Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

उस्मानाबाद जिल्हा बँक निवडणूक : अखेरच्या दिवशी तब्बल ४२७ जणांचे अर्ज
उस्मानाबाद, ३ जून /वार्ताहर

 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४२७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे पूर्वीच्या संचालकाच्या वारसदारांनी या निवडणुकीसाठी अर्ज केले असल्याने मनसबदारी मिळविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जोरकसपणे करत आहेत. त्यातच अजूनही जिल्हा बँक कलम
११ च्या फेऱ्यातून बाहेर पडलेली नाही.
सन २००२ पासून जिल्हा बँकेवर प्रशासकाचे राज्य होते. सुमारे १९० कोटींचा संचित तोटा गेल्या आठ वर्षांत १२५ कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात प्रशासकांना यश आले. कर्जाचा डोंगर असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची यंत्रसामुग्री तारण ठेवून घेतल्याने प्रशासकांनी जिल्हा बँकेला मोठय़ा संकटातून वाचविले. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला सुमारे दोनशे कोटी रुपयांपर्यंत कर्ज विनातारणच देण्यात आलेले होते. अशा अवस्थेत असणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तरुण पिढी निवडणूक लढविण्यास उत्सुक आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील यांचे भाच्चे आमदार राहुल मोटे, आमदार मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील, बँकेचे माजी उपाध्यक्ष विक्रम पडवळ, माजी आमदार सि. ना. आलुरे गुरुजी यांचे पुतणे दीपक आलुरे, काँग्रेसचे खजीनदार विजय दंडनाईक यांच्या पत्नी सुरेखा दंडनाईक आदी मंडळींनी जिल्हा बँकेत मनसबदारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्हा बँकेच्या एकूण १७ जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष निम्यानिम्या जागांवर निवडणूक लढविणार आहे. भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र आधी अर्ज भरू, मग जमले तर निवडणूक लढवू अशी भूमिका घेतल्याचे दिसते. शिवसेनेतून ज्ञानेश्वर पाटील, राज अहमद पठाण आदींनी अर्ज दाखल केले असले तरी संस्थांमधील भाजप-सेनेचे नगण्य स्थान लक्षात घेता या निवडणुकीत फारशी चुरस निर्माण होण्याची शक्यता नाही.
या निवडणुकीत राज्यमंत्री राणा जगजीतसिंह पाटील यांचे समर्थक असणाऱ्या कार्यकर्त्यांची बरीच नावे आहेत. राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष सतीश दंडनाईक, विलास बारकुल आदी जणही या निवडणुकीत उतरण्यास उत्सुक आहेत.