्यक्तीला चौकशी समितीसमोर हजर करण्यासाठी ३ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आज ही मुदत ६ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
चौकशी समितीने दिलेल्या पूर्वीच्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकलेली नाही. आता उर्वरित दोन अधिकारी चौकशी करून दोषारोप निश्चित करतील तेव्हा कारवाई केली जाईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत सासणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.