Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

माजी कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांना रामानंद विद्यापीठाची मानद पदवी
नांदेड, ३ जून/वार्ताहर

 

औरंगाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. गो. रा. म्हैसेकर यांना येत्या ७ जून रोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातर्फे मानद पदवी प्रदान केली जाणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याची विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने २००७-२००८ या शैक्षणिक वर्षांत डॉ. गो. रा. म्हैसेकर यांना मानद पदवी जाहीर केली होती. १७ मार्च रोजी झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी बहाल करण्यात येणार होती. राज्यपाल एस. एम. जमीर व नियोजन समितीचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. परंतु राज्यपालाचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने डॉ. गो. रा. म्हैसेकर यांना दीक्षांत समारंभातून वगळण्यात आले होते.
पदवीदान समारंभ येत्या ७ जून रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. या मानद पदवीसाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु नव्यानेच रुजू झालेल्या डॉ. सर्जेराव निमसे यांनी दोघांचे नाव वगळून डॉ. म्हैसेकर यांना ही मानद पदवी जाहीर केली.