Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शांतता, पोलीस तपास सुरू आहे!
डॉ. अजय जाधव अ‍ॅसिड हल्ला प्रकरण
प्रदीप नणंदकर
लातूर, ३ जून

 

क्ष-किरणतज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट) डॉ. अजय अनिरुद्ध जाधव यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोर गेल्या १९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अंगावर अ‍ॅसिड फेकण्यात आले. यामुळे वैद्यकीय जगतात एकच खळबळ उडाली. डॉ. जाधव यांच्यावर प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले. त्यांच्या जीवाचा धोका टळला असला तरी अद्याप किमान १५ दिवस त्यांना रुग्णालयातच उपचारासाठी रहावे लागणार आहे.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधीक्षक संजय लाठकर, अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
डॉ. अजय जाधव हे लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांचे पुत्र. अत्यंत शांत, मनमिळावू म्हणून ते परिचित. त्यांच्यासारख्या व्यक्तीवर अ‍ॅसिडचा हल्ला झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. आरोपीला तात्काळ शोधून शिक्षा मिळावी असे निवेदन डॉक्टरांच्या पथकाने दिले आहे. हा प्रकार कोणकोणत्या कारणामुळे होऊ शकतो? टोकाची भूमिका घेण्याचे कारण, कोणाबद्दल घडले व का? इथपासून अतिशय छोटय़ा छोटय़ा मुद्यावर पोलीस विचार करत आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पाच टीम करून पोलीस कामाला लागले आहेत. मात्र अद्याप त्यांच्या हाती काही महत्त्वपूर्ण धागेदोरे आले नाहीत.
लातूर शहर वेगाने वाढत असताना, गुन्हेगारीच्या प्रमाणाचा वेगही वाढतो आहे. पोलिसांच्या तपासाचा वेग मात्र त्या मानाने वाढत नसल्यामुळे सामान्य माणसात असुरक्षिततेची भावना वाढीस लागत आहे. गेल्या काही वर्षांतील गुन्ह्य़ाच्या तपास करण्यात पोलिसांना अपयश आलेले असल्यामुळे या प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलिसांना यश येईल का, अशी शंका व्यक्त होत आहे.
मालू बंधू हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही याचे शल्य लोकांच्या मनात आहे. निलंगा बँकेवरील दरोडा, जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न यात पोलिसांनी कार्यक्षमता सिद्ध केल्यानंतर लोकांनी पोलिसांना डोक्यावर घेतले. डॉ. जाधव प्रकरणात पोलिसांनी आपले सर्व कसब पणाला लावून तपास करावा, हीच जनतेची अपेक्षा आहे. सध्या तरी ‘शांत राहा, पोलीस तपास करत आहेत,’ असे सांगितले जाते. मात्र हे म्हणणे ‘काम चालू आहे, तात्पुरता बाजूचा रस्ता वापरा’ या कायमस्वरूपी फलकाप्रमाणे होऊ नये, हीच अपेक्षा.