Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हिंगोलीतील उद्योजकांचा सेवाकर न भरण्याचा निर्णय
हिंगोली, ३ जून /वार्ताहर

 

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत सेवा कर न भरण्याचा निर्णय हिंगोली इंडस्ट्रीज असोसिएशनच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्योजकांनी घेतला आहे.
येथील इंडस्ट्रीज असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवपार्वती पोल्ट्रीफार्म येथे ओमप्रकाश देवडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सुरुवातीला संघटनेचे सचिव नंदकिशोर तोष्णीवाल यांनी गेल्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले, तर प्रवीण सोनी यांनी आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा मांडला.
या चर्चेत अनेकांनी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांना कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे जोपर्यंत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत सेवाकर न भरण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या प्रस्तावित वीजदरवाढीला विरोध करण्यात आला. हिंगोली जिल्हा ना उद्योग जिल्हा घोषित केला आहे. त्यामुळे पॅकेज स्किम २००९ ला २०११ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा उद्योग केंद्राकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. उद्योजकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
सभेला ललितराज खुराणा, सावरमल अग्रवाल, प्रवीण सोनी यासह वसमत, औंढानागनाथ, कळमनुरी, सेनगाव येथील उद्योजक उपस्थित होते.