Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘खते व बियाणांची कृत्रिम टंचाई थांबवा’
मनसेची शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन
परभणी, ३ जून/वार्ताहर

 

खते व बियाणांची कृत्रिम टंचाई दूर करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याची मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सध्या व्यापारी रासी-१ व रासी-२ या वाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढय़ा भावाने विक्री करीत आहेत. कृषी विभाग याकडे मात्र डोळेझाक करत आहे. खताचा मुबलक साठा असताना व्यापारी खत चढय़ा दराने विक्री करीत आहेत. शेतकऱ्याला मोफत सातबारा देण्याचे आदेश असतानाही प्रत्यक्षात मात्र सातबारा देण्यासाठी तलाठय़ाकडून २०० रुपयांची मागणी होत आहे. ही आर्थिक लूट थांबवून तलाठय़ांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच नवीन कर्ज देण्यासाठी जाचक अटी टाकून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती कारवाई केली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाभर तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशाराही या निवेदनात दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी मनसेची हेल्पलाईन सेवा सुरू
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुका पातळीवर शेतकऱ्यांसाठी मनसेकडून हेल्पलाईन सुरू करण्यात येत असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये साठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यास परभणी- गुरूदत्त पहेलानी (९८९०९१९४९२), डॉ. उसामा पठाण-९८२२८८३०३६), जिंतूर- राजू वट्टमवार (९४२३१३६३४५), प्रशांत कवाडे (९७६५७३३५५६), सेलू- पंजाब काळे (९४२२१७८८९०), मानवत- भास्कर तारे (९४०३५६१२२६), अंगद उक्कलगर (९९२२६९५७२९), सोनपेठ- सोमेश्वर भंडारे (९०२१३६९९१३), नंदकुमार रोडे (९३७१५२२८८९). शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खते या संदर्भात अडचण असल्यास कृत्रिम टंचाई जाणवल्यास वरील क्रमांकाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी केले आहे.