Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मुंडे यांच्या सर्वपक्षीय सत्काराचा ठराव एकमताने मंजूर
बीड, ३ जून /वार्ताहर

 

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत नूतन खासदार गोपीनाथ मुंडे यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला तर सव्वाअठरा कोटी रुपयांचे पुढील वर्षांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
बीड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (१ जून) अध्यक्षा मीरा गांधले, उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झाली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मार्च महिन्यातील वार्षिक अंदाजपत्रक उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती धनंजय मुंडे यांनी सभागृहासमोर मंजुरीला ठेवले. आगामी वर्षांसाठी विविध उत्पन्नाच्या स्रोतामधून जमा होणाऱ्या निधीच्या खर्चाचे अंदाजपत्रकात इमारत व रस्त्यांसाठी सर्वाधिक साडेपाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेला १८ कोटी ३१ लाख ४५ हजार ६६ रुपये एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार विविध विभागांसाठी खर्चाच्या तरतुदीचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे आणि केंद्रात सत्तेवर आलेल्या संयुक्त लोकशाही आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा ठरावही घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मीरा गांधले यांनी दिली.